जयदीप नार्वेकर
विसाव्या वर्षात गुंतवणूक सुरू करणे सर्वात आदर्श मानले जात असले, तरी ३० किंवा ४० व्या वर्षी सुरू केलेली गुंतवणूक देखील शिस्तबद्ध नियोजनाच्या जोरावर एक मोठा आणि भक्कम निधी (कॉर्पस) उभा करून देऊ शकते. या वयात गुंतवणूक सुरू करताना काही विशेष गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
गुंतवणुकीमध्ये वयाचा खूप मोठा फरक पडतो. कारण, काळ हा चक्रवाढ व्याजाचा (कम्पाऊंडिंग) मुख्य कणा आहे. जितका जास्त काळ पैसा गुंतवलेला राहील, तितका परताव्यावर मिळणारा परतावा वेगाने वाढतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीने १२% वार्षिक परताव्याच्या अपेक्षेने १ लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक केली, तर वयाच्या ६० व्या वर्षी मिळणारा निधी पुढीलप्रमाणे बदलतो. २५ व्या वर्षी गुंतवणूक केल्यास ६० व्या वर्षी त्याचे ५३ लाख रुपये होतात. ३0 व्या वर्षी गुंतवणूक केल्यास त्याचे ३० लाख रुपये होतात. ३५ व्या वर्षी हीच रक्कम १७ लाख रुपये होते, तर ४० व्या वर्षी गुंतवणूक केल्यास वयाच्या ६० व्या वर्षी केवळ १० लाख रुपये हाती येतात. यावरून वेळेचे महत्त्व स्पष्ट होते; परंतु तरीही ३० किंवा ४० व्या वर्षी खचून न जाता बचतीचा दर वाढवून उद्दिष्टे साध्य करता येतात.
या वयात गुंतवणूक प्रवासाची पायाभरणी करताना सर्वात आधी आर्थिक सुरक्षा कवच निर्माण करणे गरजेचे आहे. या टप्प्यावर कुटुंबाची जबाबदारी असल्याने पुरेशा रकमेचा जीवन विमा आणि आरोग्य विमा घेणे अत्यंत बंधनकारक आहे, जेणेकरून कोणत्याही वैद्यकीय आणीबाणीत जमापुंजी खर्च होणार नाही. यासोबतच अचानक येणार्या संकटांसाठी, जसे की नोकरी जाणे किंवा इतर तातडीचे खर्च, यासाठी किमान ६ महिन्यांच्या खर्चासाठी उपयुक्त ठरेल, एवढा आपत्कालीन निधी (इमर्जन्सी फंड) बँक खात्यात किंवा लिक्विड फंडांमध्ये सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे.
उशिरा सुरुवात करणार्यांसाठी...
उशिरा सुरुवात करणार्यांसाठी नेहमीच्या ५०:३०:२० या बजेट नियमात बदल करणे गरजेचे ठरते. नेहमीच्या नियमानुसार ५०% गरजांवर, ३०% इच्छांवर आणि २०% बचतीवर खर्च केले जातात. परंतु, ३० किंवा ४० व्या वर्षी गुंतवणूक करताना ५०% गरजांवर, इच्छा व चैनीचे खर्च कमी करून ते २०% वर आणणे आणि बचतीचा हिस्सा वाढवून तो ३०% करणे फायदेशीर ठरते. यासाठी अनावश्यक चैनीचे खर्च टाळणे, क्रेडिट कार्डचे ३०% ते ५०% व्याज दराचे कर्ज टाळणे आणि बँक खात्यात पडून असलेली अतिरिक्त रक्कम योग्य म्युच्युअल फंडात एकरकमी गुंतवणे फायदेशीर ठरते.
गुंतवणूक करताना प्रत्येक ध्येय निश्चित आणि मोजता येणारे असणे गरजेचे आहे. समजा, मुलाच्या उच्च शिक्षणासाठी १० वर्षांनंतर २० लाख रुपयांची गरज आहे, तर ६% महागाईचा दर विचारात घेता १० वर्षांनंतर त्या शिक्षणाचा खर्च जवळपास ३६ लाख रुपये होईल. हे ३६ लाख रुपयांचे ध्येय गाठण्यासाठी १० वर्षांच्या कालावधीत वेगवेगळ्या परताव्याच्या दरानुसार आवश्यक असणारी मासिक एसआयपी (सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) पुढीलप्रमाणे असेल.
१२% परतावा मिळाल्यास दरमहा १५,४९५ रुपयांची एसआयपी करावी लागेल.१०% परतावा मिळाल्यास ही रक्कम १७,४२९ रुपये असेल, तर ८% परताव्यासाठी १९,५४८ रुपये आणि ६% परतावा अपेक्षित असल्यास दरमहा २१,८५८ रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. ही ध्येये पूर्ण करण्यासाठी पगारदार व्यक्तींनी मासिक एसआयपीचा वापर करावा आणि जेव्हा बोनस किंवा अतिरिक्त उत्पन्न मिळेल, तेव्हा एकरकमी (लम्पसम) गुंतवणूक करून आपले आर्थिक भविष्य सुरक्षित करावे.