Gold-Silver Rate Pudhari
अर्थभान

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; 3 दिवसांत सोनं 7,500 तर चांदी 21,700 रुपयांनी स्वस्त

Gold Silver Price Today: MCX वर सोन्याच्या दरात आज ₹1,478 तर चांदीच्या दरात ₹11,300 पेक्षा अधिक घसरण झाली. गेल्या तीन दिवसांत सोनं ₹7,500 आणि चांदी ₹21,700 पेक्षा जास्त स्वस्त झाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण सुरूच असून, गुरुवारी (25 जून) मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतीत मोठी घसरण झाली. अवघ्या तीन दिवसांत सोन्याच्या दरात सुमारे ₹7,500, तर चांदीच्या दरात ₹21,700 पेक्षा अधिक घसरण झाली आहे. त्यामुळे दागिने खरेदी करणारे आणि गुंतवणूकदार दोघांचेही लक्ष आता बाजाराकडे लागले आहे.

आज सोन्या चांदीचे भाव किती घसरले?

MCX वर आज सोन्याचा दर ₹1,478 ने घसरून प्रति 10 ग्रॅम ₹1,40,700 वर आला. सलग तिसऱ्या दिवशी घसरण सुरू राहिल्याने तीन दिवसांत सोनं एकूण ₹7,482 प्रति 10 ग्रॅम स्वस्त झालं आहे.

दुसरीकडे, चांदीच्या दरात आणखी मोठी घसरण झाली. MCX वर चांदीचा भाव ₹11,298 ने घसरून प्रति किलो ₹2,10,737 वर आला. गेल्या तीन दिवसांत चांदी तब्बल ₹21,728 प्रति किलो स्वस्त झाली आहे.

विक्रमी उच्चांकापेक्षा सोनं 52 हजारांहून अधिक स्वस्त

MCX च्या आकडेवारीनुसार, 29 जानेवारी रोजी सोन्याने प्रति 10 ग्रॅम ₹1,93,096 हा विक्रमी उच्चांक गाठला होता. त्यानंतर आजपर्यंत सोन्याचा दर ₹52,396 ने खाली आला आहे.

चांदीतही घसरण झाली आहे. MCX वर चांदीचा सर्वकालीन उच्चांक ₹4,20,048 प्रति किलो होता. सध्याचा दर पाहता चांदी तब्बल ₹2,09,311 प्रति किलो स्वस्त झाली असून, उच्चांकाच्या तुलनेत जवळपास निम्म्या दरावर आली आहे.

सोन्या-चांदीच्या दरात घसरण का होत आहे?

1. अमेरिकन डॉलर मजबूत

या आठवड्यात अमेरिकन डॉलरमध्ये जवळपास 1 टक्क्यांची वाढ झाली आहे. डॉलर मजबूत झाल्यामुळे सोनं आणि चांदी परदेशी गुंतवणूकदारांसाठी महाग होत आहेत, त्यामुळे मागणी कमी झाली आहे.

2. अमेरिकेत व्याजदर वाढण्याची शक्यता

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढवले जाऊ शकतात, अशी शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा कल सोन्याऐवजी व्याज देणाऱ्या मालमत्तांकडे आहे.

3. जागतिक भू-राजकीय घडामोडी

अमेरिका-इराण तणाव आणि वाढत्या ऊर्जा किमतींमुळे महागाईचा दबाव वाढला आहे. परिणामी व्याजदर वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून, त्याचा नकारात्मक परिणाम सोन्यावर झाला आहे.

4. मोठ्या बँकांनी अंदाज कमी केले

Goldman Sachs आणि Deutsche Bank यांसारख्या प्रमुख संस्थांनी सोन्याच्या भविष्यातील किमतींचे अंदाज कमी केले आहेत. त्यामुळे बाजारातील गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास काहीसा कमी झाला आहे.

5. गोल्ड ETF मधून मोठी विक्री

सोन्यावर आधारित ETF (Exchange Traded Funds) मधून सातत्याने पैसे काढले जात आहेत. तसेच चीनमध्येही सोन्याची मागणी कमी झाल्याने जागतिक बाजारावर त्याचा परिणाम दिसून येत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातही दबाव

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. स्पॉट गोल्डचा दर 4,000 डॉलर प्रति औंसच्या खाली, तर चांदीचा दर 60 डॉलर प्रति औंसच्या खाली घसरला आहे. याचा थेट परिणाम भारतीय बाजारातील सोन्या-चांदीच्या दरांवरही झाला आहे.

खरेदीदारांसाठी संधी?

सोन्या-चांदीच्या दरात झालेली ही मोठी घसरण दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आणि दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी संधी मानली जात आहे. मात्र, बाजारातील अस्थिरता लक्षात घेऊन कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT