जगदीश काळे
तुमच्या कार किंवा बाईकमध्ये इंधन भरण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरत असाल, तर बिलात ‘फ्यूएल सरचार्ज’ नावाचे अतिरिक्त शुल्क पाहून तुम्हीही कदाचित काळजीत पडला असाल. मात्र, दिलासादायक बाब अशी की, अनेक बँका हे शुल्क परत करतात, ज्याला ‘फ्यूल सरचार्ज वेवर’ (अधिभार सवलत) असे म्हटले जाते.
जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करून पेट्रोल किंवा डिझेल भरता, तेव्हा तुमच्या बिलात एक अतिरिक्त शुल्क जोडले जाते, ज्याला ‘फ्यूएल सरचार्ज’ (इंधन अधिभार) असे म्हणतात. साधारणपणे हे शुल्क 1 ते 2.5 टक्क्यांच्या दरम्यान असते. मात्र, दिलासादायक बाब अशी की, अनेक बँका हे शुल्क परत करतात, ज्याला ‘फ्यूल सरचार्ज वेवर’ (अधिभार सवलत) असे म्हटले जाते. ही सुविधा काही अटी आणि मर्यादांच्या अधीन असते, ज्यामुळे वाहनधारकांची दरमहा थोडी बचत होऊ शकते.
आधीच इंधनाचे दर वाढलेले असताना हे जास्तीचे पैसे का कापले जात आहेत, असा प्रश्न अनेकांना पडतो. परंतु, बँका हे पैसे तुमच्या खात्यात परत जमा करतात. कार्ड विकताना एजंट या सुविधेचा एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणून उल्लेख करतात. ही प्रणाली नेमकी कशी कार्य करते, ते आपण समजून घेऊया.
सवलत : डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी बँका हा अधिभार स्वतःच्या खिशातून सोसतात. जेव्हा तुम्ही पेट्रोल पंपावर कार्ड वापरता, तेव्हा सुरुवातीला अधिभारासह संपूर्ण रक्कम कापली जाते. त्यानंतर 1 ते 3 दिवसांत किंवा पुढच्या महिन्याच्या विवरणपत्रात बँक ती अधिभाराची रक्कम तुमच्या कार्डवर परत जमा (रिव्हर्स) करते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, बँका केवळ अधिभाराची मूळ रक्कम परत करतात, त्यावरील ‘जीएसटी’ परत मिळत नाही.
डेबिट कार्ड रोख रकमेसाठी नियम : डेबिट कार्डवरही इंधन अधिभार लागू शकतो. काही बँका यावर सवलत देतात; परंतु त्याचे नियम क्रेडिट कार्डच्या तुलनेत अधिक कडक असू शकतात. जर तुम्ही रोखीने व्यवहार केला, तर कोणताही अधिभार लागत नाही. कारण, त्यात कोणत्याही बँक किंवा नेटवर्कचे शुल्क समाविष्ट नसते.
सवलत मिळवण्यासाठी अटी : बँका ही सवलत देण्यासाठी काही अटी ठेवतात : व्यवहार मर्यादा : सहसा ही सवलत तेव्हाच मिळते जेव्हा तुम्ही किमान 400 रुपये ते कमाल 4,000 किंवा 5,000 रुपयांपर्यंतचे इंधन भरता. मासिक मर्यादा: एका महिन्यात तुम्ही जास्तीत जास्त किती रक्कम परत मिळवू शकता, याची एक मर्यादा (उदा. 100 किंवा 250 रुपये) निश्चित केलेली असते.
ठरावीक पेट्रोल पंप : काही कार्डे केवळ विशिष्ट तेल कंपन्यांच्या (उदा. एचपीसीएल किंवा बीपीसीएल) पंपांवरच ही सुविधा देतात.
जेव्हा तुम्ही कार्डद्वारे पैसे भरता, तेव्हा पेट्रोल पंप मालकाला बँक आणि कार्ड नेटवर्कला (उदा. व्हिसा किंवा मास्टरकार्ड) व्यवहार शुल्क (ट्रांझॅक्शन फी) द्यावे लागते. पेट्रोल आणि डिझेलवरील नफ्याचे प्रमाण (मार्जिन) अत्यंत कमी असल्याने, पंप मालक या शुल्काचा बोजा स्वतः न सोसता तो ग्राहकांवर टाकतात. यामुळेच बिलात वेगळा अधिभार जोडला जातो.