कोणत्याही व्यक्तीचा क्रेडिट स्कोर त्याच्या आर्थिक शिस्तीचे प्रतिबिंब असतो. हा 3 अंकी स्कोर कर्ज देणाऱ्या संस्थांसाठी फारच महत्त्वाचा असतो. जर क्रेडिट स्कोर चांगला असेल, तर कमी व्याजदरात मोठ्या रकमेचे कर्ज सहज मिळू शकते. मात्र, स्कोर खालावल्यास कर्ज मिळणे कठीण होते. काही चुकांमुळे हा स्कोर कमी होतो. आज आपण अशाच पाच महत्त्वाच्या चुका जाणून घेणार आहोत, ज्या टाळल्यास आपला क्रेडिट स्कोर चांगला राहील
(Credit Score Tips)
बरेच लोक प्रत्येक महिन्याला फक्त 'मिनिमम ड्यू' रक्कम क्रेडिट कार्डावर भरतात. ही सवय दीर्घकालीन दृष्टीने घातक ठरते. असे केल्यास उर्वरित रकमेवर व्याज व विलंब शुल्क आकारले जाते आणि हळूहळू क्रेडिट स्कोर घसरतो. त्यामुळे शक्यतो प्रत्येक महिन्याचे संपूर्ण बिल वेळेवर भरणे हेच उत्तम.
आपण केवळ एकाच प्रकारचे कर्ज घेतले असेल, जसे की केवळ क्रेडिट कार्ड वापर, तर ते स्कोरसाठी चांगले नसते. बँका आणि वित्तीय संस्था अशा ग्राहकांना पसंती देतात, जे विविध प्रकारची कर्जे घेऊन वेळेवर परतफेड करतात. उदाहरणार्थ, गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्ड इत्यादींची योग्य रीतीने हाताळणी. त्यामुळे 'क्रेडिट मिक्स' ठेवणे आवश्यक आहे.
जर तुम्ही प्रत्येक महिन्याला कार्डची पूर्ण मर्यादा वापरत असाल, तर बँकेला वाटते की तुम्ही आर्थिक ताणात आहात. यामुळे तुमचा स्कोर घसरतो. म्हणून कार्डच्या मर्यादेच्या केवळ 30% किंवा त्यापेक्षा कमी खर्च करणे आदर्श मानले जाते.
क्रेडिट कार्ड किंवा कोणत्याही कर्जाचे हप्ते वेळेवर न भरल्यास फक्त अतिरिक्त शुल्कच नाही तर तुमच्या क्रेडिट स्कोरवरही वाईट परिणाम होतो. वेळेवर भरणा केल्यास आर्थिक विश्वासार्हता वाढते आणि स्कोर चांगला राहतो.
जर तुम्ही कोणाच्या कर्जासाठी हमीदार झाला आणि त्या व्यक्तीने हप्ते वेळेवर भरले नाहीत, तर त्याचा परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोरवर होतो. त्यामुळे हमीदार बनताना संबंधित व्यक्तीची आर्थिक शिस्त आणि परतफेडीची क्षमता तपासून मगच निर्णय घ्या.
चांगला क्रेडिट स्कोर हा आर्थिक भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. वरील चुका टाळून वेळेवर बिल भरणे, खर्चावर नियंत्रण ठेवणे, आणि विविध कर्जांचे व्यवस्थित व्यवस्थापन केल्यास तुम्हाला कधीही कर्ज मिळवण्यास अडचण येणार नाही. त्यामुळे आता पासूनच योग्य आर्थिक सवयी अंगीकारा आणि तुमचा क्रेडिट स्कोर उत्तम राखा.