Gold Price Hike पुणे : जागतिक व्यापारातील अस्थिरता, डॉलरचे अवमूल्यन, गुंतवणूकदारांकडून सोन्यात केली जाणारी गुंतवणूक, यामुळे 24 कॅरेट सोन्याच्या भावात गेल्या आठ दिवसांत 6,440 रुपयांनी वाढ झाली असून, 10 ग्रॅमचा दर 96,170 रुपयांवर गेला आहे. तर, चांदीचा एक किलोचा दर पुन्हा एक लाखाच्या घरात पोहचला आहे.
सोन्याचा 24 कॅरेटचा दर 8 एप्रिल रोजी 89,730 रुपये होता. सोन्याचे दागिने मोठ्या प्रमाणावर 22 कॅरेटमध्ये केले जातात. या सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 82 हजार 250 रुपये होता. त्यानंतर 12 एप्रिल रोजी 24 कॅरेटचा भाव वाढून 95,670 आणि 22 कॅरेटचा भाव 87,700 रुपयांवर गेला. बुधवारी (दि. 16) एका दिवसात 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 990 रुपयांनी वाढून 96,170 रुपयांवर गेला. तर, 22 कॅरेटचा भाव 950 रुपयांनी वाढून 88,150 रुपयांवर पोहचला. सोने आणि चांदीवर तीन टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आकारला जातो. त्याप्रमाणात सोने आणखी महागते. त्यानुसार 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव अनुक्रमे 90,700 ते 99 हजार रुपये असा होता.
अमेरिकेने 2 एप्रिलपासून भारतासह विविध देशांवर जबर शुल्कवाढ लागू केली होती. भारतासाठी 26 टक्के शुल्कवाढ जाहीर केली आहे. त्यानंतर अमेरिकेने चीन वगळता इतर देशांवरील शुल्कवाढीला 90 दिवसांची स्थगिती दिली. मात्र, किमान 10 टक्के शुल्क कायम ठेवले आहे.
शुल्कवाढीचे संकट तूर्तास पुढे ढकलले आहे. मात्र, अमेरिका आणि चीन या दोन आर्थिक महासत्ता समोरासमोर उभ्या ठाकल्या आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारातील अनिश्चितता वाढली आहे. परिणामी, विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांसह गुंतवणूकदारांनी सोने खरेदी वाढविली आहे. त्यातच डॉलरचे अवमूल्यन झाल्याने सोन्याच्या भाववाढीला आणखी बळ मिळाले आहे.