Gold Rate Today  (Pudhari Photo)
अर्थभान

Gold Rate Today | सोन्याची ऐतिहासिक उसळी! दर १ लाख पार, जाणून घ्या सोने इतके का महागले?

सोने दरात २ टक्के वाढ, चांदीही महागली

दीपक दि. भांदिगरे

Gold Rate Today

सोने पुन्हा १ लाख पार झाले आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) शुक्रवारी सोन्याच्या वायदे दरात २ टक्के म्हणजेच २ हजारांची वाढ झाली. यामुळे सोन्याचा प्रति १० ग्रॅम दर १ लाख ४०० रुपयांवर पोहोचला. तर चांदीचा दर ८०० रुपयांनी वाढून प्रति किलो १ लाख ६ हजारांवर गेला. एमसीएक्सवरील सोने दराचा हा सर्वकालीन उच्चांक मानला जात आहे.

इस्रायलने शुक्रवारी पहाटे इराणमधील अनेक ठिकाणांवर हल्ला केला. यात इराणच्या अण्विक तळांचा समावेश आहे. यात इराणचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. इस्रायलने या कारवाईला 'रायझिंग लायन' असे नाव दिले आहे. असे मानले जाते की इराण या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देईल.

सोने का महागले?

इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आणि कमकुवत डॉलर निर्देशांकामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली असल्याचे सराफा बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ज्यावेळी जगात भू- राजकीय तणाव वाढतो, तेव्हा सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून गुंतवणूकदार सोने खरेदीकडे वळतात. परिणामी सोन्याच्या दरात वाढ होते.

गुरुवारी सोन्याचा दर १.७ टक्के वाढून प्रति १० ग्रॅम ९८,३९२ रुपयांवर पोहोचला होता. तर चांदीचा दर ०.४ टक्के वाढून प्रति किलो १,०५,८८५ रुपयांवर बंद झाला होता. या आठवड्यात सोने दरात ३.५ टक्के वाढ झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातही स्पॉट गोल्डचा दर १.३ टक्के वाढून प्रति औंस ३,४२८ डॉलवर पोहोचला आहे.

IBJA चे आजचे सोन्याचे दर

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, शुक्रवारी २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९९,१७० रुपयांवर खुला झाला. तर २२ कॅरेट ९०,८४० रुपये, १८ कॅरेट ७४,३७८ रुपये आणि १४ कॅरेटचा दर ५८,०१४ रुपयांवर खुला झाला आहे. चांदीचा दर प्रति किलो १,०६,२४० रुपयांवर खुला झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT