Crude Oil  Pudhari
अर्थभान

Crude Oil Price: 40 दिवसांत कच्चे तेल 28 टक्के स्वस्त; पेट्रोल-डिझेलचे दर कधी कमी होणार?

Crude Oil Price Fall India: गेल्या 40 दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत तब्बल 28 टक्क्यांची घसरण झाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Crude Oil Price Fall India: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत गेल्या 40 दिवसांत तब्बल 28 टक्क्यांची घसरण झाली आहे. तरीही भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये इंधन स्वस्त कधी होणार, असा प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहे.

कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण

सध्या ब्रेंट क्रूडची किंमत सुमारे 71.74 डॉलर प्रति बॅरल, तर WTI क्रूड 68.60 डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत आहे. फेब्रुवारीअखेर अमेरिका-इराण संघर्ष सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती आता नीचांकी पातळीवर आल्या आहेत.

गेल्या आठवड्यात ब्रेंट आणि WTI या दोन्ही प्रकारच्या कच्च्या तेलाच्या किमतीतही किरकोळ घसरण झाली.

अमेरिका-इराण चर्चेचा परिणाम

कच्च्या तेलाच्या किमती कमी होण्यामागे अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या चर्चेतील सकारात्मक घडामोडी हे एक प्रमुख कारण मानले जात आहे. या चर्चेमुळे मध्य पूर्वेतील तणाव कमी होण्याची शक्यता निर्माण झाली असून, तेल पुरवठा सुरळीत राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मागणी अजूनही मर्यादित

तज्ज्ञांच्या मते, जागतिक स्तरावर तेलाचा पुरवठा सुरळीत सुरू असला तरी मागणीत अपेक्षित वाढ झालेली नाही. विशेषतः चीनकडून कच्च्या तेलाची खरेदी अजूनही मंदावलेली आहे. त्यामुळे तेलाच्या किमतींवर दबाव कायम आहे.

तरीही भारतात दर का कमी झाले नाहीत?

भारतात पेट्रोल-डिझेलचे दर केवळ आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीवर ठरत नाहीत. त्यात रुपयाचा डॉलरसमोरील विनिमय दर, वाहतूक खर्च, केंद्र आणि राज्य सरकारचे कर, रिफायनरीचा खर्च आणि तेल कंपन्यांचे व्यावसायिक निर्णय यांचाही मोठा वाटा असतो. यामुळे कच्चे तेल स्वस्त झाले तरी त्याचा फायदा ग्राहकांना मिळेलच, असे नाही.

40 दिवसांपासून दर स्थिर

देशात 25 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटचा बदल करण्यात आला होता. त्यानंतर तब्बल 40 दिवस उलटूनही इंधनाच्या किमती स्थिर आहेत.

ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, सध्या कच्च्या तेलाच्या किमती कमी असल्या तरी तेल कंपन्या अद्याप 'वेट अँड वॉच' या भूमिकेत आहेत. त्यामुळे तातडीने दरकपात होण्याची शक्यता कमी असल्याचे मानले जात आहे.

प्रमुख शहरांतील इंधनाचे दर

  • दिल्ली: पेट्रोल ₹102.12 | डिझेल ₹95.20

  • मुंबई: पेट्रोल ₹111.21 | डिझेल ₹97.83

  • कोलकाता: पेट्रोल ₹113.51 | डिझेल ₹99.82

  • चेन्नई: पेट्रोल ₹108.01 | डिझेल ₹99.66

  • हैदराबाद: पेट्रोल ₹115.73 | डिझेल ₹103.82

  • बेंगळुरू: पेट्रोल ₹110.89 | डिझेल ₹98.80

दरकपातीची आशा कायम

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पुढील काही दिवस कमी राहिल्या, तर भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरकपातीची शक्यता वाढू शकते. मात्र त्याबाबत तेल कंपन्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT