नवीन EPFO अ‍ॅपद्वारे पैसे काढण्याची सुविधा 
अर्थभान

नवीन EPFO अ‍ॅपद्वारे पैसे काढण्याची सुविधा

पुढारी वृत्तसेवा

मारुती वि. पाटील

एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) चे सदस्य हे लवकरच नवीन मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून यूपीआयद्वारे पीएफचे पैसे आता काढू शकणार आहेत. मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) अ‍ॅप मार्च-एप्रिल 2026 मध्ये लॉन्च करू शकते. सध्या या अ‍ॅपची चाचणी सुरू असून, त्यातील तांत्रिक अडचणी दूर केल्या जात आहेत.

नवीन ‘ईपीएफओ’ अ‍ॅप हे ‘उमंग’ (UMANG)) अ‍ॅपपेक्षा वेगळे असेल. हे अ‍ॅप सदस्यांच्या बँक खात्याशी लिंक केले जाईल. तसेच ते ‘भीम’ आणि इतर यूपीआय अ‍ॅप्सशीही जोडले जाईल. त्यामुळे सदस्यांना पीएफचे पैसे यूपीआयद्वारे थेट बँक खात्यात ट्रान्स्फर करण्याची सुविधा मिळेल. यासाठी ईपीएफओच्या सदस्यांना या अ‍ॅपमध्ये लॉगिन करावे लागेल. तेथे ते आपला पात्र ईपीएफ शिल्लक पाहू शकतील. त्यानंतर यूपीआय पिन टाकून आपला व्यवहार पूर्ण करता येईल. पैसे थेट बँक खात्यात जमा होतील. पासबुक बॅलन्स तपासण्यासारख्या इतर सेवाही या अ‍ॅपमध्ये आपल्याला उपलब्ध असतील.

अ‍ॅपची चाचणी आणि तयारी

ईपीएफओ सध्या 100 डमी खात्यांद्वारे याची चाचणी करत आहे. तपासणी दरम्यान काही त्रुटी आढळल्यास त्या तत्काळ दुरुस्त केल्या जात आहेत. सध्या कामगार मंत्रालय या प्रकल्पावर काम करत आहे. निधी संघटनेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याच्या म्हणण्यानुसार, ईपीएफचा काही भाग तसाच राहील, तर मोठा भाग यूपीआयद्वारे बँक खात्यातून काढता येईल. हे अ‍ॅप येत्या मार्च-एप्रिलमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे.

सदस्यांना काय फायदा?

या सुविधेमुळे पीएफ काढण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होईल. आजारपण, शिक्षण, लग्न, घरखर्च अशा गरजांसाठी तत्परतेने लागणारे पैसे खातेदारांना लवकर मिळू शकतील. भविष्य निर्वाह निधी संघटना ही सेवा बँकिंग स्तरावर आणण्याचा प्रयत्न करत आहे. सध्याचे ‘उमंग’ आणि ‘यूएएन’ पोर्टल सुरूच राहतील, तर नवीन अ‍ॅप स्वतंत्रपणे उपलब्ध होईल.

सध्याची पीएफ काढण्याची व्यवस्था?

आतापर्यंत ईपीएफओमध्ये ‘यूएएन’ पोर्टल किंवा ‘उमंग’ अ‍ॅपद्वारे क्लेम फाईल करून पीएफ काढला जातो. या दोन्ही प्रक्रियांना थोडा वेळ लागतो. दरवर्षी 5 कोटींहून अधिक क्लेम सेटल केले जातात, ज्यामध्ये बहुतांश ईपीएफ विथड्रॉलचे असतात. कोव्हिड काळात ऑटो-सेटलमेंटमुळे 3 दिवसांत क्लेम सेटल होऊ लागले. तसेच याची मर्यादा 1 लाखांवरून 5 लाखांपर्यंत वाढवण्यात आली. मात्र, सध्या भविष्य निर्वाह निधी संघटनेकडे बँकिंग परवाना नसल्यामुळे थेट पैसे काढण्याची सुविधा अद्याप उपलब्ध नाही.

आजघडीला भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सुमारे 8 कोटी सदस्य आहेत. ती निवृत्ती निधी व्यवस्थापित करते. याची ऑनलाईन सेवा आधीपासूनच सक्षम आहे; पण यूपीआय इंटिग्रेशनमुळे या सुविधा आणखी वाढतील. सरकार ‘ईपीएफओ 3.0 अपग्रेड’ अंतर्गत डिजिटल क्लेम, जलद पडताळणी यांसारख्या सुविधा आणत आहे. यातून यूपीआयद्वारे विथड्रॉल ही सुविधा येत्या एप्रिलपासून सुरू होण्याची अपेक्षा आहे.

पीएफमधून पैसे काढण्याचे नियम

पीएफ विथड्रॉलच्या नियमानुसार, जर एखाद्या सदस्याची नोकरी गेली, तर तो एक महिन्यानंतर आपल्या पीएफ खात्यातील 75% रक्कम काढू शकतो. बेरोजगारीच्या काळात गरजा भागवण्यासाठी ही सुविधा उपलब्ध आहे. उर्वरित 25% रक्कम नोकरी गेल्यानंतर दोन महिन्यांनी काढता येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT