Nirmala Sitharaman budget highlights
नवी दिल्ली : पर्यावरणपूरक आणि शाश्वत मालवाहतुकीला चालना देण्यासाठी, पूर्वेकडील दानकुनी ते पश्चिमेकडील सुरत यांना जोडणारे नवीन समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर उभारण्याचा प्रस्ताव आहे. पुढील पाच वर्षांत २० नवीन जलमार्ग कार्यान्वित करण्यात येतील, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. आज (दि. १) सकाळी ११ वाजता संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
यावेळी मंत्री सीतारामन यांनी सांगितले की, पुढील पाच वर्षांत २० नवीन जलमार्ग कार्यान्वित करण्यात येणार आहेत. याची सुरुवात ओडिशातील राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक ५ पासून करण्यात येईल, ज्याद्वारे तालचेर आणि अंगुल या खनिजसमृद्ध भागांना तसेच कालिंगानगरसारख्या औद्योगिक केंद्रांना पारादीप आणि धामरा या बंदरांशी जोडले जाईल. अंतर्देशीय जलमार्गांसाठी आवश्यक अशा जहाज दुरुस्तीची परिसंस्था वाराणसी आणि पाटणा येथेही उभारण्यात येणार आहे.
२० नवीन जलमार्ग: पुढील पाच वर्षांत देशभरात २० नवीन राष्ट्रीय जलमार्ग कार्यान्वित करण्यात येतील. यामुळे पर्यावरणपूरक आणि स्वस्त मालवाहतुकीला चालना मिळेल.
नॅशनल वॉटरवे-५ (NW-5): याची सुरुवात ओडिशामधील राष्ट्रीय जलमार्ग ५ पासून होईल. हा मार्ग तालचेर, अंगुल आणि कलिंगनगर या खनिजसमृद्ध क्षेत्रांना पारादीप आणि धामरा बंदरांशी जोडेल.
जहाज दुरुस्ती केंद्रे (Ship Repair Ecosystem): वाराणसी आणि पाटणा येथे अंतर्देशीय जलमार्गांसाठी विशेष जहाज दुरुस्ती केंद्रे स्थापन केली जातील.
प्रादेशिक उत्कृष्टता केंद्रे: जलमार्ग क्षेत्रासाठी लागणारे कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी प्रशिक्षण संस्थांना 'प्रादेशिक उत्कृष्टता केंद्रे' (Regional Centres of Excellence) म्हणून दर्जा दिला जाईल.
कोस्टल कार्गो स्कीम: किनारपट्टीवरील मालवाहतूक आणि अंतर्देशीय जलमार्गांचा वाटा वाढवण्यासाठी नवीन 'कोस्टल कार्गो स्कीम' लाँच केली जाईल.