पुढारी ऑनलाईन डेस्क : सोने दरात आज गुरुवारी (दि.१३ मार्च) तेजी दिसून आली. शुद्ध सोने (२४ कॅरेट) ५२९ रुपयांनी महागले असून दर प्रति १० ग्रॅम ८६,६७२ रुपयांवर पोहोचला. तर चांदीचा दर किरकोळ कमी झाला असून तो प्रतिकिलो ९७,९५० रुपयांवर खुला झाला. हे दर जीएसटीशिवाय आहेत. चांदीचा दर जीएसटीसह धरल्यास तो १ लाखांवर जातो.
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम ८६,६७२ रुपये, २२ कॅरेट ७९,३९२ रुपये, १८ कॅरेट ६५,००४ रुपये आणि १४ कॅरेटचा दर ५०,७०३ रुपयांवर खुला झाला.
अमेरिकेच्या आयात शुल्क धोरणांमुळे उद्भवलेले ट्रेड वॉर आणि मंदावलेल्या जागतिक वाढीच्या शक्यतांमुळे अनिश्चितता निर्माण झाली आहे. परिणामी एमसीएक्सवर सोन्याच्या एप्रिल फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट्सचा दर गुरुवारी ०.२१ टक्के म्हणजेच १८९ रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम ८६,८७५ रुपयांच्या नव्या उच्चांकावर पोहोचला. दरम्यान, चांदीच्या दरात किंचित घट झाली.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर दोन आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. तर चांदीचा दर तीन आठवड्यांच्या उच्चांकावर गेला आहे. गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक (सेफ हेवन) म्हणून सोन्याकडे वळल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमती आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचल्या. अमेरिकेच्या शुल्क धोरणांमुळे ट्रेड वॉरची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनिश्चितता वाढली आहे. त्यात मंदावलेल्या जागतिक विकासाच्या धास्तीने सोने खरेदीकडे कल वाढला आहे. यामुळे दर वाढले असल्याचे दिसून आले आहे.
आर्थिक संकटावेळी सोन्याचा साठा कामी येत असल्याचे सोन्याचा साठा करुन ठेवला जातो. त्याची चलन साठ्यासही मदत होते. सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित आणि विश्वसनीय समजली जाते.