अर्थभान

परदेशी गुंतवणुकीचा भारतात ओघ वाढला! या आठवड्यात ओतला 'इतका' पैसा

FPI | देशांतर्गत गुंतवणूकदारांचीही महत्त्वाची भूमिका

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

भारतीय शेअर बाजारात परदेशी गुंतवणूकदारांचा (foreign investors) ओघ वाढला आहे. परदेशी गुंतवणूकदार या आठवड्यात (१९-२३ ऑगस्ट) भारतीय शेअर बाजारात (Indian stock market) निव्वळ खरेदीदार बनले आहेत. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) च्या आकडेवारीनुसार, परदेशी गुंतवणूकदारांनी ४,८९७.१६ कोटी रुपयांच्या शेअर्सची निव्वळ खरेदी केली. याबाबतचे वृत्त ANI ने दिले आहे.

मागील आठवड्याच्या (१२-१७ ऑगस्ट) तुलनेत हा लक्षणीय बदल आहे. कारण या कालावधीत परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ७,७६९.७३ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली होती. पण आता परदेशी गुंतवणूकदार खरेदीकडे वळले आहेत. दरम्यान, या आठवड्यातील परदेशी गुंतवणुकीचा ओघ सकारात्मक राहिला असूनही, ऑगस्टमध्ये परदेशी गुंतवणूकदारांची एकूणच निव्वळ गुंतवणूक नकारात्मक पातळीवर राहिली.

या महिन्यात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारात १६,३०५ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. हा ट्रेंड या महिन्यातील परकीय गुंतवणुकीच्या पॅटर्नमधील अस्थिरता दर्शवतो.

देशांतर्गत गुंतवणूकदारांचीही महत्त्वाची भूमिका

विशेष बाब म्हणजे, ऑगस्टमध्ये परदेशी गुंतवणूकदार निव्वळ विक्रेते बनले असताना भारतीय शेअर बाजारात देशांतर्गत गुंतवणूकदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यामुळे शेअर बाजाराला मोठा आधार मिळाला. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) च्या अधिकृत आकडेवारीनुसार, देशांतर्गत गुंतवणूकदारांची सातत्याने भारतीय शेअर्समध्ये खरेदी राहिली आहे. त्यांनी ऑगस्टमध्ये ४७,०८०.३८ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली. या मजबूत देशांतर्गत गुंतवणुकीमुळे परदेशी गुंतवणुकीच्या चढ-उताराच्या काळात बाजाराला स्थैर्य राखण्यास मदत झाली आहे.

परदेशी गुंतवणुकीमुळे शेअर बाजार गतिमान

नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) च्या आकडेवारीनुसार, जुलैच्या सुरुवातीला भारतीय शेअर बाजारातील परदेशी गुंतवणूक ३२,३६५ कोटी रुपयांवर पोहोचली होती. कारण या कालावधीत परदेशी गुंतवणूकदार निव्वळ खरेदीदार राहिले होते. परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांचा (FPI) भारतीय शेअर बाजारातील ओघ हा बाजारातील गतिशीलता प्रभावित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT