महिलांच्या उन्नतीसाठी अर्थनीतीची पंचसूत्रे Pudhari File Photo
अर्थभान

महिलांच्या उन्नतीसाठी अर्थनीतीची पंचसूत्रे

पुढारी वृत्तसेवा
अनिल पाटील, प्रवर्तक, एस. पी. वेल्थ, कोल्हापूर

महिला जरी कुटुंबाचा भक्कम घटक असली, तरीही अजून आर्थिक दोरी तिच्या हाती नाही. यासाठी महिलांमधील अर्थसाक्षरता वाढवायला हवी. महिलांनी आर्थिक उन्नती साधायची असेल, तर पंचसूत्री अर्थनीतीचा अवलंब केला पाहिजे.

अर्थनीती स्वतःसाठी आणि त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिरता, सुरक्षितता आणि समृद्धता निर्माण करण्यासाठी एक शक्तिशाली साधन आहे. या नीतीचा अवलंब केल्याने महिलांच्या आयुष्यात मोठी संपत्ती निर्माण होईल. त्यामुळे तिच्या जगण्याला समाजात मान- सन्मानासह एक विशेष अर्थ लाभेल.

जिच्या हाती कुटुंबाची आर्थिक दोरी...

आर्थिक दोरी म्हणजे काय - प्रत्येक महिलेला माझ्या कुटुंबात पैसा किती येतो? खर्च किती होतो? शिल्लक किती राहतो? आवश्यक की अनावश्यक गोष्टीवर खर्च होतो? आपत्ती व्यवस्थापनासाठी आर्थिक तरतूद कशी हवी? कुटुंबाचे परिपूर्ण जोखीम व्यवस्थापन करताना कोणकोणत्या विमा योजना हव्यात? कुटुंबातील सदस्यांची आर्थिक उद्दिष्टे कोण कोणती आहेत? कोणत्या गरजेसाठी कुठल्या वर्षी किती पैसा लागणार? नवीन घर, चारचाकी गाडी खरेदी, मुलांचे उच्च शिक्षण तयारी, लग्ने, परदेशी सहल, रिटायरमेंट प्लॅनिंग, अशी अनेक प्रकारची आर्थिक उद्दिष्टे साकार करण्यासाठी प्रत्येक महिलेला कुटुंबाचा अर्थसंकल्प मांडता आले पाहिजे. कुटुंबाची निव्वळ मालमत्ता किती आहे? कर्जे किती आहेत? गुंतवणूक मालमत्ता विभागणी कशी आहे, मालमत्तेच्या नोंदी ठेवल्या पाहिजेत. त्याच ठिकाणी योग्य वारसांची नोंद केली पाहिजे.

प्रत्येक महिलेला सर्व गोष्टींची माहिती असणे, ही काळाची गरज आहे. त्यासाठी महिलांनी साक्षरतेचे धडे घेऊन संसाराची आर्थिक दोरी आपल्या हाती घेतली पाहिजे. देशाच्या अर्थमंत्री प्रत्येक वर्षी अर्थ संकल्प मांडतात, तसे प्रत्येक गृहलक्ष्मीने कुटुंबाचा अर्थसंकल्प मांडला पाहिजे. मोठ्या खर्चासाठी योग्य वेळी गुंतवणूक केली पाहिजे.

प्रत्येक महिलेला कुटुंबातील अनेक नाती सांभाळत महत्त्वाच्या जबाबदार्‍या पार पाडाव्या लागतात. महिला आर्थिकद़ृष्ट्या सक्षम असतील तरच त्यांच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो, अन्यथा पैशासाठी सातत्याने दुसर्‍याकडे हात पसरावे लागतात. तिच्या प्रत्येक गरजेला पैसे मागताना ती हतबल होते. जोपर्यंत पती आहे तोपर्यंत काही काळजी नसते. पतीच्या मृत्यूनंतर हलाखीचे दिवस चालू होतात. पण, याच महिलांना गुंतवणूक आणि बचतीचे ज्ञान मिळाले, तर खर्चासाठी मिळालेल्या पैशातून काटकसर करून योग्य ठिकाणी गुंतवणूक केली, तर त्या महिलांची आयुष्याची संध्याकाळ सुखात आणि आनंदात जाते. आर्थिक शहाणपण नसल्याने गुंतवणुकीचे निर्णय चुकतात. त्यामुळे मोठे नुकसान सोसावे लागते.

अलीकडे उच्च शिक्षण घेऊन मुली उद्योग, नोकरी, व्यवसायात अग्रेसर आहेत. करिअरच्या सुरुवातीस पैसा आला की, चैनीखोर प्रवृत्ती बळावत आहे. गुंतवणुकीला प्राधान्य देत नाहीत. पैशाच्या व्यवस्थापना बाबत गंध नाही. आर्थिक नियोजन माहीत नाही. यूट्यूबवर पाहून गुंतवणूक करतात. अल्प काळात फायदा घेण्याच्या नादात नुकसान करून घेतात. लग्नानंतर अपत्य झाले की उत्पन्न बंद होते. त्याच वेळी होमलोन, कारलोनचे हप्ते चालू होतात. कर्जे फेडण्यात आयुष्य निघून जाते.

यशस्वी आर्थिक नीतीसाठी ही पंचसूत्रे अंमलात आणली पाहिजेत.

1) आपत्ती व्यवस्थापन - कोरोना काळात ज्या महिलांनी बचत करून पैसा साठविला होता, त्यांचे दिवस मजेत गेले. ज्यांच्याकडे बचत नव्हती, त्यांना उधारी अन् उसनवारी करण्याची वेळ आली. काटकसरीने बचत करून त्यानंतर गुंतवणूक करणे, हे संपत्ती उभारणीचे मूलभूत तत्त्व आहे. काटकसर करून पैसे वाचविणे म्हणजे

स्वतःचे उत्पन्न निर्माण केल्यासारखे आहे. हे घरच्या महिलेने लक्षात घेतले पाहिजे. आर्थिक स्थिरतेसाठी प्रथम बचत करणे आवश्यक आहे. आपल्या घरात 100 रु. येत असतील, तर 40 रु. दैनंदिन खर्चासाठी वापरा, 30 रु. पर्यंत कर्ज हप्त्यासाठी, 6 रु. विमा संरक्षणासाठी, किमान 25 ते 30 रु. भविष्यासाठी म्हणून गुंतवणूक केली पाहिजे.

कोणत्याही घटनेमुळे, अपघात, आजारपण, नोकरीतील बदल या कारणांनी उत्पन्न जर बंद झाले तर किमान 6 ते 9 महिन्यांच्या खर्चास पुरेल एवढी रक्कम आपल्याजवळ ठेवावी. अनेक महिलांचा बचतीकडे कल असतो; मात्र त्या वर्षांनुवर्षे हा पैसा घरीच ठेवतात, ज्यामुळे महागाई त्याचे मूल्य घटवत जाते, याची जाणीव त्यांना नसते. त्यामुळे काटकसर करून बचत करावी आणि गरजेपुरता निधी बाजूला ठेवून उर्वरित रकमेची योग्य ठिकाणी गुंतवणूक करावी.

2) जोखीम व्यवस्थापन - अनेक विधवा, पतीच्या मृत्यूनंतर आर्थिक संकटांना तोंड देत कष्ट करून संसाराचा गाडा चालवीत आहेत. कुटुंबात पती नाही आणि आर्थिक आधारही नाही. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक भवितव्य अंधारमय झाले आहे. अनेक महिलांना आपल्या पतीचा विमा कसा असावा? याची माहिती नसते. पतीच्या मृत्यूनंतर घरात उत्पन्न येणे थांबते; पण खर्च सुरूच राहतो. अशा परिस्थितीत संसाराचा गाडा चालवण्यासाठी कोणते विमे आवश्यक आहेत, याची संपूर्ण माहिती प्रत्येक महिलेला असणे गरजेचे आहे. बर्‍याच वेळा कुटुंबातील एखाद्या सदस्याला गंभीर आजार होतो. त्यामुळे साठवलेली सर्व बचत खर्च होते आणि कुटुंब कर्जबाजारी होते. त्यामुळे प्रत्येक महिलेला आपल्या पतीसाठी टर्म प्लॅन, जीवन विमा, अपघाती विमा आणि गरजेनुसार वैद्यकीय विमा घेणे आवश्यक आहे. तसेच, घरातील महिलांनी हे विम्याचे हप्ते जागरूकतेने भरावेत आणि त्यांच्या नोंदी स्वतःच्या देखरेखीखाली व्यवस्थित ठेवाव्यात. आपली वारस नोंद आहे का, ते पाहावे .

3) आर्थिक उद्दिष्टे ठरवा - कित्येक कुटुंबप्रमुख आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी पैसा देऊ शकत नाहीत. त्यांची मुले दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहिली आहेत. याचे कारण पालकांनी मुलांच्या उच्च शिक्षणासाठी येणारा खर्च कधीच विचारात घेतला नाही. दर्जेदार शिक्षणासाठी मोठा पैसा लागतो. त्यासाठी दीर्घकालीन नियोजन हवे असते. आपल्या कुटुंबातील सदस्यांची भविष्यातील आर्थिक उद्दिष्टे ठरविली पाहिजेत. उदा. मुलांचे उच्च शिक्षण, नवीन घर खरेदी, परदेशी सहल, चारचाकी वाहन खरेदी या उद्दिष्टांसाठी वाढत्या महागाईनुसार किती पैसा लागणार आहे? याची माहिती घेऊन आर्थिक धोरण महिलांनी ठरविले पाहिजे, मगच गुंतवणूक केली पाहिजे .

