EPFO Update: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या सेवांमध्ये मोठे बदल केले आहेत. CITES (Centralised IT Enabled Services) प्रकल्पांतर्गत सर्व सदस्यांचा डेटा एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्थलांतरित करण्यात आला आहे.
या बदलामुळे पीएफ क्लेम, खाते हस्तांतरण, पेन्शन आणि इतर सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक होणार आहेत. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी या नव्या व्यवस्थेची घोषणा करत EPF आणि EPS सदस्यांसाठी 10 महत्त्वाच्या सुधारणा जाहीर केल्या आहेत.
आर्थिक वर्ष 2025-26 साठीचे EPF व्याज 15 जुलै 2026 पर्यंत सदस्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर सुमारे 1.44 लाख कोटी रुपयांचे व्याज कोट्यवधी खात्यांमध्ये जमा केले जाईल.
आता सदस्यांना EPFO पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर एकच डिजिटल डॅशबोर्ड मिळेल. यावर PF बॅलन्स, क्लेमची स्थिती, पेन्शन रेकॉर्ड आणि सदस्यत्वाशी संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी पाहता येईल.
क्लेम EPFO कार्यालयात पोहोचण्यापूर्वीच त्याची पडताळणी (Auto Pre-validation) होईल. कागदपत्रांमध्ये किंवा माहितीत काही त्रुटी असल्यास सदस्याला आधीच सूचना मिळेल. त्यामुळे क्लेम नाकारला जाण्याचे प्रमाण कमी होईल.
KYC पूर्ण असलेल्या सदस्यांचे 5 लाखांपर्यंतचे अॅडव्हान्स PF क्लेम आता स्वयंचलित पद्धतीने मंजूर केले जातील. यापूर्वी ही मर्यादा 1 लाख होती.
अतिरिक्त माहितीची गरज भासल्यास EPFO ऑनलाइन प्रश्न विचारेल आणि सदस्यही ऑनलाइन उत्तर देऊ शकतील. त्यामुळे कार्यालयात वारंवार जाण्याची गरज राहणार नाही. क्लेम मंजूर झाल्यानंतर रक्कम त्याच दिवशी थेट बँक खात्यात जमा केली जाईल.
अंतिम PF रकमेवर आता मंजुरी मिळालेल्या दिवसापर्यंत व्याज मिळणार आहे. तसेच पैसे काढण्याचे पूर्वीचे 13 नियम कमी करून 3 प्रमुख श्रेणींमध्ये विभागण्यात आले आहेत.
अत्यावश्यक गरजा
घराशी संबंधित गरजा
विशेष परिस्थिती
याशिवाय सदस्यांना त्यांच्या PF शिल्लकीपैकी 75 टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येणार आहे.
आता नोकरी बदलल्यानंतर स्वतंत्र PF ट्रान्सफर अर्ज करण्याची गरज नाही. आधारशी जोडलेल्या UAN च्या माध्यमातून PF खाते आपोआप नव्या संस्थेकडे हस्तांतरित होईल.
सदस्यांना आता त्यांच्या प्रादेशिक कार्यालयापुरते मर्यादित राहावे लागणार नाही. देशातील कोणत्याही EPFO कार्यालयातून माहिती आणि सेवा मिळू शकतील.
EPS पेन्शनधारक आता देशातील कोणत्याही EPFO कार्यालयात लाइफ सर्टिफिकेट जमा करू शकतील आणि इतर सेवांचाही लाभ घेऊ शकतील.
नव्या पेन्शन पेमेंट प्रणाली अंतर्गत आता पेन्शन देशातील कोणत्याही बँक खात्यात जमा केली जाऊ शकते. यापूर्वी पेन्शन PPO शी जोडलेल्या विशिष्ट शाखेतच मिळत होती.
या डिजिटल सुधारणांमुळे PF क्लेम, खाते हस्तांतरण, पैसे काढणे आणि पेन्शन मिळवण्याची प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुलभ होणार आहे. तसेच कागदपत्रांची कटकट कमी होऊन सेवांमध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढेल, असा EPFO चा दावा आहे.