नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
इथेनॉल मिश्रित ई-20 पेट्रोलमुळे वाहनाच्या कार्यक्षमतेत (मायलेज) फार विपरीत परिणाम होत नाही. तसेच, इंजिनाचेही नुकसान होत नाही. एका लिटरला असलेली वाहनाची धाव 1 ते सहा टक्क्यांपर्यंतच घटते. जुन्या वाहनांना इंधन प्रणालीशी निगडीत आवश्यक पार्ट बसवल्यास कार्यक्षमतेत सुधारणा होते, असे स्पष्टीकरण पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस मंत्रालयाने दिले आहे.
काही माध्यमांमध्ये पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रण केल्याने वाहनाची कार्यक्षमता घटते. संबंधित वाहनाच्या इंजिनवरही विपरित परिणाम होतो. विशेषतः ज्यांची वाहने जूनी आहेत, त्यांना या अडचणींचा अधिक सामना करावा लागत असल्याचे वृत्त प्रसारित झाले आहे. यावर पेर्ट्रोलियम मंत्रालयाने एक्स या समाजमाध्यमावर दीर्घ खुलासा दिला आहे. त्यात संबंधित वृत्त तथ्यहीन असल्याचे म्हटले आहे. यावृत्तामागे कोणत्याही शास्त्रीय संशोधनाचा आधार नाही. तसा, कोणताही पुरवाही उपलब्ध नसल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
वाहनाची कार्यक्षमता घटण्यामागे पेट्रोल आणि इथेनॉलच्या ज्वलनशीलतेचा आधार घेण्यात आला आहे. इथेनॉल हे पेट्रोलपेक्षा कमी ज्वलनशील असल्याने वाहनाची प्रतिलिटर धावण्याची क्षमता कमी होत असल्याचे म्हटले आहे. मात्र, हा परिणाम अगदी शुल्लक असल्याचे मंत्रालयाचे म्हटले आहे. त्यामुळे ई-20 इंधनाच्या वापरामुळे वाहनाची कार्यक्षमता फार घटते असे म्हणणे तथ्यहीन असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
ई-10 इंधनासाठी तयार केलेली आणि ई-20 इंधन वापरणार्या वाहनाची कार्यक्षमता एक ते 2 टक्क्यांनीच कमी होते. जर एखादे वाहनाचे इंजिन ई-20साठी बनलेले नसेल, तर वाहनाच्या कार्यक्षमतेत 3 ते 6 टक्के घट होते. ही घटही आवश्यक पार्ट बसवल्यानंतर कमी करता येऊ शकते. म्हणजे प्रतिलिटर धाव फार कमी होत नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
इथेनॉल बनविण्यासाठी अतिरिक्त उत्पादित झालेला तांदूळ, मका, खराब जालेले धान्य, ऊस, कृषी कचरा याचा वापर केला जातो. निति आयोगाने केलेल्या अभ्यासात ऊसापासून तयार केलेल्या इथेनॉलमधून पेट्रोलहून 65 टक्के आणि मक्यापासून बनवलेल्या इथेनॉलमधून 50 टक्के हरितवायू उत्सर्जन कमी होते. आर्थिक वर्ष 2024-25पासून कच्च्या तेलावर होणार्या खर्चात 1.40 लाख कोटी रुपयांनी बचत झाली आहे. तर, ग्रामीण अर्थव्यवस्थेत 1.20 लाख कोटी रुपये ओतल्या गेले आहेत.
सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्सने (सियाम) ई-20 इंधनासाठी आवश्यक असलेला पार्ट एप्रिल 2023पासून उपलब्ध करुन दिले आहेत. इंधन प्रणालीमध्ये आवश्यक प्रगत रबराची उपलब्धता आहे. इथेनॉल मिश्रित इंधनात असे रबर दीर्घकाळ काम करू शकते. सामान्य वाहनाचे रबरनळी किंवा गॅस्केट 20 ते 30 हजार किलोमीटरनंतर बदलले जाते. त्याची किंमतही फारशी नाही. गाडीची सर्व्हिसिंग करताना या वस्तू बदलता येतात.