विधानसभा निकालाचा बाजारावर परिणाम Pudhari File Photo
अर्थभान

Stock Market : विधानसभा निकालाचा बाजारावर परिणाम

तीन्ही प्रमुख निर्देशांक जवळपास सव्वा टक्क्याने घसरलेलेच पाहावयास मिळाले

पुढारी वृत्तसेवा
भरत साळोखे, संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा. लि.

एका राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल शेअर बाजार फिरवू शकतात, हे चित्र मागील आठवड्यात पाहावयास मिळाले. इस्रायल-लेबनॉन संघर्ष आणि हरियाणा विधानसभेचे निकाल या दोन्ही घटना एकाच वेळी आल्यामुळे आणि त्यात एक्झिट पोल्सचे अंदाज सत्ताधारी पक्षाच्या विरुद्ध वर्तवले गेल्याने बाजार नेमका कोणत्या कारणांमुळे कोसळला, हे लक्षात येण्यास खूपच वेळ लागला. मात्र प्रत्यक्ष निकालादिवशी भाजपच्या बाजूने कौल स्पष्ट झाल्यावर बाजाराने जी उसळी दाखवली त्यावरून ही घसरण निवडणुकांमुळेच होती, हे स्पष्ट झाले.

सप्ताहाच्या अखेरीस निफ्टी 50, निफ्टी बँक आणि सेन्सेक्स हे तीन्ही प्रमुख निर्देशांक जवळपास सव्वा टक्क्याने घसरलेलेच पाहावयास मिळाले. निफ्टी 24800 या अत्यंत महत्त्वाच्या आधार पातळीजवळ असला तरी 24964.25 हे क्लोझिंग देऊन येणार्‍या सप्ताहात खालीसुद्धा जाऊ शकतो, असे संकेत देऊन बंद झाला आहे. परदेशी संस्थांनी भरमसाट विक्री केली आहे. मात्र त्यांना तोडीस तोड देशांतर्गत संस्थांनी धुवाँधार खरेदी केली आहे, अन्यथा ही घसरण आणखी मोठी झाली असती. निफ्टी फार्मा आणि निफ्टी आय.टी. या सेक्टरल इंडायसेसनी बाजार काहीसा सावरण्याचे काम केले. त्यांना निफ्टी ऑटोने थोडा हातभार लावला. हे तीन निर्देशांक वगळता बाकी झाडून सारे निर्देशांक मंदीत राहिले. निफ्टी FMCG पावणेचार टक्के घसरून मंदीवाल्यांचा लीडर राहिला. तसेच निफ्टी कमोडीटी, निफ्टी मीडिया, निफ्टी मेटल हे निर्देशांक प्रत्येकी दोन टक्क्यांहून अधिक घसरले.

देशांतील दोन प्रमुख रिअ‍ॅल्टी कंपन्या गोदरेज प्रॉपर्टीज आणि मॅक्रोटेक डेव्हलपर्स यांच्या Premium Homes ना प्रचंड मागणी असल्याचे त्यांच्या एप्रिल ते सप्टेंबर 2024 या तिमाहीतील विक्रीच्या आकड्यांकडून दिसून आले. 22000 कोटी रुपयांची विक्री या दोन कंपन्यांच्या मालमत्तांची झाली जी मागील वर्षापेक्षा 56 टक्के अधिक आहे. गोदरेज प्रॉपर्टीजचा शुक्रवारचा बंद भाव रु. 3015 आहे. तो आपला पूर्वीचा 52 Week High रु. 3402.70 पुन्हा गाठू शकतो. तसे झाले तर त्याची रु. 4000 कडे वाटचाल सुरू होईल. मॅक्रोटेक डेव्हलपर्सच्या बुकिंगचे आकडे पाहता हा शेअरही नजिकच्या काळात चांगला नफा मिळवून देईल, असे वाटते. शिवाय या कंपनीने पुणे आणि बंगळुरूमध्ये चार नवीन प्रकल्प सुरू केले आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र ते 30 सप्टेंबर 2024 ते 4 ऑक्टोबर 2024 या काळात रु.3500 कोटींचा QIP (Qualified Institutional Placement) सादर केला. भारतातील क्रमांक 1 ची गुंतवणूकदार असलेल्या LIC ने जवळपास 26 कोटी शेअर्स खरेदी करून बँकेमधील आपला स्टेक 4.05 टक्क्यांवरून 7.10 टक्क्यांवर नेला. नजिकच्या भूतकाळातील महाराष्ट्र बँकेची आर्थिक कामगिरी आणि भविष्यकाळात दिसून येणारे Growth Prospects यामुळे हा शेअर आकर्षक बनला आहे. शुक्रवारचा शेअरचा बंद भाव आहे. रु. 54.30 आणि वर्षातील उच्चांक आहे रु. 73.50 म्हणजे आपल्या उच्चांकापासून 26 टक्के खाली हा शेअर मिळत आहे. पी.ई.रेशा केवळ 8.57 आहे. याच आठवड्यात 15 तारखेला ह्युंडेचा IPO सादर होईल. अलीकडच्या काळातील IPOS ना गुंतवणूकदारांचा मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून मूळ 25000 कोटींचा असलेला IPO ह्युंडेने वाढवून 27800 कोटींचा केला आहे. एलआयसीचा आजपर्यंतचा रु. 21008 कोटींचा असलेला विक्रम हा आयपीओ मोडण्याची शक्यता आहे.

5 trillion dollars economy करण्याचा शासनाचा वज्रनिर्धार आहे आणि त्याला अनुसरून डिजिटल इकॉनॉमी, टेक्नॉलॉजी आधारित विकास, सस्टेनेबल एनर्जी आणि क्लायमेट अ‍ॅक्शन प्लॅनस् या क्षेत्रांवर शासनाचे अधिक लक्ष राहणार आहे. Goldman Sachs ने याच बाबीचे महत्त्व ओळखून काही कंपन्यांना Buy रेटिंग दिले आहे. Energy, Construction, Automotice, Aviation, Infrastructure, Real Estate, Consumer Goods आणि Logistics ही सेक्टर्स तेजीत राहतील, असे कंपनीने म्हणणे आहे. गोल्डमन सॅक्सने ज्या शेअर्सची शिफारस केली आहे. त्यापैकी 5 प्रमुख शेअर्स खालीलप्रमाणे-

1) Havells India Rs. 1939.15

2) Ultratech Cement Rs.11423.20

3) Adani Ports Rs. 1408.65

4) Interglobe (Indigo) Rs. 4682.05

5) Hitachi Energy Rs. 3942.00

आगामी बैठकीत व्याज दर कमी करण्याचे संकेत देत रिझर्व्ह बँकेने रेपो रेट स्थिर ठेवला. (6.5 टक्के) आणि शेवटी एका अत्यंत दुःखद बातमीबद्दल! ती कोणती ते आपल्यालाही माहीत आहेच. भारतीय उद्योगविश्वाचे भीष्माचार्य आदरणीय रतन टाटांचे निधन! त्यांना आदरांजली वाहतानाही शब्द किंवा भाषा हे माध्यम किती तोकडे आहे याची जाणीव होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT