अर्थभान

फ्लेक्झी फिक्स्ड डिपॉझिटच्या अंतरंगात… | पुढारी

Pudhari News

अनिल विद्याधर

बहुतांश बँका सध्याच्या काळात मुदत ठेवींवर 6.5 टक्क्यांपासून 7.5 टक्क्क्यांपर्यंत व्याज देत आहेत. काही खासगी आणि सहकारी बँका आठ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत. परंतु आपल्याला आपत्कालीन स्थितीत पैसे काढायचे असल्यास बरेचदा दंड आकारला जातो किंवा व्याज मिळत नाही. अशा स्थितीत एफएफडी (फ्लेक्झी फिक्स्ड डिपॉझिट) हा एक उत्तम पर्याय आहे. आपल्या खात्यात दरमहा मोठी रक्‍कम जमा होत असेल आणि ती बचत खात्यात राहत असेल तर ती रक्‍कम मुदत ठेवीत ठेवण्यापेक्षा एफएफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करा. निश्‍चित रकमेनंतरची उर्वरित रक्‍कम या एफएफडीत आपोआप जमा होईल आणि व्याजदर नियमित एफडीप्रमाणे मिळेल. तसेच रक्‍कम काढल्यास पेनल्टीही आकारली जात नाही.

एक काळ होता की, बँका दीर्घकाळ मुदतठेवीवर 14 टक्क्यांपर्यंत व्याज देत होत्या. मात्र कालांतराने व्याजदरात घसरण झाली आणि सध्याच्या काळात बँका आता मुदत ठेवीवर केवळ 6.5 टक्क्यांपासून 7.5 टक्के व्याज देत आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून मुदत ठेवीत पैसे ठेवणारे गुंतवणूकदार आता तुलनेने चांगला परतावा देणार्‍या म्युच्युअल फंड आणि शेअर बाजाराकडे वळत आहेत. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारात मिळणारा परतावा हा मुदत ठेवींच्या तुलनेत अधिकच असतो, मात्र या दोन्हीतील गुंतवणुकीत जोखीम अधिक असते. गुंतवणुकीचा सोपा फॉर्म्युला म्हणजे, जेवढी अधिक जोखीम तेवढा परतावाही अधिक. ज्या गुंतवणूकदारांकडे जोखीम उचलण्याची क्षमता असते तेच म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणुकीवर अधिक विश्‍वास ठेवतात. मात्र ज्या गुंतवणूकदारांकडे जोखीम उचलण्याची क्षमता नाही, ते आजही बँकेच्या मुदत ठेवी योजनेत पैसे ठेवतात. पण सध्या मुदत ठेवीचे व्याजदर कमी झाल्यामुळे या गुंतवणूकदारांचे नुकसान होत आहे. 

बँकिंग क्षेत्रातील नियमानुसार आपण बँकेत कितीही पैसा जमा केला किंवा बँक दिवाळखोरीत निघाली असेल तर सरकार आपल्या खात्यात जमा असलेल्या रक्कमेपैकी केवळ एक लाख रुपये परत करण्याची जबाबदारी उचलते. हा नियम खातेदारांसाठी योग्य नसतानाही लोकांचा बँकेप्रती विश्‍वास कायम आहे आणि याच कारणामुळे कमी व्याजदर असतानाही नागरिक मुदत ठेवीला सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून मानतात. जर आपल्या खात्यात काही अतिरिक्‍त रक्कम पडून असेल आणि ही रक्कम मुदत ठेवीमध्ये गुंतवण्याचा विचार करत असाल तर बँकेने एफडीशिवाय एफएफडी म्हणजेच फ्लेक्झी फिक्स्ड डिपॉझिटचा पर्याय सुरू केला आहे. या पर्यायाच्या आधारे गुंतवणूकदारांना अनेक लाभ मिळू शकतात. 

काय आहे फ्लेक्झी फिक्स्ड डिपॉझिट?

फ्लेक्झी फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच एफएफडी हा एक एफडीचाच एक प्रकार आहे. या मुदत ठेवीत आपण सात दिवसांपासून दहा वर्षांच्या काळापर्यंत रक्कम जमा करू शकता. बँक आपल्याला सध्याच्या काळानुसार 6.5 पासून ते 7.5 टक्क्यांपर्यंत व्याज देते. काही खासगी बँका आठ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत. बँकेत मुदत ठेवण्याचे एकच नुकसान म्हणजे जर आपल्याला पैशाची गरज भासली तर आपल्याला मुदतठेव मोडावी लागेल आणि त्यासाठी आपल्याला पेनल्टीही भरावी लागेल. अनेक बँका तर मुदत ठेवी रक्कमेच्या एक टक्क्यांपर्यतच पेनल्टी वसूल करतात. अशावेळी मुदत ठेवीतून मिळणारा फायदा हा असून नसल्यासारखा ठरतो. यावर उपाय म्हणून अनेक बँकांनी एफएफडी सुविधा सुरू केली आहे. बँकेत बचत खाते सुरू करणार्‍या खातेदारांना ही सुविधा दिली जाते. या सुविधाच्या नियमानुसार बचत खातेधारकांच्या खातेमध्ये एक निश्‍चित रक्कमेपेक्षा अधिक रक्कम जमा होत असेल तर ती रक्कम आपोआप एफएफडीच्या खात्यात ट्रान्स्फर होते. 

याचा फायदा म्हणजे बचत खात्यातून आपल्याला केवळ 3.5 पासून 4 टक्क्यापर्यंतचे व्याजदर मिळते. तर एफएफडीच्या खात्यात ही रक्कम गेल्यानंतर त्या रक्कमेवर मुदत ठेवीच्या व्याजदराप्रमाणे व्याज आकारले जाते. 

 उदा. श्रीनिवासचे बचत खाते असून त्या खात्यावर बँकेने एफएफडीची सुविधा प्रदान केलेली आहे. त्याची मर्यादा 50 हजार रुपयांपेक्षा अधिक आहे. जर श्रीनिवासच्या बँक खात्यात जर 50 हजार रुपये राहत असतील तर बचत खात्यावर मिळणार्‍या व्याजाप्रमाणे त्याला व्याज मिळेल. मात्र त्याच्या खात्यात जर एक लाख रुपये असतील तर 50 हजारांची रक्कम आपोआप एफएफडी खात्यात ट्रान्स्फर होईल आणि त्यावर एफडीच्या हिशोबाने व्याज मिळेल. 

लॉक इन पिरीयड नाही

एफएफडी सुविधा असणार्‍या खात्यावर सामान्य मुदत ठेवीप्रमाणे लॉक इन पिरीयड नसतो. म्हणजेच रक्कम काढल्यानंतर कोणतीही पेनल्टी आकारली जात नाही. एफएफडीच्या सुविधेनुसार खातेधारक हा कितीही रक्कम खात्यातून काढू शकतो. मग त्याची थोडीफार रक्कम एफएफडीमध्ये ट्रान्स्फर झालेली का असेना. एफएफडीमध्ये असलेल्या रक्कमेवर व्याज दिले जाते. मग ती रक्कम दहा हजार असो किंवा एक लाख असो. त्याचा फायदा कालावधीनुसार खातेधारकाला मिळत जातो. 

ही रक्कम आपत्कालीन फंडसाठीदेखील उपयुक्‍त ठरते. कालांतराने दरमहा दहा ते 20 हजार रुपये बाजूला पडत गेले तर वर्षाकाठी आपण एक-दीड लाखाचा निधी जमा करू शकतो आणि त्यावर सात टक्क्यांच्या आसपास व्याजही मिळेल. तसेच आपत्कालीन स्थितीत पैसे काढल्यास पेनल्टीदेखील बसत नाही.    

 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT