Gold Demand in India: भारतात सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या किमती सातत्याने वाढत असताना आता त्याच्या मागणीत मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रेटिंग एजन्सी CRISIL आणि World Gold Council (WGC) यांच्या ताज्या अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारतातील सोन्याची मागणी सुमारे 8% पर्यंत घटू शकते. जर हा अंदाज खरा ठरला, तर कोरोना काळातील 2021 वगळता, गेल्या दहा वर्षांतील ही सर्वात कमी मागणी ठरू शकते.
सोनं महाग, ग्राहकांची खरेदी झाली कमी
अहवालानुसार, सोन्याच्या मागणीत घट होण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्याच्या वाढत्या किंमती. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी आणि भारतातील वाढीव आयात शुल्कामुळे सोन्याचे दर सतत वर जात आहेत. भारतात 10 ग्रॅम सोन्याची किंमत आता 1.60 लाख रुपयांच्या आसपास पोहोचली आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांसाठी सोनं खरेदी करणं कठीण होत चाललं आहे.
याचा थेट परिणाम बाजारावर दिसत आहे. ग्राहक आता पूर्वीसारखी मोठ्या प्रमाणावर खरेदी करत नाहीत. विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबे आता गरजेपुरतेच सोनं घेण्यावर भर देत आहेत.
लग्नसराई आणि सणांमध्येही बदललं चित्र
भारतामध्ये लग्नसराई आणि सणासुदीला सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणावर असते. मात्र, यंदा खरेदीची पद्धत बदलताना दिसत आहे. ग्राहक नवीन दागिने खरेदी करण्याऐवजी जुने दागिने एक्सचेंज करून नवीन घेण्याला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे ज्वेलर्सकडील नवीन सोन्याची विक्री घटत आहे. व्यापाऱ्यांच्या मते, 15% आयात शुल्क आणि वाढलेले दर यामुळे ग्राहकांचा खर्च कमी झाला आहे.
विक्री कमी, पण ज्वेलर्सची कमाई वाढली
एकीकडे सोन्याच्या विक्रीचे प्रमाण कमी होत असले, तरी दुसरीकडे ज्वेलरी कंपन्यांच्या कमाईत वाढ होत आहे. कारण सोन्याच्या किंमती इतक्या वाढल्या आहेत की, कमी विक्री झाली तरी उत्पन्न वाढत आहे. अहवालानुसार, भारतातील मोठ्या ज्वेलर्सच्या महसुलात 20 ते 25% वाढ होण्याची शक्यता आहे.
सरकारच्या निर्णयाचा मोठा परिणाम
केंद्र सरकारने सोन्यावरील आयात शुल्क 6% वरून थेट 15% पर्यंत वाढवले आहे. हा आतापर्यंतचा मोठा निर्णय मानला जात आहे. त्यामुळे जुलै 2024 मध्ये दिलेली शुल्क सवलत पूर्णपणे संपुष्टात आली आहे. याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतींवर झाला आहे.
याच दरम्यान, नरेंद्र मोदी यांनीही नागरिकांना एक वर्ष सोनं खरेदी टाळण्याचे आवाहन केल्याची चर्चा आहे, जेणेकरून देशाचा आयात खर्च कमी होऊ शकेल.
गोल्ड बार आणि नाण्यांच्या मागणीवर परिणाम
WGC च्या अहवालानुसार, आयात शुल्क वाढल्याचा सर्वाधिक परिणाम गुंतवणुकीसाठी घेतल्या जाणाऱ्या सोन्यावर, म्हणजे गोल्ड बार आणि नाण्यांवर होत आहे. या प्रकारच्या खरेदीत मोठी घट होऊ शकते. मात्र, लग्न आणि सामाजिक कार्यक्रमांमुळे दागिन्यांची मागणी काही प्रमाणात कायम राहू शकते.
तस्करी वाढण्याचा धोकाही वाढला
अहवालात आणखी एक मोठी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. आयात शुल्क वाढल्यानंतर सोन्याची तस्करी वाढण्याचा धोका निर्माण होतो. 2013 आणि 2022 मध्ये शुल्क वाढवल्यानंतर अवैध सोन्याची आयात वाढल्याची उदाहरणे अहवालात देण्यात आली आहेत. एकदा तस्करीचे नेटवर्क तयार झाले, तर ते मोडून काढणे कठीण असल्याचेही WGC ने म्हटले आहे.
आता पुढे काय होऊ शकतं?
तज्ज्ञांच्या मते, जर सोन्याच्या किमती अशाच वाढत राहिल्या आणि आयात शुल्कात सवलत मिळाली नाही, तर पुढील काही महिन्यांत मागणी आणखी घसरु शकते. मात्र, लग्नसराई आणि सणांमुळे काही प्रमाणात खरेदी सुरू राहण्याची शक्यता आहे.