वयाच्या साठीनंतर अनेक महिलांकडे आर्थिक पाठबळ नसते. अशा वेळी पतीचा आधारही नसेल, तर त्या आपल्या घरातच अडगळ बनून राहतात. महिलांना आधारदायी, प्रेमदायी, आरामदायी आणि सुरक्षित भविष्य सुनिश्चित करण्यासाठी दर महिन्याला नियमित उत्पन्न मिळणे आवश्यक आहे. यासाठी मोठा निधी तयार करणे महत्त्वाचे आहे. सामान्यतः, पुरुषांपेक्षा महिलांचे आयुष्य पाच ते दहा वर्षांनी अधिक असते. त्यामुळे वैधव्याचा सामना करण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी त्यांना अनेक आर्थिक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे आयुष्याच्या संध्याकाळी महिलांनी पुरेसा निधी उभारण्यासाठी योग्य आर्थिक नियोजन करणे अत्यावश्यक आहे. यासाठी गुंतवणूक करताना जोखीमयुक्तदीर्घकालीन योजनेत केली पाहिजे. बँक एफ.डी., पारंपरिक आयुर्विमा योजनेतील गुंतवणूक फायदेशीर ठरत नाही. कारण, ही गुंतवणूक सध्याच्या महागाईवर मात करीत नाही. आजच्या खर्चानुसार वृद्धापकाळात दर महिन्याला पैशाचा प्रवाह आला पाहिजे . आयुष्याच्या संध्याकाळी रोखीची संपत्ती हवी, ही गोष्ट फार महत्त्वाची असते .

4) आर्थिक मालमत्तेचे नियोजन करणे - आर्थिक मालमत्तेचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. अनेकदा आयुष्याच्या संध्याकाळी करोडो रुपयांची स्थावर मालमत्ता असते; पण दैनंदिन खर्चासाठी, आजारपणासाठी आवश्यक रोख रक्कम जवळ नसते. रोखीची संपत्ती आणि सततचा पैशांचा प्रवाह असणे गरजेचे असते. स्थावर संपत्ती महिला विक्री करू शकत नाहीत. सदर संपत्ती ही पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होत असते. बँक ठेवी, शेअर्स, म्युच्युअल फंड यामध्ये रोख रक्कम उपलब्ध करून देणे, आपल्या गरजेनुसार पोर्ट फोलिओ तयार करणे, गुंतवणुकीतील जोखीम कमी करणे, मालमत्तेचे योग्य वाटप आणि संरक्षण करणे, तसेच मृत्यूनंतर ती कशी वितरित केली जाईल, यासाठी योग्य इस्टेट प्लॅनिंग तयार करणे गरजेचे आहे. या सर्व बाबींची माहिती प्रत्येक महिलेला असणे आवश्यकच आहे.

5) मालमत्तेची नोंद आणि वारसाची नोंद - अनेक महिलांना पतीने केलेल्या आर्थिक व्यवहारांची माहिती नसते. परिणामी, देशभरातील बँका, प्रॉव्हिडंट फंड, म्युच्युअल फंड, पोस्ट ऑफिस, शेअर मार्केट आणि आयुर्विमा कंपन्यांमध्ये तब्बल अंदाजे 2 लाख कोटी रुपये बेवारस अवस्थेत पडून आहेत. त्यामुळे प्रत्येक महिलेला आपल्या पतीने कोणत्या ठिकाणी गुंतवणूक केली आहे, याची माहिती असणे आवश्यक आहे. बँक खाती, शेअर्स, म्युच्युअल फंड, बाँड, प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन योजना, विविध विमा योजना या सर्व बाबींची नोंद एका तक्त्यात ठेवली पाहिजे. महिलांनी आपल्या संपत्तीचे योग्य संरक्षण करण्यासाठी चांगल्या सल्लागाराची मदत घेऊन नियोजन करावे. कौटुंबिक आर्थिक स्थितीची संपूर्ण जाणीव ठेवली पाहिजे.

महिलांनी आर्थिक शिस्तीचे धडे घेतलेे पाहिजेत. अल्प काळासाठी सुरक्षित, दीर्घ काळासाठी जोखीमयुक्त गुंतवणूक केली पाहिजे. एका मार्गाने येणारे उत्पन्न धोकादायक असते. कारण, तो मार्ग बंद झाला तर कुटुंब आर्थिक अडचणीत येऊ शकते. अनेक मार्गांनी उत्पन्न आले पाहिजे. काटकसर करून एसआयपीद्वारे गुंतवणूक केली, तर दीर्घकाळात मोठी संपत्ती निर्माण होऊ शकते. व त्यामधून एसडब्ल्यूपीद्वारे दर महिन्याला उत्पन्न निर्माण करता येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT