Gold Silver Price Today Pudhari
अर्थभान

Gold Silver Price Today: तीन दिवसांत सोनं 2,730 रुपयांनी महागलं; चांदी मात्र स्वस्त, खरेदी करण्यापूर्वी आजचे दर पाहा

Gold Silver Price Today: सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली असून, तीन दिवसांत 24 कॅरेट सोन्याचे दर 2,730 रुपयांनी महागले आहेत.

Rahul Shelke

Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजचे दर जाणून घेणे महत्त्वाचे आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे दर वधारले आहेत. गेल्या तीन दिवसांत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल 2,730 रुपयांची वाढ झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 2,510 रुपयांनी महागले आहेत.

आज राजधानी दिल्लीमध्येही सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे. 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे दर प्रत्येकी 10 रुपयांनी वधारले आहेत. दुसरीकडे, चांदीच्या दरात मात्र घसरण झाली आहे. सलग चार दिवस स्थिर राहिल्यानंतर आज चांदी स्वस्त झाली आहे. त्यामुळे सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे.

दिल्लीपासून मुंबईपर्यंत सोन्याचे आजचे दर

देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर वेगवेगळे आहेत. दिल्लीमध्ये 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,27,910 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्यासाठी 1,17,310 रुपये मोजावे लागत आहेत. 18 कॅरेट सोन्याचा भाव 96,010 रुपये आहे.

मुंबई, कोलकाता आणि चेन्नईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 1,27,810 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,17,160 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव 95,860 रुपये आहे.

चांदीच्या दरात घसरण

सोन्याच्या दरात वाढ होत असताना चांदीच्या किमतीत मात्र घसरण झाली आहे. आज एक किलो चांदीच्या किमतीत 100 रुपयांची घट झाली आहे. सध्या दिल्लीमध्ये एक किलो चांदीचा भाव 1,74,900 रुपये आहे. मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या शहरांमध्येही चांदी याच दराने विकली जात आहे.

विशेष म्हणजे, गेल्या 10 दिवसांत चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. या कालावधीत एक किलो चांदी तब्बल 20,100 रुपयांनी स्वस्त झाली आहे. त्यामुळे चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे लक्ष आता पुढील दर बदलांकडे लागले आहे.

सोन्याचे दर वाढणार की कमी होणार? पुढील तीन तारखा महत्त्वाच्या

आगामी काळात सोन्याच्या किमती कोणत्या दिशेने जातील, हे ठरवण्यात अमेरिकेतील काही महत्त्वाच्या आर्थिक घडामोडींची भूमिका असेल. त्यामुळे गुंतवणूकदारांचे लक्ष पुढील तीन तारखांकडे लागले आहे.

25 नोव्हेंबर: अमेरिकेतील महागाईची आकडेवारी जाहीर होणार आहे. या आकडेवारीचा सोन्याच्या किमतीवर परिणाम होऊ शकतो.

4 डिसेंबर: अमेरिकेतील रोजगारविषयक आकडेवारी जाहीर होणार आहे. रोजगाराच्या स्थितीवरून अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची दिशा स्पष्ट होण्यास मदत होईल.

9 डिसेंबर: अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह व्याजदरांबाबत निर्णय जाहीर करणार आहे. यासोबतच भविष्यातील व्याजदरांबाबतचे संकेतही दिले जाणार आहेत.

अमेरिकेतील महागाई, रोजगाराची स्थिती आणि व्याजदरांबाबतचे निर्णय यांचा सोन्या-चांदीच्या बाजारावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पुढील काही दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT