देशासह जगभरात अनेक लोक नैराश्यामुळे आत्महत्या करत आहेत. काही लोक डिप्रेशनमध्ये जातात आणि हार मानतात, तर अनेक लोक मित्र-परिवाराच्या छळामुळे टोकाचे पाऊल उचलत आहेत. अशा परिस्थितीत, लोकांमध्ये प्रश्न निर्माण होतो की आत्महत्या केलेल्या व्यक्तीचा विमा असेल तर कंपनी विमा हक्ककुटुंबाला देईल की नाही? मृत्यू झाल्यास लाभार्थी नॉमिनी विम्याच्या पैशांवर दावा करू शकतो. अशी परिस्थिती उद्भवल्यास विम्याचे पैसे कुटुंबातील सदस्य किंवा विमाधारकाच्या नॉमिनीला काही औपचारिकतेनंतर लगेच हस्तांतरित केले जातात; पण काही अटींवर हा दावा मिळवणे कठीण होते. जसे की, विमाधारकाने आत्महत्या केल्यास काही अटींची पूर्तता केल्यासच कुटुंबाला विम्याची रक्कम मिळते.
1 जानेवारी 2024 आधी जारी केलेल्या जीवन विमा पॉलिसींच्या बाबतीत पॉलिसी सुरू झाल्यापासून किंवा नूतनीकरण झाल्यापासून 12 महिन्यांच्या आत विमाधारकाने आत्महत्या केल्यास पॉलिसी रद्द होते. पॉलिसी जारी झाल्यानंतर 12 महिन्यांनंतर विमाधारकाने आत्महत्या केल्यास नॉमिनीला पॉलिसीची संपूर्ण विमा रक्कम मिळते. लक्षात घ्या की, 1 जानेवारी 2024 नंतर जारी केलेल्या पॉलिसीच्या बाबतीत आत्महत्या कलमात बदल करण्यात आले असून, जीवन विमा पॉलिसी घेतल्याच्या एका वर्षाच्या आत विमाधारकाने आत्महत्या केल्यास भरलेल्या एकूण प्रीमियमच्या 80 टक्के रक्कम नॉमिनीला दिली जाते. त्याचवेळी पॉलिसी घेतल्यापासून एक वर्षाहून अधिक काळ झाला असेल, तर नॉमिनीला विमा पॉलिसीची पूर्ण रक्कम दिली जाईल.
आपल्या पॉलिसीमध्ये आत्महत्या कव्हरेज वगळण्याबद्दल व विमा रक्कम देण्याबद्दल काही वेगळ्या तरतुदी आहेत का, ते पाहणे महत्त्वाचे ठरेल. समजा, एखाद्या पॉलिसीधारकाने खूप मोठे कर्ज घेतले आहे. प्रथम जीवन विमा खरेदी करून आणि नंतर आत्महत्या करून त्याला या परिस्थितीतून बाहेर पडायचे आहे. त्यामुळे पॉलिसी जारी झाल्यानंतर बारा महिन्यांच्या आत पॉलिसीधारकाने आत्महत्या केल्यास विम्याची रक्कम मिळू शकत नाही; पण त्या मुदतीनंतर आत्मघाती मृत्यू असला तरी विम्याची रक्कम द्यायला नकार दिला जाऊ शकत नाही.
एखाद्या पॉलिसीधारकाने आत्महत्या केली असेल तर त्याचे कुटुंब भावनिक, आर्थिकद़ृष्ट्या उद्ध्वस्त होते. त्यामुळे पॉलिसीधारकाच्या वारसांना विम्याची रक्कम मिळणे आवश्यक असते. पॉलिसी कालबाह्य असल्यास रक्कम मिळण्यात अडचणी येतात. अशा पॉलिसीचे पुनरुज्जीवन केल्यास पुनरुज्जीवनाच्या तारखेपासून बारा महिन्यांच्या आत पॉलिसीधारकाने आत्महत्या केल्यास दावा नाकारला जाऊ शकतो. पॉलिसीधारकाने चुकीची माहिती दिल्यासही दावा रद्द होऊ शकतो. आत्महत्येच्या प्रसंगात विम्याची रक्कम द्यायला अयोग्य कारणे दाखवून विमा कंपनी नकार देत असेल, तर भारतीय विमा विनियामक आणि विकास प्राधिकरणाच्या विमा लोकपालाकडे आपण तक्रार दाखल करू शकाल.