आज ( दि.३० जुलै) BSE सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल पहिल्यांदाच ५.५ ट्रिलियन डॉलर पार झाले.  Representative image
अर्थभान

शेअर बाजाराचा विक्रम! BSE मार्केट कॅप पहिल्यांदाच ५.५ ट्रिलियन डॉलर पार

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

भारतीय शेअर बाजाराने मंगळवारी (दि. ३०) एक नवा टप्पा गाठला. बीएसई (BSE) वरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलाने (BSE market capitalisation) आज विक्रमी उच्चांक नोंदवला. BSE सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल पहिल्यांदाच ५.५ ट्रिलियन डॉलर (४६० लाख कोटी) पार झाले. या वर्षाच्या सुरुवातीला बाजार भांडवल ४.२ ट्रिलियन डॉलरवर होते. पण बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांसह सेन्सेक्स आणि व्यापक बाजारांतील तेजीमुळे बाजार भांडवलात यंदा आतापर्यंत २२.६ टक्के वाढ झाली आहे. विशेष म्हणजे यावर्षी सेन्सेक्स १३ टक्क्यांनी वाढला. तर बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी सुमारे ३० टक्क्यांनी वाढले आहेत.

शेअर बाजारातील तेजीमागे कोणते घटक?

मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, केंद्रात भाजपच्या नेतृत्त्वातील सरकारने पुन्हा सत्तेत येणे, जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरण, परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारात पुन्हा सुरु झालेला गुंतवणुकीचा ओघ आणि कंपन्यांची मजबूत कमाई आदी प्रमुख घटक शेअर बाजारातील तेजीमागे राहिले आहेत. तसेच देशांतर्गत गुंतवणूकदारांची सतत खरेदी, मजबूत आर्थिक वाढीची अपेक्षा, धोरणातील सातत्य आणि सामान्यपेक्षा जास्त मान्सून यामुळे बाजाराला चालना मिळाली आहे.

Stock Market : सेन्सेक्स- निफ्टी सपाट

दरम्यान, शेअर बाजारात आज मंगळवारी (दि.३०) सुरुवातीला प्रॉफिट बुकिंगमुळे काही प्रमाणात दबाव राहिला. त्यानंतर सेन्सेक्स ९९ अंकांच्या वाढीसह ८१,४५५ वर बंद झाला. तर २१ अंकांच्या किरकोळ वाढीसह २४,८५७ वर स्थिरावला. क्षेत्रीय आघाडीवर एफएमसीजी आणि हेल्थकेअर वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. पॉवर, रियल्टी आणि ऑटो ०.५-१ टक्क्यादरम्यान वाढले. बीएसई मिडकॅप ०.२ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप ०.८ टक्क्यांनी वाढून बंद झाला.

BSE Sensex Today : कोणते शेअर्स वधारले?

सेन्सेक्सवर टाटा मोटर्सचा शेअर्स ३.४ टक्क्यांनी वाढून १,१६२ रुपयांवर पोहोचला. एनटीपीसाचा शेअर्सही ३ टक्क्यांनी वाढला. त्याचबरोबर बजाज फिनसर्व्ह, पॉवर ग्रिड, एशियन पेंट्स, टायटन, इंडसइंड बँक, मारुती हे शेअर्स तेजीत बंद झाले. तर सन फार्मा, आयटीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

सेन्सेक्स आज ९९ अंकांच्या वाढीसह ८१,४५५ वर बंद झाला.

निफ्टीवर टाटा मोटर्स, एनटीपीसी, बीपीसीएल, पॉवर ग्रिड, टायटन हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले. तर LTIMindtree, एसबीआय लाईफ, सिप्ला, ग्रासीम, सन फार्मा हे शेअर्स टॉप लूजर्स ठरले.

निफ्टी ५० चा आजचा ट्रेडिंग आलेख.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT