गृहनिर्माण भत्ता (एचआरए) आणि गृहकर्जावरील करसवलत या दोन्ही सवलती एकत्र देण्यास बरेचदा कंपन्यांचे मालक नकार देतात. वास्तविक, एचआरए आणि गृहकर्जावरील व्याज यांचे करसवलतीचे विभाग वेगळे आहेत.
एचआरए वरील करसवलत कलम 10(13 अ) अंतर्गत दिली जाते.
यासाठी दोन अटी आहेत. एक म्हणजे एचआरए हा पगाराचा भाग असावा.
दुसरी अट म्हणजे कर्मचारी भाड्याच्या घरात राहत असावा आणि प्रत्यक्ष भाडे भरत असावा.
गृहकर्जाच्या व्याजावरील करसवलत कलम 24(अ) अंतर्गत दिली जाते. यामध्ये दोन प्रकारच्या सवलती मिळतात.
मूळ रकमेवरील करसवलत (कलम 80 सी) ः यामध्ये 1.5 लाखपर्यंतच्या कर्जाच्या परतफेडीवर सवलत मिळू शकते. ही सवलत स्वतःच्या वापराच्या किंवा रिक्त असलेल्या घरासाठीच मिळते.
व्याजाच्या रकमेवरील करसवलत (कलम 24) : गृहकर्जाच्या व्याजावर 2 लाखांपर्यंत करसवलत मिळते.
याखेरीज कलम 80 ईईए अंतर्गत परवडणार्या घरांसाठी अतिरिक्त 1.5 लाख व्याजसवलत मिळू शकते. त्यामुळे एकूण व्याजावरील सवलत 3.5 लाख (2 लाख + 1.5 लाख) होते.
नोकरीच्या ठिकाणी भाड्याने राहणे आणि स्वतःचे घर वेगळ्या शहरात असणे, अशी स्थिती असल्यास दोन्ही सवलती मिळवण्यास कोणतीही अडचण येत नाही; पण नोकरीच्या शहरात स्वतःचे घर असूनही भाड्याने राहात असाल, तर अनेक नियोक्ते यावर आक्षेप घेतात. मात्र, भाड्याच्या घरात राहण्यामागे खरे कारण असेल, तर तुम्ही दोन्ही सवलती मिळवू शकता.
उदाहरणार्थ, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसणे, घर छोटे असणे अशी कारणे असतील, तर हा लाभ घेऊ शकता. अशा वेळी कंपनीकडून या दोन्ही सवलती मिळत नसतील, तर त्यांच्याकडून फक्त एचआरए घ्यावा आणि आयकर रिटर्न भरताना गृहकर्जसवलत घ्यावी.
स्वतःचे घर बांधकामाधीन असताना भाड्याने राहात असाल, तर गृहकर्जाच्या व्याजावर सवलत मिळत नाही; पण एचआरए मिळतो. घर पूर्ण झाल्यावर, बांधकाम कालावधीतील व्याज 5 हप्त्यांमध्ये वजा करू शकता.
नोकरीच्या शहरात स्वतःचे घर असूनही पालकांकडे किंवा भावा-बहिणींकडे भाड्याने राहात असाल, तर ही परिस्थिती कर विभागाच्या संशयात येऊ शकते. हे लक्षात घेता भाडे व्यवहार योग्यरीत्या करायचा असेल, तर भाडे प्रत्यक्ष बँक खात्यातून अदा करणे आवश्यक. तसेच पालकांनी किंवा भावा-बहिणींनी ते भाडे गृहभाडे उत्पन्न म्हणून दाखवून त्यावर कर भरणे आवश्यक आहे. खोटे व्यवहार केल्यास कर विभाग सवलत नाकारू शकतो.
दुसर्या शहरात भाड्याने घर असेल आणि नोकरीच्या शहरात स्वतःचे घर असेल, तर यामध्ये तुम्ही एचआरएचा लाभ घेऊ शकत नाही. कारण, एचआरए फक्तनोकरीच्या ठिकाणी भाड्याने राहिल्यास लागू होतो. अशा स्थितीत केवळ गृहकर्जावरील करसवलतच मिळू शकते.
थोडक्यात, तुम्ही खरोखरच भाडे भरत असाल आणि गृहकर्ज चालू असेल, तर एचआरए आणि गृहकर्ज सवलत एकत्र घेता येते. मात्र, जर तुम्ही भाड्याने राहत असलेल्या शहरातच तुमचे स्वतःचे घर असेल, तर अधिक कर तपासणी होण्याची शक्यता असते. कर वाचवण्यासाठी खोटे व्यवहार करू नका. कारण, ते बेकायदेशीर आहे.