Contra Fund | प्रवाहाविरुद्ध पोहणारे धुरंधर!  
अर्थभान

Contra Fund | प्रवाहाविरुद्ध पोहणारे धुरंधर!

पुढारी वृत्तसेवा

राजू पाटील, नाशिक

अमेरिका-इराण युध्द, रशिया-युक्रेन युध्द, इस्रायल-पॅलेस्टाईन युध्दाबरोबरच अमेरिकेच्या टेरिफ वॉरने अर्थकारणाची समीकरणे बदलून टाकली आहेत. युध्दामुळे खनिज तेलाच्या किमती वाढल्या आहेत. बाजार उसळताच नफारुपी विक्रीच्या धोरणामुळे गेल्या पावणेदोन वर्षापासून शेअर बाजार सतत घसरताना दिसत आहे. लढाई कितीही कठीण असली तरी धुरंधर सरदार आपल्या कौशल्य, ताकद आणि अनुभवाच्या जोरावर जिंकत असतात. बाजारातही असेच धुरंधर आहेत आणि ते म्हणजे कॉन्ट्रा फंड.

कॉन्ट्रा फंड हा इक्विटी म्युच्युअल फंड श्रेणीतील फंड प्रकार आहे. तो 'कॉन्ट्राबॅड' किंवा 'कंट्ररियन इन्व्हेस्टमेंट' या तत्त्वावर काम करतो. या धोरणांतर्गत, फंड मॅनेजर बाजारातील सर्वसाधारण प्रवाहाच्या विरुद्ध चालून आपली गुंतवणूक रणनीती आखतो. सर्व गुंतवणूकदार ज्या कंपन्यांचे शेअर्स चांगले काम करत आहेत त्यांच्या मागे धावतात; परंतु कॉन्ट्रा फंडचे मॅनेजर अशा कंपन्यांचे शेअर्स शोधतात ज्या सध्या आर्थिक अडचणीत किंवा मंदीत आहेत, पण ज्यांची अंतर्गत ताकद मजबूत आहे आणि भविष्यात पुनरागमन करण्याची दाट शक्यता आहे. या फंडासाठी आधारभूत निर्देशांक 'निफ्टी ५००' हा आहे.

भारतात कॉन्ट्रा फंडची सुरुवात १९९९ मध्ये झाली. एसबीआय म्युच्युअल फंडने देशातील पहिल्या कॉन्ट्रा फंडाचा शुभारंभ केला आणि त्याचे नाव एसबीआय कॉन्ट्रा फंड असे आहे. यानंतर इतर फंड घराण्यांनीही या प्रकारच्या योजना बाजारात आणल्या. भारतात अँम्फीच्या वर्गीकरणानुसार सध्या ४ प्रमुख कॉन्ट्रा फंड कार्यरत आहेत. या सर्व कॉन्ट्रा फंड्समध्ये एकत्रित गुंतवणूक ७५,००० कोटी रुपयांवर पोहचलेली आहे.

एसबीआयचा फंड अतिशय लोकप्रिय असून, त्यातील गुंतवणूक ५० हजार कोटींच्या जवळ पोहोचलेली आहे. कोटक कॉन्ट्रा हा मूल्य आधारित आणि कंट्ररियन रणनितीसाठी ओळखला जातो. इन्व्हेस्को इंडिया कॉन्ट्रा फंड हा मजबूत पोर्टफोलिओसाठी ओळखला जातो. हा फंड योग्य वेळी योग्य असे अंडरव्हॅल्यूड शेअर्स निवडतो. मोतीलाल ओसवाल कॉन्ट्रा फंडसुध्दा अचूक निवडीवर भर देत दमदार वाटचाल करत आहे. गत पाच वर्षांत कॉन्ट्रा फंडांनी चक्रवाढ दराने १३ ते १६ टक्क्यांदरम्यान परतावा दिलेला आहे.

कोटक कॉन्ट्रा फंडाने आपल्या वाटचालीची २१ वर्षे पूर्ण केली आहे. या फंडाने गेल्या १३ वर्षांत गुंतवणूकदारांच्या निधीमध्ये ७.८ पटीने वाढ केली आहे. म्हणजेच चक्रवाढ दराने (सीएजीआर) १६ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ साध्य केली आहे. या फंडात १०,००० रुपयांची मासिक एसआयपी (एसआयपी) केली असती, तर गेल्या १३ वर्षांत १५.६ लाख रुपयांचे मूल्य आजच्या घडीला ५६.८९ लाख रुपये झाले असते. या फंडाने 'निफ्टी ५००' या निर्देशांकापेक्षा चमकदार कामगिरी करत त्याला मागे टाकले आहे, स्थापनेपासून ३ टक्क्यांपेक्षा जास्त अल्फा (म्हणजेच अतिरिक्त परतावा) निर्माण केलेला आहे. फंडाने गेल्या १ वर्षात ३.६ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे, तर बेंचमार्कचा परतावा ०.८३ टक्के होता. फंडाची १० वर्षे, ५ वर्षे आणि ३ वर्षांमधील कामगिरी अनुक्रमे १७.१३ टक्के, १६.८३ टक्के आणि १७.६८ टक्के इतकी होती. या फंडाने १ वर्ष, ३ वर्षे, ५ वर्षे आणि १० वर्षे या सर्व कालावधीत बेंचमार्कपेक्षा सरस कामगिरी केली आहे. शिबानी कुरियन या फंडचे व्यवस्थापन सांभाळत आहेत.

कॉन्ट्रा फंडची वैशिष्ट्ये

१) कंट्ररियन धोरण : हा फंड अशा सेक्टर किंवा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो ज्यांची कामगिरी सध्या खराब आहे; परंतु भविष्यात ती वधारू

शकते.

२) जास्त जोखीम आणि उच्च परतावा : हे फंड हाय-रिस्क श्रेणीत येतात. जर फंड मॅनेजरचा अंदाज अचूक ठरला, तर हे फंड इतर फंडस्‌च्या तुलनेत खूप जास्त (मल्टीबॅगर) परतावा देऊ शकतात. मात्र, अंदाज चुकला तर नुकसानीची शक्यताही जास्त असते.

३) दीर्घकालीन गुंतवणूक : कॉन्ट्रा फंडस्‌ना त्यांची रणनीती फळाला आणण्यासाठी आणि खराब कामगिरी करणाऱ्या कंपन्यांना सावरण्यासाठी मोठा वेळ लागतो. त्यामुळे हे फंड कमीत कमी ५ ते ७ वर्षांच्या किंवा त्याहून अधिक दीर्घ मुदतीसाठी योग्य मानले जातात.

४) धैर्याची नितांत आवश्यकता : या फंडात तत्काळ परतावा मिळण्याची हमी नसते. बऱ्याचदा सुरुवातीला या फंडस्‌ची कामगिरी खराब किंवा जेमतेम दिसू शकते, त्यामुळे गुंतवणूकदाराकडे कमालीचा संयम असणे आवश्यक आहे.

५) सेबीच्या नियमांनुसार, कॉन्ट्रा फंडस्‌ना त्यांच्या एकूण निधीपैकी (एयूएम) किमान ६५ टक्के गुंतवणूक इक्विटी आणि इक्विटी-संबंधित साधनांमध्ये गुंतवणे बंधनकारक असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT