ATM Cash Shortage  Pudhari
अर्थभान

ATM Cash Crunch: देशात रोख रकमेचा तुटवडा? केंद्र सरकार अलर्ट मोडवर; बँकांना दिला तातडीचा इशारा, काय घडतयं?

ATM Cash Crunch: देशातील एटीएममध्ये रोख रकमेचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होताच केंद्र सरकारने बँकांकडून तातडीचा अहवाल मागवला आहे.

पुढारी वृत्तसेवा

ATM Cash Crunch: देशभरातील एटीएममध्ये रोख रकमेचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत असताना केंद्र सरकारने तातडीने पावले उचलली आहेत. आर्थिक सेवा विभागाने (DFS) सर्व बँकांना एटीएममध्ये रोख भरण्याच्या प्रक्रियेत काही अडचणी येत आहेत का, याबाबत सविस्तर माहिती मागवली आहे. या पार्श्वभूमीवर एटीएम सेवांबाबत चिंता वाढली असली तरी परिस्थितीवर सरकार आणि रिझर्व्ह बँक बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

आर्थिक सेवा विभागाने बँकांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (CEO) ई-मेल पाठवून एटीएममध्ये रोख भरण्याच्या प्रक्रियेत कोणत्या समस्या येत आहेत, याची माहिती देण्यास सांगितले आहे. तसेच अशा अडचणी दूर करण्यासाठी कोणती पावले उचलली जात आहेत, याचाही तपशील मागवण्यात आला आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन विभागाने बँकांना तातडीने उत्तर देण्याचे निर्देश दिले.

ही चिंता अचानक निर्माण झालेली नाही. एटीएम उद्योगाशी संबंधित संस्थांनी यापूर्वीच भारतीय बँक संघटनेला (IBA) इशारा दिला होता की देशातील काही भागांमध्ये रोख रकमेचा पुरवठा होत नाही. विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागांमध्ये रोख व्यवहारांचे प्रमाण अद्याप मोठे आहे.

सरकारी योजनांचे लाभार्थी, पेन्शनधारक आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर एटीएमवर अवलंबून असल्याने एटीएममधील रोख रक्कम कमी पडल्यास त्याचा थेट परिणाम जनतेवर होऊ शकतो.

दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनीही या विषयावर भाष्य केले आहे. एटीएममध्ये रोख रकमेची कमतरता निर्माण झाल्यास ती तातडीने भरून काढण्यासाठी आवश्यक सर्व उपाय केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. ज्या ठिकाणी एटीएममध्ये रोख संपेल, तेथे शक्य तितक्या वेगाने पैसे उपलब्ध करून दिले जातील, असेही त्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे एटीएममध्ये रोख रक्कम संपल्यास त्याचा फटका केवळ ग्राहकांनाच बसत नाही, तर बँकांनाही आर्थिक दंडाचा सामना करावा लागू शकतो. रिझर्व्ह बँकेने 2021 मध्ये जारी केलेल्या नियमांनुसार, एखाद्या एटीएममध्ये महिनाभरात 10 तासांपेक्षा जास्त काळ रोख रक्कम उपलब्ध नसेल, तर संबंधित बँक किंवा व्हाईट-लेबल एटीएम ऑपरेटरवर दंड आकारला जाऊ शकतो.

सध्या देशभरात एटीएम सेवा सुरळीत सुरू असल्याचे सरकारचे म्हणणे असले, तरी रोख पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या चिंतेमुळे केंद्र सरकारने परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एटीएममधील रोख रकमेचा संभाव्य तुटवडा टाळण्यासाठी पुढील काही दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT