Gold Silver Price Crash Pudhari
अर्थभान

Gold Silver Crash: जूनमध्ये सोनं 17 हजारांनी तर चांदी 51 हजारांनी स्वस्त; इतकी मोठी पडझड का झाली?

Gold Silver Price Crash: जून महिन्यात सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम सुमारे ₹17 हजारांची, तर चांदीच्या दरात सुमारे ₹51 हजारांची घसरण झाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Gold Silver Price Crash: सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या अनेकांसाठी जून महिना निराशाजनक ठरला आहे. महिनाभरात मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली असून, जूनपूर्वी खरेदी केलेल्या गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. दुसरीकडे, या घसरणीनंतर काही गुंतवणूकदार आता नव्याने सोने-चांदी खरेदी करण्याची संधी म्हणून या परिस्थितीकडे पाहत आहेत.

जूनमध्ये सोनं-चांदी किती स्वस्त झालं?

मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX) वरील आकडेवारीनुसार, 29 मेपासून आतापर्यंत सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम सुमारे 17 हजार रुपयांची घसरण झाली आहे. म्हणजेच सोन्याच्या किमतीत सुमारे 10.36 टक्क्यांची घट झाली आहे.

चांदीत तर आणखी मोठी पडझड झाली आहे. जून महिन्यात चांदीच्या दरात तब्बल 51 हजार रुपयांची घट झाली असून, त्यात सुमारे 18.56 टक्क्यांची घसरण झाली आहे.

इतकी मोठी घसरण का झाली?

इराण-अमेरिका तणाव कमी झाल्यानंतर आणि शांतता चर्चेला सुरुवात झाल्यामुळे अनेकांना सोन्या-चांदीच्या किमती वाढतील, अशी अपेक्षा होती. मात्र, त्याउलट बाजारात मोठी घसरण झाली.

यामागचे प्रमुख कारण म्हणजे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढीचे संकेत मिळणे. व्याजदर वाढण्याची शक्यता व्यक्त होताच सुरक्षित गुंतवणूक (Safe Haven) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोन्या-चांदीवरील गुंतवणूक कमी झाली.

याशिवाय, अनेक गुंतवणूकदारांनी उच्च पातळीवर नफा वसूल (Profit Booking) करत सोने-चांदीची विक्री केली. त्याचवेळी शेअर बाजाराकडे गुंतवणुकीचा ओघ वाढल्याने मौल्यवान धातूंवर आणखी दबाव निर्माण झाला.

वर्षभरात किती घसरण झाली?

जानेवारी 2026 मध्ये नोंदवलेल्या विक्रमी उच्चांकाच्या तुलनेत सोन्याच्या आंतरराष्ट्रीय किमती सुमारे 29 टक्क्यांनी घसरल्या आहेत. त्याचप्रमाणे चांदीत 50 टक्क्यांहून अधिक घसरण झाली असून तिचा दर सध्या प्रति औंस सुमारे 57 डॉलरच्या आसपास आहे.

आता गुंतवणूकदारांनी काय करावे?

किंमतीत झालेल्या मोठ्या घसरणीमुळे अनेक गुंतवणूकदारांसाठी ही खरेदीची संधी असू शकते. मात्र, बाजारातील अस्थिरता अजूनही कायम असल्याने कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, अल्पकालीन चढ-उतारांवर विचार करण्यापेक्षा दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करणे अधिक योग्य ठरू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT