Gold Silver Price Crash Pudhari
अर्थभान

Gold Silver Price Crash: एका दिवसात चांदी 16,500 रुपयांनी कोसळली, सोन्यालाही मोठा फटका; नेमकं घडलं काय?

Gold and Silver Prices Crash: अमेरिकेतील रोजगार आकडेवारी आणि व्याजदर वाढीच्या शक्यतेमुळे सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Gold and Silver Prices Crash: सोन्या-चांदीच्या बाजारात शुक्रवारी मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. काही तासांतच चांदीच्या किमती तब्बल 16,500 रुपयांनी घसरल्या, तर सोन्यालाही जवळपास 4 हजार रुपयांचा फटका बसला. गेल्या काही महिन्यांतील ही सर्वात मोठी घसरण मानली जात आहे. या घसरणीमागे भारतातील कोणताही घटक नसून अमेरिकेतून आलेल्या काही महत्त्वाच्या आर्थिक घडामोडी कारणीभूत ठरल्या आहेत.

शुक्रवारी रात्री कमोडिटी बाजार बंद होताना मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव 3,947 रुपयांनी घसरून 1,55,600 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला. तर चांदीचा दर तब्बल 16,595 रुपयांनी कोसळून 2,48,201 रुपये प्रति किलोवर बंद झाला. या घसरणीचा परिणाम देशातील सराफा बाजारावरही दिसून आला. दिल्ली, मुंबई, चेन्नईसह अनेक शहरांमध्ये सोन्या-चांदीचे दर कमी झाले.

या मोठ्या घसरणीमागे अमेरिकेतील रोजगारासंबंधीचा ताजा डेटा आहे. अमेरिकेतील रोजगारवाढ अपेक्षेपेक्षा चांगली झाल्याचे आकडे समोर आले. त्यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्था मजबूत असल्याचा संदेश बाजाराला मिळाला. त्याचा परिणाम अमेरिकन डॉलर आणि सरकारी रोख्यांच्या उत्पन्नावर म्हणजेच बॉण्ड यिल्डवर झाला. दोन्हीमध्ये वाढ झाल्याने गुंतवणूकदारांनी सोन्या-चांदीसारख्या सुरक्षित गुंतवणुकीतून पैसा काढण्यास सुरुवात केली.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 3.2 टक्क्यांनी घसरून 4,330 डॉलर प्रति औंसवर आला. तर चांदीमध्ये आणखी मोठी घसरण झाली आणि तिचा भाव 7.1 टक्क्यांनी घसरून 68.63 डॉलर प्रति औंसपर्यंत खाली आला. याचाच परिणाम भारतीय बाजारावरही झाला.

याशिवाय अमेरिकेची मध्यवर्ती बँक म्हणजेच फेडरल रिझर्व्ह यंदा पुन्हा व्याजदर वाढवू शकते, अशी शक्यता वाढली आहे. अमेरिका-इराण तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. तेल महागल्यास महागाई वाढण्याचा धोका निर्माण होतो. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी फेड व्याजदर वाढवू शकते. व्याजदर वाढल्यास सोन्यासारख्या मालमत्तेवरील आकर्षण कमी होते आणि त्याचे भाव घसरतात.

तज्ज्ञांच्या मते, 16 आणि 17 जून रोजी होणाऱ्या फेडरल रिझर्व्हच्या बैठकीकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या बैठकीत व्याजदरांबाबत काय निर्णय घेतला जातो यावर पुढील काही आठवड्यांतील सोन्या-चांदीच्या किमतींची दिशा ठरणार आहे.

दरम्यान, देशातील प्रमुख शहरांमध्येही सोन्याचे दर कमी झाले आहेत. दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,43,860 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चेन्नईमध्ये तो 1,45,525 रुपये असून मुंबईमध्ये 1,42,752 रुपये आहे. त्यामुळे सध्या सोने खरेदी करणाऱ्यांसाठी काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.

मात्र तज्ज्ञांचे मत आहे की ही घसरण कायमस्वरूपी असेलच असे नाही. जागतिक आर्थिक परिस्थिती, अमेरिकेचे व्याजदर, डॉलरची ताकद आणि मध्यपूर्वेतील भू-राजकीय तणाव यावर सोन्या-चांदीच्या किमती अवलंबून राहतील. त्यामुळे केवळ भाव घसरले म्हणून मोठी गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेणे महत्त्वाचे ठरेल.

सध्या तरी एका दिवसात झालेल्या या ऐतिहासिक घसरणीमुळे सोन्या-चांदीच्या बाजारात खळबळ उडाली असून गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघेही पुढील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT