अर्थभान

अर्थसंकल्प २०१९-२० मधील ‘बदलांचे’ फायदे मिळवा

Pudhari News

सतीश जाधव

सरकारने मांडलेल्या आगामी आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या करसवलतीमुळे सामान्य गुंतवणूकदारांना बचतीबरोबरच लघू योजना, पीपीएफ, एनपीएस, जीवन विमा, म्युच्युअल फंडमध्ये अधिक गुंतवणूक करण्याची संधी आहे…

नव्या आर्थिक वर्षात नोकरदारांना आणि गुंतवणूकदारांना करसवलतीचा लाभ घेण्याची मोठी संधी चालून आली आहे. करसवलत देणार्‍या योजना, गृहकर्ज, मुदत ठेवी आदींच्या माध्यमातून सामान्य गुंतवणूकदार करसवलत पदरात पाडून घेऊ शकतो. एक फेब्रुवारी रोजी सरकारने मांडलेल्या आगामी आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात करसवलतीची मर्यादा पाच लाखांपर्यंत केली आहे. स्टँडर्ड डिडक्शन 40 हजारांवरून 50 हजार तर मुदत ठेवीवर 40 हजारांपर्यंतचे व्याज करमुक्त असणार आहे. या सवलतीमुळे सामान्य गुंतवणूकदारांना लघू योजना, पीपीएफ, एनपीएस, जीवन विमा, म्युच्युअल फंडमध्ये अधिक गुंतवणूक करण्याची संधी आहे. अशा स्थितीत प्राप्तिकराच्या कलम 80 क नुसार दीड लाखापर्यंतच्या गुंतवणुकीबरोबरच वैद्यकीय विमा आणि स्टँडर्ड डिडक्शनच्या माध्यमातूनही चांगली बचत करता येणे शक्य आहे. 

पुढील वर्षांपासून करा नवी बचत

प्राप्तिकरासंबंधी अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या सवलती या एप्रिल 2019 पासून लागू होणार आहेत. अशा स्थितीत जर आपण नवीन सवलतीच्या हिशोबाने सवलत करू इच्छित असाल तर 1 एप्रिलनंतर गुंतवणूक सुरू करावी. उदा. जर आपल्याकडे निवृत्तीविषयक कोणतीही योजना नसेल तर नॅशनल पेन्शन स्कीम (एनपीएस) हा सर्वोत्तम पर्याय राहू शकतो. जर आपण सेवानिवृत्तीचा प्लान घेतलेला असेल आणि पाच ते दहा वर्षांच्या कालावधीत आपल्याला मोटार, मुलांचे शिक्षण किंवा घर आदींसाठी पैसा हवा असेल तर मुदत ठेवी, एनएससी, किसान विकास पत्र आदी ठिकाणी गुंतवणूक करू शकता. त्याचवेळी जोखीम पत्करून चांगला परतावा देणार्‍या योजनांची निवड करण्याची तयारी असेल तर करसवलत देणार्‍या इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीमची निवड करू शकता. 

एनपीएस योजना ही आपले भविष्य सुरक्षित करण्याचे योग्य माध्यम आहे. यात किमान 15 वर्षे गुंतवणूक करू शकता. त्यात सेवानिवृत्ती किंवा वयाची 60 ओलांडल्यानंतर निवृत्तीवेतन मिळते. या योजनेतून काही प्रमाणात पैसेही काढता येतात. एनपीएसमध्ये सरकारने आपली सबसिडी 10 ते 14 टक्के केली आहे आणि 60 टक्क्यांपर्यंत रक्कम काढण्याला करमुक्त श्रेणीत ठेवण्यात आला आहे. एनपीएसच्या गुंतवणुकीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कलम 80 सीसीडी (1 बी) नुसार 50 हजार रुपयांत गुंतवणूक करून करसवलत मिळवू शकता आणि त्यास कलम 80 सी नुसार दिल्या जाणार्‍या दीड लाखांपर्यंतच्या सवलतीशी जोडले जाणार नाही. याप्रमाणे आपल्याला दोन लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर करसवलत मिळू शकते. यात 1 टियर 2 म्युच्युअल फंड खातेदेखील असते आणि त्यातून आपण कधीही पैसा काढू शकतो. यासाठी आपल्याला इक्विटी किंवा बाँड यात कोठे गुंतवणूक करायची आहे, याची निवड करावी लागणार आहे. जर आपण एखाद्या योजनेची निवड करू शकत नसाल तर फंड मॅनेजरनुसार गुंतवणूक करावी. 

मुदत ठेवीदेखील आकर्षक

प्राप्तिकराच्या नवीन बदलामुळे मुदत ठेवीतील गुंतवणूकदेखील आता आकर्षक पर्याय म्हणून समोर आली आहे. पूर्वी मुदत ठेवीत गुंतवणूक करताना दोन अडचणी होत्या. यात व्याजदर खूपच कमी राहतो आणि दुसरे म्हणजे यात वार्षिक दहा हजारांपेक्षा अधिक व्याज मिळाले तर कर आकारला जातो. मात्र व्याजदर वाढण्याबरोबरच बँका सुमारे 9 टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहेत. त्याचबरोबर एक एप्रिलपासून वार्षिक 40 हजारांपर्यंतचे व्याजही करमुक्त झाले आहे. त्यामुळे तुम्ही पाच वर्षांची करसवलत देणारी मुदत ठेव करून करबचत मिळवू शकता.

लघू बचतीच्या अन्य योजनाही लाभदायी

मुदत ठेवीशिवाय काही लघू योजना तालुका, ग्रामीण पातळीवर लोकप्रिय असतात. त्यात पाचशे रुपयांपासून गुंतवणुकीला सुरुवात करता येते. यात पोस्टाची बचत योजना, राष्ट्रीय बचत योजना (नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट), किसान विकास पत्र आदींचा समावेश आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनादेखील निवृत्ती वेतनधारकांना उपयुक्त ठरतात. या योजनेवर अन्य योजनांच्या तुलनेत एक टक्का व्याज अधिक मिळते. सरकारनेदेखील यावरील व्याजदर गेल्या काही तिमाहीपासून वाढवले आहे. 

घर हवे असेल तर योग्य वेळ

जर आपले स्वत:चे घर नसेल आणि आपण घर खरेदीचा विचार करत असाल तर खरेदीची हीच योग्य वेळ आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत गृहकर्जाच्या व्याजावर दोन लाखांपर्यंत करसवलत मिळवण्यासाठी दावा करू शकतो. जर आपल्याकडे मोठे घर असेल आणि ते विकून लहान घर खरेदीचा विचार करत असाल किंवा लहान घर असेल अणि मोठे घर खरेदीचे नियोजन करत असाल तर नवीन आर्थिक वर्ष ही घर खरेदीची योग्य वेळ आहे. कारण यातील भांडवली नफ्यावर आता 20 टक्के कॅपिटल गेन टॅक्सही लागणार नाही. तसेच दुसर्‍या घराची खरेदी गृहकर्जाच्या मदतीने केली तर त्यावरही सवलत मिळणार आहे.

इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम

जर आपल्याला कमी कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल आणि जोखीम उचलून चांगला परतावा मिळवायचा असेल तर इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (इएलएसएस) हा एक चांगला पर्याय मानला जातो. या करसवलतीबरोबरच आपल्याला चांगला परतावा देणारी योजना आहे. यात आपण केवळ 500 रुपयांच्या एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक सुरू करू शकता. कर सवलतीबरोबरच ही लवचिक योजना आहे. आपण गरज भासल्यास तीन वर्षांनंतर पैसा काढू शकता किंवा गुंतवणूक सुरू ठेवू शकता. यात वार्षिक एक लाखांपर्यतचा परतावा एलटीसीजी कररचनेच्या बाहेर आहे. अशा स्थितीत सामान्य गुंतवणूकदारांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही. 

ज्येष्ठ नागरिकांना लाभ

ज्येष्ठ नागरिकांना कररचनेतील नव्या बदलानंतर अधिक लाभ मिळेल. कारण कलम 80 टीटीबीनुसार पोस्ट ऑफिस किंवा अन्य बचत योजनांवर वार्षिक 50 हजारांपर्यंतच्या व्याजात करसवलत देण्यात आली आहे. मुदत ठेवी आणि अन्य ठेव योजनांवरदेखील ज्येष्ठांना 1 टक्के अधिक परतावा मिळतो. ज्येष्ठांना 80 डीनुसार मेडिकल इन्शुरन्सवर 50 हजारांपर्यंतची करसवलत मिळते.

SCROLL FOR NEXT