Gold Price Surge Middle East War Pudhari
अर्थभान

Gold Silver Price: इस्रायल-अमेरिका-इराण संघर्षाचा परिणाम; सोन्या-चांदीच्या भावात मोठी वाढ, सोने २ लाखांच्यावर जाणार?

Gold Silver Price: मध्यपूर्वेतील तणावामुळे MCX वर सोने आणि चांदीच्या दरात ३.५ % ची वाढ झाली. गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायांकडे वळल्याने सोन्याचा दर १.६७ लाखांवर, तर चांदी २.८४ लाखांवर पोहोचली.

Rahul Shelke

Gold Price Surge Middle East War: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर मोठी लष्करी कारवाई केल्यानंतर जागतिक बाजारपेठेत अस्थिरता वाढली आहे. त्याचा थेट परिणाम भारतातील कमोडिटी बाजारावर दिसून आला. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने आणि चांदीच्या दरात तब्बल ३.५ टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. वाढत्या भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायांकडे वळत आहेत.

MCX वर काय आहेत भाव?

एप्रिल २०२६ डिलिव्हरीसाठी असलेले गोल्ड फ्युचर्स ५,८११ रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम १,६७,९१५ रुपयांवर पोहोचले. त्याचवेळी ५ मार्च २०२६ डिलिव्हरीसाठीचे सिल्व्हर फ्युचर्स ९,४९२ रुपयांनी वाढून प्रति किलो २,८४,४९० रुपयांवर व्यवहार करत होते.

आंतरराष्ट्रीय बाजारातही तेजी दिसून आली. स्पॉट गोल्ड सुमारे १ टक्क्यांनी वाढून ५,३२९ डॉलर प्रति औंसवर गेला, जो चार आठवड्यांतील उच्चांक आहे. स्पॉट सिल्व्हरमध्येही २ टक्क्यांहून अधिक वाढ झाली, त्याने ९५ डॉलरचा टप्पा पार केला.

तज्ज्ञांच्या मते, सोन्याला ग्लोबल अनिश्चिततेचे थर्मामीटर मानले जाते. जागतिक तणाव वाढला की सोन्यात तेजी येते. सध्या मध्यपूर्वेतील संघर्ष दीर्घकाळ चालण्याची शक्यता असल्याने सोन्या-चांदीत आणखी वाढ होऊ शकते.

गुंतवणूकदारांसाठी काय संकेत?

पृथ्वी फिनमार्टचे मनोज कुमार जैन यांच्या मते, सध्या मौल्यवान धातूंमध्ये मोठे चढ-उतार होण्याची शक्यता आहे. डॉलर इंडेक्स, अमेरिका-इराण तणाव आणि अमेरिकेतील रोजगार आकडेवारी या घटकांमुळे पुढील काही दिवस बाजारात अस्थिरता राहू शकते.

त्यांच्या विश्लेषणानुसार:

  • MCX वर सोन्याला १,६०,६०० ते १,५८,८०० रुपयांच्या पातळीवर सपोर्ट आहे, तर १,६४,४०० ते १,६७,००० रुपयांवर रेसिस्टन्स आहे.

  • चांदीला २,७८,००० ते २,७१,००० रुपयांवर सपोर्ट असून २,९२,००० ते ३,०४,००० रुपयांवर रेसिस्टन्स आहे.

ट्रेडिंग करताना योग्य स्टॉप-लॉस लावणे आणि बाजारातील हालचाली लक्षात घेणे आवश्यक असल्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

सोने २ लाखांपर्यंत जाईल?

जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे कमोडिटी रिसर्च प्रमुख हरीश वी यांच्या मते, जर भू-राजकीय तणाव आणखी वाढला तर सोन्याचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात ६,००० डॉलर प्रति औंसपर्यंत जाऊ शकतो. भारतीय बाजारात त्याचा परिणाम म्हणून सोने २,००,००० रुपयांच्या पातळीवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र पुढील दिशा ही संघर्ष किती वाढतो यावर अवलंबून असेल. चांदीबाबतही सकारात्मक चित्र दिसत आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार चांदी १०० डॉलरच्या वर जाऊ शकते.

यावर्षीची कामगिरी

या वर्षात आतापर्यंत सोन्याच्या दरात २० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. जानेवारी अखेरीस उच्चांक गाठल्यानंतर थोडी घसरण झाली होती; मात्र पुन्हा सोन्याचे भाव ५,००० डॉलरच्या वर स्थिरावल्याने तेजीचा ट्रेंड कायम असल्याचे संकेत मिळत आहेत. सलग सात महिन्यांत झालेली ही वाढ १९७३ नंतरची सर्वात मोठी सलग वाढ मानली जात आहे.

पुढे काय?

मध्यपूर्वेतील तणाव, डॉलरमधील चढ-उतार आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या धोरणांबाबतची अनिश्चितता यामुळे मौल्यवान धातूंमध्ये अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांसाठी ही संधी असली तरी जोखीमही तितकीच मोठी आहे. सध्या तरी युद्धामुळे सोन्या-चांदीत वाढ पाहायला मिळत आहे. सोने खरोखरच २ लाखांच्या पातळीवर पोहोचणार का, हे युद्धाच्या घडामोडींवर अवलंबून आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT