Gold Silver Price Today Pudhari
अर्थभान

Gold Silver Price Today: लग्नसराईत सोन्याचा भाव उतरला! १० दिवसांत सोनं ७,५४० रुपयांनी स्वस्त; चांदीतही मोठी घसरण, काय आहे आजचा भाव?

Gold Silver Price Today: लग्नसराईच्या हंगामात सोने खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून सोन्याच्या दरात घसरण सुरुच आहे.

Rahul Shelke

Gold Silver Price Today: लग्नसराईचा हंगाम सुरू असतानाच सोने खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतीत सातत्याने घसरण होत आहे. त्यामुळे दागिने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जागतिक बाजारातील कमकुवत संकेत आणि भारतीय रुपयातील तेजी यामुळे सोन्याच्या दरावर दबाव निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, गेल्या दहा दिवसांत सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे.

गेल्या तीन दिवसांत २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅममागे १,५९० रुपयांनी कमी झाला आहे. तर २२ कॅरेट सोन्याच्या दरात १,४६० रुपयांची घट झाली आहे. गेल्या दहा दिवसांचा विचार केला, तर २४ कॅरेट सोनं ७,५४० रुपयांनी, तर २२ कॅरेट सोनं ६,९१० रुपयांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे लग्नसराईसाठी सोन्याचे दागिने खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी ही महत्त्वाची घडामोड आहे.

दिल्लीमध्ये सोन्याचे दर किती?

राजधानी दिल्लीमध्ये आज सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे. २४ कॅरेट आणि २२ कॅरेट अशा दोन्ही प्रकारच्या सोन्याचे दर प्रति १० ग्रॅममागे १० रुपयांनी कमी झाले आहेत.

दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ३६ हजार १९० रुपये झाला आहे. तर २२ कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना १ लाख २४ हजार ८४० रुपये मोजावे लागत आहेत. १८ कॅरेट सोन्याचा दर १ लाख २ हजार १७० रुपये आहे.

मुंबई, पुणे आणि कोलकाता येथे २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख ३६ हजार ३० रुपये आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख २४ हजार ६९० रुपये आहे. १८ कॅरेट सोन्याचा दर १ लाख २ हजार २० रुपये आहे.

चेन्नईमध्येही सोन्याचे दर जवळपास याच पातळीवर आहेत. येथे २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ३६ हजार ३० रुपये, २२ कॅरेट सोन्याचा दर १ लाख २४ हजार ६९० रुपये, तर १८ कॅरेट सोन्याचा दर १ लाख २ हजार ४० रुपये आहे.

चांदीच्या दरातही घसरण

सोन्याप्रमाणेच चांदीच्या किमतीतही घसरण सुरू आहे. औद्योगिक क्षेत्रातून चांदीला मिळणारी मागणी कमी झाल्यामुळे भाव कमी झाले आहेत. आज एक किलो चांदीचा दर १०० रुपयांनी कमी झाला आहे. याआधी दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली होती. चांदीचा दर तब्बल ५.३ टक्क्यांनी म्हणजेच ९,५०० रुपयांनी कमी होऊन प्रति किलो १ लाख ६९ हजार ५०० रुपयांवर आला आहे. विशेष म्हणजे, हा एका वर्षातील नीचांकी स्तर आहे.

दहा दिवसांत सोनं ८,३०० रुपयांनी स्वस्त

ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या माहितीनुसार, ९ नोव्हेंबरपासून सोन्याच्या किमतीत ८,३०० रुपयांची घसरण झाली आहे. म्हणजेच सोन्याचे दर जवळपास ६ टक्क्यांनी कमी झाले आहेत.

दुसरीकडे, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. ५ नोव्हेंबरपासून सलग आठ सत्रांमध्ये चांदीचा दर प्रति किलो २५ हजार रुपयांनी खाली आला आहे. ही घसरण जवळपास १३ टक्के आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT