सर्वसमावेशक विमा विस्ताराकडे... Pudhari File Photo
अर्थभान

सर्वसमावेशक विमा विस्ताराकडे...

पुढारी वृत्तसेवा
प्रा. डॉ. विजय ककडे

विकसित भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचे प्रयत्न सर्वस्पर्शी व सर्वव्यापी विमा संरक्षणातून साध्य होईल. एकूण वित्त साक्षरतेत विमा साक्षरता महत्त्वाची असून ‘इरडाई’च्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी महत्त्वाची ठरते. आपण जागरूक विमाधारक होणे हेही तितकेच महत्त्वाचे ठरते.

भारतीय विमा विकास व नियमन प्राधिकरण (IRDAI) या विमा क्षेत्र नियमन संस्थेने 5 सप्टेंबर 2024 रोजी विमा ग्राहकांच्या हितसंरक्षणार्थ महत्त्वाची नियमावली जाहीर केली आहे. त्यामुळे विमा क्षेत्राचा गुणात्मक विकास होणार आहे. विशेष म्हणजे, विमा क्षेत्रातील अग्रगण्य व सरकारी मालकीची विमा कंपनी भारतीय जीवन विमा, एलआयसीची स्थापना 1 सप्टेंबर 1956 मध्ये झाली होती व त्यातून असंख्य ग्राहकांना विमा कवच मिळाले. सध्या विमा सप्ताह साजरा होत आहे. अद्याप विमा विकास व विमा सधनता (Identity) अल्प असल्याने ‘राडाई’मार्फत ग्राहक केंद्रित धोरण मसुदा हा विमा ग्राहक संरक्षणार्थ एक महत्त्वपूर्ण तरतूद ठरते. आपण विमा ग्राहक या नात्याने आपले हक्क जाणून घेणे या सोबतच आपली जबाबदारीदेखील समजून घेणे आवश्यक ठरते. विमा न घेणे, अल्प प्रमाणात घेणे, चुकीचा घेणे यातून विमा ग्राहक अडचणीत आले आहेत. यामध्ये विमा विक्रेते किंवा एजंट यांनी ग्राहकापेक्षा आपल्या हिताला प्राधान्य दिल्याचे अनेक ठिकाणी दिसते. यावरही नव्या मार्गदर्शक सूचना उपयुक्त ठरतात. या नव्या विमा मार्गदर्शक सूचना बहुअंशी असून विमा साक्षरता वाढीसाठी व विमा स्वीकृतीस निश्चित उपयुक्त ठरतील.

प्रमुख तरतुदी

ग्राहक हितसंरक्षणार्थ नवतंत्रज्ञान वापरासोबत पारदर्शी, सुस्पष्ट व उत्तरदायित्व, बांधिलकी स्पष्ट करणार्‍या एकूण 10 तरतुदी आहेत.

1) डिजिटल स्वरूपात

विमा पॉलिसी हरवणे व त्यासाठी डुप्लिकेट पॉलिसी घेणे यातून आता मुक्तता करण्यात विमा ई-फॉरमॅटमध्येच दिला जाणार आहे; मात्र एखाद्यास तसे नको असल्यास विमा घेत असताना पर्याय द्यावा लागेल.

2) विमा प्रारंभ व महत्त्वाची कागदपत्रे

विमा घेतल्यानंतर विमा कंपनीने सर्व महत्त्वाची कागदपत्रे 15 दिवसांत विमाधारकाला देणे बंधनकारक आहे. विमा प्रस्तावासोबतच विमा हप्ता घेण्यासाठी विमा कंपनीने प्रस्तावासोबत चांगल्या आरोग्याचे प्रकटन ग्राहकाकडून घेणे आवश्यक आहे. विमाधारकाला अशी महत्त्वाची कागदपत्रे विमा कंपनीकडून मिळणे आवश्यक असते. त्यामुळे विमा पॉलिसीसोबतचे पत्र ज्यामध्ये विमायुक्त कालावधी (Free Look Period) दिलेला असतो. ग्राहक या काळात विमा प्रस्ताव रद्द करू शकतो. विमा प्रस्तावाची प्रत, विमा लाभाचे विवरणपत्रक, विमा आवश्यकता किंवा योग्यता पाहणी केली असल्यास त्याची कागदपत्रे व अन्य महत्त्वाची कागदपत्रे त्या विम्यासाठी आवश्यक असणारी देणे विमा कंपनीवर बंधनकारक आहे.

3) ग्राहक माहितीपत्रक (Customer Information sheet-CIS) बंधनकारक विमा

पॉलिसीसोबत त्या विम्याची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये, फायदे, व्याप्ती याबाबत विमाधारकास पुरेशी माहिती देण्याचे बंधन घालण्यात आले असून ही अत्यंत महत्त्वाची सुधारणा मानावी लागेल. अपुर्‍या माहितीतून येणारे गैरसमज व कायदेशीर तंटे टाळणे शक्य होणार आहे. ग्राहक माहिती पत्रकात पुढील स्पष्टता असणार आहे.

i) विमा प्रकार : मुदत विमा, जीवन विमा किंवा इतर प्रकार यांचा समावेशआहे. याबाबतचे स्पष्टीकरण.

ii) आश्वासित विमा रक्कम (Sum Assured) दावापूर्तीवेळी विमाधारकास मिळणारी विमा रक्कम.

iii) विमा लाभ : विमा पॉलिसीतून मिळणार्‍या लाभाचे सविस्तर स्पष्टीकरण.

iv) अपवाद : कोणत्या स्थितीत विमा संरक्षण मिळणार नाही त्याची माहिती.

v) महत्त्वाचे तपशील : यामध्ये विमायुक्त कालावधी, विमा नूतनीकरण दिनांक, कर्ज सुविधा इ. तपशील यात देणे बंधनकारक आहे.

vi) दावा प्रक्रिया : विमा दावा करण्याची प्रक्रिया यात स्पष्ट केलेली असते.

vii) ग्राहक सेवा : ग्राहकास मिळणार्‍या सेवा-सुविधा याचे स्पष्टीकरण.

viii) तक्रार नोंद पद्धत : तक्रार नोंदवण्याची पद्धत तसेच संपर्क क्रमांक ग्राहकास द्यावे लागतात.

4) विमायुक्त कालावधी (Free Look Period)

एक वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीच्या जीवन विम्यास युक्त कालावधी मर्यादा 30 दिवसांची असून या काळात विमा ग्राहकास पॉलिसी नाकारण्याचा अधिकार आहे.

5) विमा दावा कालावधी

विमाधारकास विमा दावा किती तत्परतेने उपलब्ध होतो हे विमा कार्यक्षमतेचे व यशाचे मापदंड असते. याबाबत ‘इरडाई’ने मृत्यू दावे 15 दिवसांत द्यावेत व जर संशयास्पद मृत्यू असल्यास 45 दिवसांची मुदत दिली आहे. विमा पूर्णत अथवा अंशतः परत केल्यास 7 दिवसांत क्लेम द्यावयाचा असून विमा पूर्तता रक्कम विहीत तारखेस देणे बंधनकारक आहे. दावा विहीत कालावधीत पूर्ण केला नाही, तर ग्राहकास बँकेचा व्याज दर व 2 टक्के अधिक अशी भरपाई द्यावी लागेल.

6) वारसा आवश्यक

विमा प्रस्तावासोबतच वारसा नोंद सक्तीची असून विमाधारक एक किंवा अधिक व्यक्तीला वारस नोंदवू शकतो. अधिक वारस नोंदवल्यास त्यांचा वाटा- टक्केवारी द्यावी लागते.

7) आरोग्य विमा ग्राहक माहिती पत्रक

यामध्ये सर्वसाधारण आरोग्य विम्याबाबत उपरोक्त माहितीसोबत आरोग्य विम्यात असणार्‍या उपमर्यादा, वजाती, प्रतीक्षा कालावधी याबाबतचे तपशील समाविष्ट आहेत.

8) कॅशलेस दावे 3 तासांत

आरोग्य विम्याचा चांगला अनुभव ग्राहकांना उपलब्ध व्हावा या भूमिकेतून कॅशलेस दावे 3 तासांत पूर्ण करण्याची मार्गदर्शक सूचना असून कोणत्याही पॉलिसीधारकास डिस्चार्ज देण्यापर्यंत थांबवून ठेवता येणार नाही. तीन तासांपेक्षा अधिक कालावधी लागला, तर हॉस्पिटलचे अधिकचे बिल विमा कंपनीस द्यावे लागेल.

9)अधिक/अनेक विमाधारक

एकापेक्षा अधिक विमा कंपन्यांच्या पॉलिसी असल्यास विमाधारकास प्रथम निवडलेल्या पॉलिसीकडून दावा रक्कम मिळेल; मात्र ही रक्कम अपुरी असल्यास दुसर्‍या पॉलिसीतून त्याची पूर्तता केली जाईल.

10) आरोग्य विमा मार्गदर्शक सूचना

आरोग्य विमा अद्याप अल्पप्रमाणात घेतला जात असून हा विमा सर्व प्रकारच्या वयोगटासाठी, सर्व प्रकारच्या आजारांसाठी, पूर्वीच्या आजारांना व जुनाट आजारांना समाविष्ट करणारी, सर्व प्रकारच्या उपचार पद्धतींसाठी, सर्व स्थितीत म्हणजे हॉस्पिटल, घरी उपचार घेणार्‍यांसाठी, सर्व प्रदेशांत, सर्व व्यवसायांसाठी, सर्व हॉस्पिटलधून उपलब्ध करण्याच्या मार्गदर्शक सूचना विमा विस्ताराची, समावेशकतेची सुरुवात मानावी लागते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT