जयदीप नार्वेकर
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) आणि कर्मचारी पेन्शन योजना (ईपीएस) नियमांनुसार, नोकरी सोडताना सेवेची १० वर्षे पूर्ण न झाल्यास पेन्शनच्या रकमेचे काय होते, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
जेव्हा एखादा कर्मचारी १० वर्षांच्या सेवेचा कालावधी पूर्ण करण्यापूर्वी नोकरी सोडतो, तेव्हा तो ‘पेन्शन’ मिळण्यास पात्र ठरत नाही. अशा परिस्थितीत कर्मचारी दोन प्रकारे आपली रक्कम हाताळू शकतात. प्रथम पर्याय म्हणजे कर्मचारी आपली ईपीएस खात्यातील रक्कम काढू शकतो. यासाठी फॉर्म १०-सीचा वापर करावा लागतो. जर तुम्ही १० वर्षांची सेवा पूर्ण केली नसेल, तर तुम्हाला या योजनेतून बाहेर पडून पेन्शन फंडात जमा झालेली रक्कम एकरकमी परत घेता येते. ही रक्कम काढल्यानंतर तुमचे ईपीएस सदस्यत्व संपते आणि भविष्यात पेन्शन मिळण्याचा अधिकारही संपुष्टात येतो.
दुसरा पर्याय म्हणजे ईपीएस खात्यातील ‘स्कीम सर्टिफिकेट’ मिळवणे. जर तुम्हाला भविष्यात पुन्हा नोकरी सुरू करायची असेल आणि पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही रक्कम न काढता स्कीम सर्टिफिकेट घेऊ शकता. हे प्रमाणपत्र तुमच्या सेवा कालावधीचा रेकॉर्ड ठेवते. जेव्हा तुम्ही नवीन नोकरीत रुजू होता, तेव्हा जुन्या सेवा कालावधीची गणना नवीन कालावधीत केली जाते. अशा प्रकारे, १० वर्षांची सेवा पूर्ण करून तुम्ही पेन्शनसाठी पात्र ठरू शकता.
महत्त्वाची बाब म्हणजे, जर तुम्ही नोकरी सोडल्यानंतर सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ बेरोजगार असाल किंवा ईपीएफमध्ये योगदान दिले नसेल, तर तुम्हाला ईपीएसची रक्कम काढण्याचा अधिकार मिळतो; मात्र जर तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर पेन्शनची सोय हवी असेल, तर रक्कम काढण्याऐवजी ती पुढील नोकरीशी जोडणे अधिक श्रेयस्कर ठरते. यामुळे निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितता मिळण्यास मदत होते. १० वर्षे सेवा पूर्ण न झाल्यास पेन्शनची रक्कम पेन्शन म्हणून न मिळता ती केवळ ‘विथड्रॉल बेनिफिट’ म्हणून मिळते, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.