CIBIL Score | चेक बाऊन्सचा सिबिल स्कोअरवर थेट परिणाम होतो का? Pudhari File Photo
अर्थभान

CIBIL Score | चेक बाऊन्सचा सिबिल स्कोअरवर थेट परिणाम होतो का?

पुढारी वृत्तसेवा

मारुती वि. पाटील

आजच्या डिजिटल युगातही व्यवहार करताना धनादेश (Cheque) चा वापर मोठ्या प्रमाणात होतो. मात्र, अनेकदा व्यक्तीच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने चेक बाऊन्स होण्याची शक्यता असते. कोणताही चेक बाऊन्स झाल्यास कायदेशीर कारवाई होते, हे सर्वांनाच माहीत आहे. पण, त्याचा तुमच्या सिबिल (CIBIL) स्कोअरवर काय परिणाम होतो, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे.

चेक बाऊन्सचा थेट परिणाम सिबिल स्कोअरवर होत नसला, तरी त्याचे अप्रत्यक्ष परिणाम तुमच्या आर्थिक पत आणि भविष्यातील कर्ज मिळवण्याच्या क्षमतेवर मात्र करू शकतात.

चेक बाऊन्स आणि सिबिल स्कोअरचा थेट संबंध नाही

सर्वप्रथम हे समजून घ्या की, कोणताही चेक बाऊन्स झाल्यास तुमचा सिबिल स्कोअर लगेच कमी होत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे सिबिल सारख्या क्रेडिट ब्युरो संस्था तुमच्या कर्ज आणि क्रेडिट कार्डच्या परतफेडीच्या इतिहासावर लक्ष ठेवत असतात, तुमच्या वैयक्तिक बँक व्यवहारांवर नाही, हे लक्षात घ्या.

क्रेडिट विरुद्ध बँकिंग व्यवहार : सिबिल हे (Trans Union CIBIL) तुमच्या कर्ज, हप्ते (ईएमआय) आणि क्रेडिट कार्डच्या बिलांचा मागोवा ठेवते. याउलट, चेक व्यवहार हे अंतर्गत बँकिंग व्यवहाराचा भाग आहेत, क्रेडिट व्यवहाराचा नाही. त्यामुळे ते थेट क्रेडिट ब्युरोला कळवले जात नाहीत.

कर्जफेडीवर लक्ष : तुमचा क्रेडिट स्कोअर हा तुमची कर्ज वेळेवर परत करण्याची क्षमता आणि सवय दर्शवतो. त्यामुळे कर्जाशी संबंधित नसलेला एखादा चेक बाऊन्स झाल्यास, तो थेट तुमच्या कर्जफेडीच्या इतिहासावर परिणाम करत नाही.

मग सिबिल स्कोअरवर अप्रत्यक्ष परिणाम कसा होतो?

जरी चेक बाऊन्सचा थेट परिणाम होत नसला, तरी काही विशिष्ट परिस्थितीत तो तुमच्या सिबिल स्कोअरसाठी आणि आर्थिक आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकतो.

कर्जाचा हप्ता (ईएमआय) किंवा क्रेडिट कार्ड बिल : जर तुम्ही तुमच्या कर्जाचा हप्ता किंवा क्रेडिट कार्डचे बिल भरण्यासाठी दिलेला चेक बाऊन्स झाला, तर ही एक गंभीर बाब आहे. येथे चेक बाऊन्स होण्यापेक्षा ‘वेळेवर पेमेंट न करणे’ ही मोठी चूक ठरते. बँक किंवा वित्तीय संस्था ही ‘थकबाकी’ म्हणून क्रेडिट ब्युरोला कळवते, ज्यामुळे तुमचा सिबिल स्कोअर निश्चितपणे कमी होतो.

आर्थिक विश्वासार्हतेला तडा : वारंवार चेक बाऊन्स होणे हे तुमच्या अस्थिर आर्थिक स्थितीचे लक्षण मानले जाते. जरी हे व्यवहार तुमच्या कर्जाशी संबंधित नसले, तरी भविष्यात तुम्ही कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज करताना बँक तुमच्या बँक स्टेटमेंटची तपासणी करते. त्यात वारंवार चेक बाऊन्स झाल्याचे दिसल्यास, तुमची आर्थिक विश्वासार्हता कमी लेखली जाते आणि तुम्हाला कर्ज मिळवणे कठीण होते.

चेक बाऊन्सचे इतर गंभीर परिणाम

सिबिल स्कोअरच्या पलीकडे जाऊन चेक बाऊन्सचे कायदेशीर आणि आर्थिक परिणाम अधिक गंभीर आहेत.

कायदेशीर कारवाई : चेक बाऊन्स होणे हा ‘निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटस् अ‍ॅक्ट, 1881’ च्या कलम 138 अंतर्गत एक फौजदारी गुन्हा आहे. पैसे स्वीकारणार्‍या व्यक्तीला वेळेत पैसे न दिल्यास, तो तुमच्याविरुद्ध न्यायालयात खटला दाखल करू शकतो. यात तुम्हाला दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि चेकच्या रकमेच्या दुप्पट रकमेपर्यंतचा दंड होऊ शकतो.

बँकेकडून दंड : चेक बाऊन्स झाल्यास, चेक देणार्‍या आणि तो जमा करणार्‍या दोघांच्याही बँका दंड आकारतात. जर बाऊन्स झालेला चेक कर्जाच्या हप्त्यासाठी असेल, तर तुम्हाला दंडासोबतच विलंब शुल्क देखील भरावे लागते.

आर्थिक शिस्त सर्वात महत्त्वाची

एक गोष्ट स्पष्ट आहे की, चेक बाऊन्स होणे ही एक टाळण्यासारखी गोष्ट आहे. जरी त्याचा थेट परिणाम तुमच्या सिबिल स्कोअरवर होत नसला, तरी कर्जाचा हप्ता चुकल्यास होणारे नुकसान मोठे आहे. याशिवाय, कायदेशीर कारवाई आणि आर्थिक दंड यामुळे तुमची प्रतिष्ठा आणि आर्थिक स्थिती दोन्ही धोक्यात येऊ शकते.

म्हणूनच कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी, चेक जारी करण्यापूर्वी आपल्या खात्यात पुरेशी रक्कम असल्याची खात्री करा. जर रक्कम अपुरी असेल, तर समोरच्या व्यक्तीला वेळेवर कल्पना द्या किंवा बँकेतून चेक थांबवा. आर्थिक शिस्त आणि जबाबदारीने केलेले व्यवहार हेच तुमच्या चांगल्या क्रेडिट स्कोअरचा आणि सुरक्षित आर्थिक भविष्याचा पाया आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT