पुढारी ऑनलाईन डेस्क : जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉइनने (Bitcoin) आज गुरुवारी पहिल्यांदाच १ लाख डॉलर्सचा टप्पा पार केला. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या विजयानंतर बिटकॉइन रोज नवे विक्रमी उच्चांक गाठत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली सरकारकडून क्रिप्टोकरन्सी गुंतवणूकदारांना अनुकूल नियामक वातावरणाची अपेक्षा आहे, असे रॉयटर्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
"बिटकॉइनने १ लाख डॉलर्सचा ओलांडणे हे केवळ एक मैलाचा दगड आहे; हे वित्त, तंत्रज्ञान आणि भू-राजकारणातील बदलांचा एक पुरावा आहे,” असे हाँगकाँग येथील क्रिप्टो विश्लेषक जस्टिन डी'अनेथन यांनी सांगितले.
जानेवारी २०२५ मध्ये ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर क्रिप्टोकरन्सींबाबत त्यांची अनुकूल भूमिका क्रिप्टोकरन्सींच्या वाढीला अनुकूल ठरेल, अशी अपेक्षा आहे. या वर्षी बिटकॉइनचे मूल्य दुप्पट झाले आहे. तसेच ट्रम्प यांच्या निवडणुकीतील विजयानंतर चार आठवड्यांमध्ये त्यात सुमारे ४५ टक्के वाढ झाली आहे.
डेटा प्रोव्हायडर CoinGecko च्या माहितीनुसार, क्रिप्टोकरन्सी बाजाराचे एकूण मूल्य वर्षभरात जवळजवळ दुप्पट झाले आहे. ते ३.८ ट्रिलियन डॉलर्स इतक्या विक्रम उच्चांकावर गेले आहे. आशियात गुरुवारी सकाळी १ लाख डॉलर्सचा टप्पा पार केल्यानंतर ते १ लाख ३ हजार डॉलर्सच्या वर पोहोचले.
"आम्ही एक प्रतिमान बदल पाहत आहोत," असे अमेरिकेतील क्रिप्टो फर्म गॅलक्सी डिजीटलचे माइक नोवोग्रात्ज यांनी म्हटले आहे. "बिटकॉइन आणि संपूर्ण डिजिटल मालमत्ता इकोसिस्टम आता आर्थिक मुख्य प्रवाहात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे." असेही त्यांनी नमूद केले आहे.
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय आणि त्यांच्या सरकारमध्ये अधिक क्रिप्टोकरन्सी अनुकूल असे धोरण राबविले जाईल, या अपेक्षांमुळे बिटकॉइनने गेल्या काही दिवसांत मोठी उसळी घेतली आहे.