Gold, Silver Rate Today May 15: जागतिक घडामोडींचा परिणाम आता थेट सोन्या-चांदीच्या बाजारावर दिसू लागला आहे. अमेरिका आणि इराणमधील तणावामुळे जागतिक बाजारपेठेत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले असून सोन्याच्या किमतीत सातत्याने चढ-उतार होत आहेत.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सोन्याच्या दरात मोठी वाढ नोंदवली गेली. रुपयाने डॉलरसमोर विक्रमी नीचांकी पातळी गाठल्याने 10 ग्रॅम सोन्याच्या किमतीत तब्बल 650 रुपयांची वाढ झाली.
ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या माहितीनुसार, 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा दर 10 ग्रॅममागे 1.66 लाख रुपयांवर पोहोचला आहे. याआधी हा दर 1.65 लाख होता. भू-राजकीय तणाव, रुपयातील घसरण आणि वाढती जागतिक अनिश्चितता यामुळे सोन्याच्या किमतींमध्ये अस्थिरता कायम असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.
दरम्यान, केंद्र सरकारने सोने आणि चांदीवरील आयात शुल्कात मोठी वाढ केली आहे. यापूर्वी 6 टक्के असलेले शुल्क आता 15 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे. प्लॅटिनमवरील आयात शुल्कही 6.4 टक्क्यांवरून 15.4 टक्के करण्यात आले आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे वाढणारे आयात बिल आणि अनावश्यक परदेशी चलन खर्च कमी करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावश्यक आयात आणि सोन्याच्या खरेदीवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केल्यानंतर सरकारने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. या नव्या शुल्कवाढीचा परिणाम पुढील काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरांवर दिसू शकतो, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
भारतातील सोन्याच्या किंमती या केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून नसतात. डॉलरचा दर, जागतिक बाजारातील परिस्थिती, स्थानिक मागणी, सण-उत्सव आणि लग्नसराईचा हंगाम यांचाही सोन्याच्या भावावर मोठा परिणाम होतो.
15 मे रोजी प्रमुख शहरांतील सोन्याचे दर (प्रति ग्रॅम):
दिल्ली:
24 कॅरेट – ₹16,227
22 कॅरेट – ₹14,896
18 कॅरेट – ₹12,191
मुंबई:
24 कॅरेट – ₹16,234
22 कॅरेट – ₹14,881
18 कॅरेट – ₹12,176
पुणे:
24 कॅरेट – ₹16,234
22 कॅरेट – ₹14,881
18 कॅरेट – ₹12,176
सोन्याच्या वाढत्या किंमतींमुळे गुंतवणूकदार आणि दागिने खरेदी करणाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. आगामी काळात जागतिक तणाव कमी होतो की आणखी वाढतो, यावर सोन्याच्या दरांची दिशा मोठ्या प्रमाणात अवलंबून असेल.