पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ९० दिवसांसाठी 'टॅरिफ'वर (आयात शुल्क) ब्रेक लावून उर्वरित जगावर फक्त १०% टॅरिफ लादला, तर दुसरीकडे, त्यांनी चीनवरील टॅरिफ १०४% वरून १२५% पर्यंत वाढवला आहे. यामुळे अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर ( Tariff war) आणखी तीव्र झाले आहे. अमेरिकेने दिलेल्या या आर्थिक धक्क्यामुळे बुधवारी चीनचे चलन युआन १७ वर्षातील नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. ( Trump tariffs)
डॉलरच्या तुलनेत युआन ७.३४९८ वर घसरला, डिसेंबर २००७ नंतरची ही सर्वात मोठी घसरण आहे.चीनचा युआन बुधवारी १७ वर्षांहून अधिक काळातील सर्वात कमकुवत पातळीवर आला. चीन-अमेरिका व्यापार युद्धाने चलन बाजारांना हादरवून टाकले आहे. चीनचे वरिष्ठ नेते या संपूर्ण मुद्द्यावर लवकरच एक बैठक घेण्याची योजना आखत आहेत, जेणेकरून अर्थव्यवस्था आणि भांडवली बाजाराला चालना देण्यासाठी पुढील पावले उचलता येतील. यासंदर्भात 'रॉयटर्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, चीनची मध्यवर्ती बँक युआनची घसरण आणखी होवू नये यासाठी उपाययोजना करत आहे. अशा परिस्थितीत, देशातील सर्व सरकारी बँकांना अमेरिकन डॉलर्सची खरेदी कमीत कमी करण्याची सूचना करण्यात आली आहे.
अमेरिकेने उच्च दरांचे आयात शुल्क मागे घेत नाही तोपर्यंत चीनची अमेरिकेला होणारी निर्यात निम्मी होईल. चीनची निर्यात दुसऱ्या देशात वळवली जात नाही तोपर्यंत याचा थेट परिणाम चीनच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नावर (जीडीपी) होणार आहे. मागील सत्राच्या सुरुवातीला आशियाई बाजारात युआन १% घसरून ७.४२८८ प्रति डॉलर या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला होता. या महिन्यात आतापर्यंत ऑनशोअर आणि ऑफशोअर युआन दोन्हीमध्ये 1% पेक्षा जास्त घसरण झाली आहे, ज्यामुळे वर्षाच्या सुरुवातीपासूनच ते कमकुवत झाले आहेत. कमकुवत युआनमुळे निर्यात स्वस्त होईल. परंतु तीव्र घसरणीमुळे अवांछित भांडवलाच्या बाहेर जाण्याचा दबाव वाढू शकतो आणि आर्थिक स्थिरता धोक्यात येऊ शकते, असे अर्थतज्ज्ञांनी म्हटले आहे.
अमेरिकेने चीन वगळता सर्व देशांवर ९० दिवसांसाठी टॅरिफ ब्रेक जाहीर केल्यानंतर अमेरिकन शेअर बाजार वधारला आहे. 'ब्लूमबर्ग'ने दिलेल्या वृत्तानुसार, एस अँड पी ९.५ टक्क्यांनी वधारला तर नॅस्डॅक १२% ने वधारला आणि १०० पेक्षा जास्त अंकांनी वधारला. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल सरासरीमध्ये सुमारे ७.९ टक्क्यांची वाढ दिसून आली. एका दिवसात सुमारे ३० अब्ज शेअर्सची खरेदी-विक्री झाली, जी एका दिवसासाठी विक्रमी आकडेवारी ठरली आहे.