Gold and Silver Prices Fall | सोने-चांदीतील घसरणः गुंतवणूक करावी का? 
अर्थभान

Gold and Silver Prices Fall | सोने-चांदीतील घसरणः गुंतवणूक करावी का?

पुढारी वृत्तसेवा

जयदीप नार्वेकर

गेल्या काही दिवसांत जागतिक आणि देशांतर्गत वित्तीय बाजारात अत्यंत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. विशेषतः मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये झालेली मोठी घसरण हा सध्या गुंतवणूकदारांमध्ये अत्यंत चर्चेचा आणि चिंतेचा विषय बनला आहे.

सलग अनेक महिने नवनवे उच्चांक प्रस्थापित केल्यानंतर, आता सोन्या-चांदीच्या दरांनी एका पाठोपाठ एक नीचांकी पातळ्या गाठण्यास सुरुवात केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा हा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवर म्हणजेच ‘एमसीएक्स’ वर स्पष्टपणे दिसून येत आहे. या मोठ्या घसरणीमागे अमेरिकेतील केंद्रीय बँक म्हणजेच ‘फेडरल रिझर्व्ह’चे कडक आर्थिक धोरण हे सर्वात महत्त्वाचे कारण मानले जात आहे. अमेरिकेतील महागाईचा दर अपेक्षेपेक्षा जास्त राहिल्यामुळे व्याजदरांमध्ये आणखी वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. जेव्हा व्याजदर वाढतात, तेव्हा गुंतवणूकदार सोन्यासारख्या थेट परतावा न देणार्‍या पर्यायांकडून आपला पैसा काढून सरकारी रोख्यांमध्ये गुंतवण्यास प्राधान्य देतात. याशिवाय, अमेरिकन डॉलरचा निर्देशांक मजबूत झाल्यामुळे जागतिक स्तरावर सोन्या-चांदीची मागणी घटली आहे.

या पार्श्वभूमीवर, गुंतवणूकदारांसमोर आता एक नवीन पेच निर्माण झाला आहे, तो म्हणजे ‘सोन्यात गुंतवणूक करावी की चांदीमध्ये?’ वित्तीय तज्ज्ञांच्या मते, सध्याच्या स्थितीत दोन्ही धातूंचे वेगळे वैशिष्ट्य आणि जोखीम आहे. चांदीचा विचार केला तर तिच्यामध्ये चढ-उतार म्हणजेच अस्थिरता खूप जास्त असते. चांदी केवळ एक मौल्यवान धातू नसून, तिचा वापर इलेक्ट्रॉनिक्स, सौर ऊर्जा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांसारख्या औद्योगिक क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे जागतिक पातळीवर औद्योगिक मंदीचे सावट आल्यास चांदीच्या किमतींवर वेगाने नकारात्मक परिणाम होतो. तांत्रिक विश्लेषण पाहिल्यास, गोल्ड-सिल्व्हर रेशो’ 70 च्या पार गेल्यामुळे सोन्याच्या तुलनेत चांदी सध्या अधिक कमकुवत होताना दिसत आहे. देशांतर्गत बाजारात चांदी दोन लाख रुपयांच्या पातळीपर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दुसर्‍या बाजूला, सोन्याला नेहमीच ‘सेफ हेवन असेट’ मानले जाते. आर्थिक अनिश्चितता किंवा महागाई वाढते, तेव्हा सोने हे भांडवलाचे रक्षण करण्यासाठी सर्वोत्तम ‘वेल्थ इन्शुरन्स’ ठरते. सोन्याची घसरण ही चांदीच्या तुलनेत संथ आणि नियंत्रित असते. सोन्याचे एक्स्चेंज ट्रेडेड फंडांमध्येही सध्या किमती कमी झाल्यामुळे गुंतवणूकदारांना खरेदीची नवीन संधी उपलब्ध झाली आहे.

बाजारातील या घसरणीमुळे घाबरून न जाता, याकडे एक ‘हेल्दी करेक्शन’ म्हणून पाहिले पाहिजे. चांदीमध्ये सध्या मोठी अस्थिरता असल्याने लगेचच मोठी रक्कम गुंतवण्याची घाई करू नये. बाजार अधिक स्थिर होण्याची वाट पाहावी. दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करणार्‍यांनी एकाच वेळी सर्व पैसे न लावता, टप्प्याटप्प्याने किंवा एसआयपीच्या माध्यमातून मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करावी. यामुळे खरेदीच्या किमतीची सरासरी उत्तम प्रकारे होते आणि भविष्यात बाजारात सुधारणा झाल्यावर चांगला परतावा मिळण्याची शक्यता वाढते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT