Stock Market (File Photo)
अर्थभान

Global Trade War Impact | अर्थवार्ता

जागतिक व्यापार युद्धात चालू असणार्‍या घडामोडींचे पडसाद या आठवड्यातदेखील भांडवल बाजारावर पडले.

पुढारी वृत्तसेवा

प्रीतम मांडके (मांडके फिनकॉर्प)

गतसप्ताहात निफ्टी आणि सेन्सेक्स निर्देशांकांमध्ये अनुक्रमे एकूण 202.05 आणि 742.12 अंकांची घसरण होऊन दोन्ही निर्देशांक अनुक्रमे 24363.3 आणि 79857.19 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये 0.82 टक्के तर सेन्सेक्समध्ये 0.92 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. सलग घसरण होण्याचा हा सहावा आठवडा ठरला. सर्वाधिक घट होणार्‍या समभागांमध्ये अदानी एंटरप्राइजेस (-7.4 टक्के), नेसले इंडिया लिमिटेड (-3.7 टक्के), अपोलो हॉस्पिटल्स (-3.6 टक्के), इन्फोसिस लिमिटेड (-3.2 टक्के), सन फार्मासिटिकल्स (-2.6 टक्के) यांचा समावेश झाला. तसेच सप्ताहात सर्वाधिक वाढ होणार्‍या समभागामध्ये हिरो मोटो कॉर्प (6.7 टक्के), टायटन कंपनी (4.4 टक्के), टाटा स्टील (3.2 टक्के), टेक महिंद्रा (2.9 टक्के), एचडीएफसी लाईफ (2.7 टक्के) या समभागांचा समावेश झाला. निर्देशांकांनी सातत्याने सलग सहा आठवडे कोसळण्याची मार्च 2020 नंतरची ही पहिलीच घटना आहे. जागतिक व्यापार युद्धात चालू असणार्‍या घडामोडींचे पडसाद या आठवड्यातदेखील भांडवल बाजारावर पडले.

अमेरिकेने भारतातून येणार्‍या वस्तूंवर तब्बल 50 टक्केचा आयात कर लावण्याची घोषणा केली. यापूर्वी हा आयात कर 25 टक्के इतका होता. परंतु, रशियाकडून खनिज तेल खरेदी चालू ठेवल्याने हा आयात कर वाढवल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात आले आहे. अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध गेल्या काही दशकांच्या नीचांकाला पोहोचले असल्याचे विश्लेषकांकडून सांगण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेला त्यांच्या कृषी आणि दुग्ध उत्पादनांसाठी भारतीय बाजारपेठ खुली हवी आहे. परंतु, भारतातील जवळपास सर्व ग्रामीण अर्थव्यवस्था ही कृषी, दुग्ध आणि पशु यासंबंधी व्यवसायावर अवलंबून आहे. अमेरिकेच्या बड्या कंपन्यांच्याशी स्पर्धा करणे हे अल्पभूधारक शेतकर्‍याला कठीण जाईल. त्यामुळे भारताने अमेरिकेसोबत करार करण्यास ठाम नकार दिला आहे.

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचा चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा निकाल जाहीर. बँकेचा निव्वळ नफा मागील वर्षाच्या तुलनेत 17,035 कोटींवरून 12.5 टक्क्यांनी वाढून 19,160 कोटी झाला. मागील पाच तिमाहीमधील हा सर्वात मोठा निव्वळ नफा आहे. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न 41 हजार 72 कोटी इतके झाले. मागील वर्षाच्या तुलनेत हे उत्पन्न स्थिर आहे. बँकेचे एकूण अनुत्पादित कर्ज प्रमाण 2.21 टक्क्यांवरून 1.83 टक्क्यांवर खाली आले. त्याचप्रमाणे निव्वळ अनुत्पादित कर्जाचे प्रमाण 0.57 टक्क्यांच्या तुलनेत 0.47 टक्के झाले. भारतीय स्टेट बँकेला (डइख) ट्रेझरी गुंतवणुकींच्या विक्री व पुनर्मूल्यांकनातून मिळालेला नफा दीडपट वाढून रु. 6,326 कोटींवर पोहोचला, जो मागील वर्षी रु.2,589 कोटी होता. परकीय चलन व्यापारातून मिळालेला ‘मार्क-टू-मार्केट’ नफा साडेचारपट वाढून रु. 1,632 कोटी झाला. या महत्त्वाच्या वाढीमुळे बँकेचे व्याजाशिवायचे उत्पन्न (छेप-ळपींशीशीीं ळपलेाश) वार्षिक तुलनेत 55 टक्के वाढून रु. 17,346 कोटींवर पोहोचले. या सर्वांमुळे एकूणच नफ्यामध्ये भर पडली.

अमेरिकेच्या दबावाला न जुमानता भारताने रशियासोबत आपले संबंध अधिक द़ृढ करण्यावर भर दिला आहे. प्रत्येक देशाला स्वतःचे स्वतंत्र व्यापार धोरण असून, दुसर्‍या देशाने याबाबतीत ढवळाढवळ करू नये, अशी भारताची भूमिका आहे. याच भूमिकेनुसार भारताचे पंतप्रधान सध्या वर्ल्ड एससीओ मीटिंगसाठी चीनमध्ये दाखल. यामध्ये रशियाचे पुतीन यांच्यासोबत तसेच चीनचे शी जिनपिंग यांच्यासोबत पंतप्रधानांची सध्याच्या व्यापार युद्ध आणि राजकीय परिस्थितीवर चर्चा.

सोने बनले लाख मोलाचे. 7 ऑगस्ट रोजी 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याच्या दराने 1,02,550 रुपयांचा नवा उच्चांक गाठला. सध्या जागतिक बाजारात अस्थिरतेचे वातावरण असल्याने सुरक्षित असे समजले जाणार्‍या सोने धातूमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढत आहे. सणासुदीच्या काळातदेखील सोन्याला वाढती मागणी असल्याने सोन्याचे भाव लाखाच्या पलीकडे गेले आहेत. रशियन-युक्रेन युद्धामध्ये काही सकारात्मक बातमी आली तरच सोन्याची भाववाढ काही प्रमाणात मंदावेल, अशी शक्यता आहे.

रिझर्व्ह बँकेने 4 ते 6 ऑगस्ट दरम्यान झालेल्या पतधोरण आढावा बैठकीत रेपो दर 5.50 टक्क्यांवर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला. वाढती जागतिक अनिश्चितता आणि अमेरिकेच्या टॅरिफ धोरणांचा विचार करता हा निर्णय घेण्यात आला आहे. आर्थिक वर्ष 2025-26 साठी महागाईचा अंदाज दर 4 ते 4.5 टक्क्यांदरम्यान ठेवण्यात आला आहे.

भारतीय वस्त्र उद्योग ज्वेलरी (हिरा, सोन्याचे दागिने), वाहनाचे सुटे भाग, रसायने, ब्रँडेड कपडे आणि खाद्यपदार्थ अशी श्रेणी या आयात शुल्कमुळे सर्वाधिक प्रभावित होणार आहे. यामुळे वरील वस्तूंच्या निर्यातींमध्ये 30 ते 50 टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते, ज्यामुळे कपड्यांचे, दागिन्यांचे आणि सागरी खाद्य निर्यात करणार्‍या कंपन्यांना मोठा आर्थिक तडाखा बसण्याची शक्यता आहे. मूडीज या पतमानांकन संस्थेकडून भारतीय अर्थव्यवस्था वृद्धीदर 0.3 टक्क्यांपर्यंत कमी होण्याचा इशारा दिला. टॅरिफमुळे भारताच्या उत्पादन धोरणाला धोका पोहोचू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

रिझर्व्ह बँकेने ए यु स्मॉल फायनान्स बँकला युनिव्हर्सल बँकेचा तात्पुरता परवाना (तत्त्वत: मंजुरी) दिला असून, 2015 नंतर अशा प्रकारची मान्यता मिळवणारी ती पहिली बँक ठरली आहे. अंतिम परवान्यासाठी संस्थापक संजय अग्रवाल यांना त्यांचा 22 टक्के हिस्सा नॉन-ऑपरेटिव्ह फायनान्शिअल होल्डिंग कंपनीमध्ये हलवावा लागणार आहे. स्मॉल फायनान्स बँक या प्रामुख्याने ग्रामीण भागात लघु स्वरूपाच्या उद्योगधंद्यांना छोटी कर्ज देण्यासाठी उभारल्या जातात आणि त्यांचे एकूण आर्थिक स्थिती आणि कामगिरी बघून मग त्याचे सर्वसमावेशक अशा युनिव्हर्सल बँकेत रूपांतरण केले जाते.

भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी शुक्रवारी लोकसभेत सादर केलेले आयकर विधेयक, 2025 मागे घेतले आहे. सरकार निवड समितीच्या नव्या सूचनांसह या विधेयकाला सोमवार, 11 ऑगस्टला सादर करेल. हे नवीन विधेयक आयकर कायदा, 1961 च्या बदल्यात लागू केले जाणार आहे. सूचना देण्यासाठी 31 सदस्यांची समिती नियुक्त करण्यात आली होती. जुन्या आवृत्तीच्या विधेयकामध्ये अनेक वकिलांनी तसेच सनदी लेखापालांनी दुरुस्त्या सुचवल्या होत्या. 1 एप्रिल 2026 पासून हे विधेयक लागू करण्याच्या प्रयत्नात केंद्र सरकार आहे. एक ऑगस्टअखेर संपलेल्या सप्ताहात भारताची विदेश चलन गंगाजळी 9.32 अब्ज डॉलर्सनी घटून 688.87 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT