सत्यजित दुर्वेकर
वित्त वर्ष 2024-25 पासून नवीन करप्रणाली ही डिफॉल्ट प्रणाली ठरवली गेली आहे. म्हणजेच, जर आपले वार्षिक उत्पन्न 7 लाख रुपयांपर्यंत असेल, तर कलम 87 एअंतर्गत करसवलतीमुळे आपल्याला कोणताही उत्पन्नकर भरावा लागणार नाही. मात्र, ही सूट मिळवण्यासाठी आयकर रिटर्न दाखल करणे बंधनकारक आहे. परंतु, जर आपण आयटीआर भरताना जुन्या करप्रणालीत जाण्याचा निर्णय घेतला, तर प्रक्रिया थोडी गुंतागुंतीची ठरते.
ज्यांना व्यावसायिक उत्पन्न आहे (उदा. शेअर बाजारातील फ्युचर्स व ऑप्शन्स व्यवहार), त्यांना जुनी करप्रणाली स्वीकारण्यासाठी अंतिम मुदतीपूर्वी फॉर्म 10-आयईए सादर करावा लागतो. परंतु, जर आपले व्यवसाय उत्पन्न नसेल, तर आयटीआर भरतानाच थेट जुन्या करप्रणालीचा पर्याय निवडता येतो आणि यासाठी वेगळा फॉर्म भरावा लागत नाही. मात्र, यामध्ये रिवाईज्ड आयटीआर आणि बिलेटेड आयटीआर या दोन संकल्पनांचा विचार महत्त्वाचा आहे.
मूल्यांकन वर्ष 2025-26 साठी जर एखाद्या करदात्याला जुनी प्रणाली निवडायची असेल, तर आयटीआर नियोजित अंतिम मुदतीतच दाखल करणे आवश्यक आहे. मूळ रिटर्न वेळेत भरले असल्यास त्यानंतर रिवाईज्ड रिटर्न दाखल करून नव्या करप्रणालीतून जुन्या प्रणालीत बदली करणे शक्य आहे. त्यामुळे वेतनदार करदाते किंवा ज्यांना व्यवसायाचे उत्पन्न नाही, त्यांना रिवाईज्ड रिटर्न वेळेत भरल्यास प्रणाली बदलण्याची मुभा असते. मात्र, उशिरा दाखल केलेल्या रिटर्नमध्ये (बिलेटेड आयटीआर) असा बदल करता येत नाही.
फॉर्म 10-आयईए कोणाला भरावा लागतो, याबाबत नियम वेगळे आहेत. जर एखादी व्यक्ती किंवा हिंदू अविभक्तकुटुंब व्यावसायिक उत्पन्नाशिवाय असेल, तर त्यांना कोणताही फॉर्म भरावा लागत नाही. ते आयटीआरमध्येच थेट जुनी प्रणाली निवडू शकतात; परंतु रिटर्न अंतिम मुदतीत दाखल केलेले असावे. मात्र, जर व्यावसायिक उत्पन्न असेल, तर त्यांना जुनी प्रणाली स्वीकारण्यासाठी फॉर्म 10-आयईए अंतिम मुदतीपूर्वी दाखल करणे बंधनकारक आहे. यानंतर एकदाच आयुष्यात पुन्हा नवी प्रणाली निवडता येते, तेही फॉर्म 10-आयईए दाखल करून. महत्त्वाची बाब म्हणजे उशिरा भरलेल्या आयटीआरमध्ये (बिलेटेड रिटर्न) कोणताही करदाता वेतनदार, स्वयंरोजगार करणारा वा व्यवसाय उत्पन्न असलेला प्रणाली बदलू शकत नाही. वेळेत रिटर्न भरल्यास आणि आवश्यक फॉर्म सादर केल्यासच हा पर्याय उपलब्ध असतो. रिवाईज्ड आयटीआरमध्ये मात्र बदल करता येतो; पण त्यासाठी मूळ रिटर्न वेळेत दाखल झालेला असणे आणि व्यवसाय उत्पन्न असल्यास फॉर्म 10-आयईए नियमानुसार सादर झालेला असणे आवश्यक आहे.
उशिराने रिटर्न भरल्यास आपण ज्या प्रणालीत सुरुवातीला कर दाखल केला, त्यात बदल करता येत नाही. त्यामुळे अंतिम मुदतीच्या आतच निर्णय घेणे हितावह ठरते.