EPFO New Rule: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. 15 जुलैपर्यंत सुमारे 34 कोटी पीएफ खात्यांमध्ये 8.25 टक्के व्याज जमा केले जाणार असल्याची माहिती EPFO ने दिली आहे. यासाठी सुमारे 1.44 लाख कोटी रुपयांचे व्याज थेट खात्यात जमा करण्यात येणार आहे.
यासोबतच EPFO ने CITES 2.01 (Centralised IT Enabled Services) ही नवी डिजिटल प्रणाली लागू केली आहे. या बदलामुळे पीएफशी संबंधित अनेक सेवा अधिक जलद, पारदर्शक आणि सुलभ होणार आहेत.
नवीन प्रणालीमुळे PF बॅलन्स, क्लेमची स्थिती आणि पेन्शनशी संबंधित सर्व माहिती एका पोर्टलवर उपलब्ध होणार आहे. यापुढे कोणत्याही EPFO कार्यालयातून सेवा मिळणार असून विशिष्ट कार्यालयावर अवलंबून राहावे लागणार नाही.
नवीन व्यवस्थेत क्लेम अर्ज करण्यापूर्वीच आवश्यक कागदपत्रे किंवा माहितीमध्ये काही त्रुटी असल्यास सिस्टम त्याची सूचना देईल. त्यामुळे चुकीच्या अर्जामुळे क्लेम नाकारला जाण्याचे प्रमाण कमी होईल. याशिवाय सदस्यांना ते कोणत्या कारणासाठी किती रक्कम काढू शकतात, याची माहितीही आधीच मिळणार आहे.
EPFO ने ऑटो क्लेम सेटलमेंटची मर्यादा 1 लाख रुपयांवरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. पूर्ण KYC असलेल्या खातेदारांचे 5 लाख रुपयांपर्यंतचे आगाऊ क्लेम लवकर मंजूर केले जातील.
जर क्लेमदरम्यान अतिरिक्त माहितीची आवश्यकता भासली, तर ती ऑनलाइन मागवली जाईल आणि सदस्यही ऑनलाइन उत्तर देऊ शकतील. त्यामुळे कार्यालयात वारंवार जाण्याची गरज नाही.
पूर्वी PF काढण्यासाठी असलेले 13 वेगवेगळे नियम कमी करून आता फक्त तीन सोप्या श्रेणींमध्ये विभागण्यात आले आहेत. सदस्यांना त्यांच्या एकूण PF बॅलन्सपैकी 75 टक्क्यांपर्यंत रक्कम काढण्याची सुविधा मिळणार आहे.
विशेष म्हणजे, क्लेम मंजूर झाल्याच्या दिवशी रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाणार असून अंतिम मंजुरीच्या तारखेपर्यंत PF वर व्याजही मिळणार आहे.
नोकरी बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीही EPFO ने महत्त्वाचा बदल केला आहे. आधारशी जोडलेल्या UAN खात्यांचे PF आता आपोआप नवीन नियोक्त्याकडे ट्रान्सफर होईल. यासाठी स्वतंत्र अर्ज किंवा जुन्या-नव्या नियोक्त्याची मंजुरी घेण्याची आवश्यकता राहणार नाही. सेवा कालावधीही आपोआप हस्तांतरित होईल.
नवीन प्रणालीचा लाभ EPS पेन्शनधारकांनाही मिळणार आहे. आता ते देशातील कोणत्याही EPFO कार्यालयात जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) जमा करू शकतील. तसेच देशातील कोणत्याही बँक खात्यात पेन्शन जमा होऊ शकणार आहे.
EPFO च्या माहितीनुसार, 15 जुलैपर्यंत 34 कोटी खात्यांमध्ये 8.25 टक्के व्याज जमा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे यंदा खातेदारांना व्याजासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार नाही.
नवीन डिजिटल प्रणालीमुळे पीएफ क्लेम, ट्रान्सफर, पेन्शन आणि इतर सेवा अधिक वेगवान, सुलभ आणि पारदर्शक होणार असल्याने देशातील कोट्यवधी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना मोठा फायदा होणार आहे.