Bank Strike Postponed: बँक कर्मचाऱ्यांनी 28 सप्टेंबरपासून जाहीर केलेला तीन दिवसांचा देशव्यापी संप तूर्तास स्थगित केला आहे. इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) यांच्यात रविवारी रात्री झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
UFBUने 27 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या परिपत्रकातून याबाबत माहिती दिली. रविवारी रात्री साडेनऊ वाजता IBA आणि UFBU यांच्यात बैठक झाली. या बैठकीत बँक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर प्रस्तावित तीन दिवसांचा संप स्थगित करण्यावर सहमती झाली.
बँकिंग क्षेत्रात उर्वरित शनिवार सुट्टीचे दिवस म्हणून जाहीर करण्याच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी IBA आणि UFBUची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही समिती या मागणीबाबत उपलब्ध असलेल्या सर्व पर्यायांचा विचार करणार आहे. तसेच संबंधित पक्षांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
स्केल IV आणि त्यापुढील श्रेणीतील बँक अधिकाऱ्यांसाठी प्रस्तावित PLI योजनेबाबतही बैठकीत चर्चा झाली. या योजनेवर IBAसोबत पुढील चर्चा सुरू करण्यास सहमती दर्शवण्यात आली आहे.
याशिवाय, बँक कर्मचारी संघटना आणि अधिकाऱ्यांच्या संघटनांनी मांडलेल्या आक्षेपांचा विचार करून PLI योजनेत बदल करण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला जाणार आहे.
8 मार्च 2024 रोजी झालेल्या बैठकीत नोंदवण्यात आलेल्या काही प्रलंबित मुद्द्यांवरही लवकर तोडगा काढण्यासाठी चर्चा करण्याचे ठरले आहे.
या सर्व घडामोडींनंतर 28 सप्टेंबरपासून सुरू होणारा तीन दिवसांचा देशव्यापी बँक संप स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे बँक ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून, बँकांचे नियमित कामकाज सुरू राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.