अर्थभान

अर्थवार्ता : ‘जीवन सरल’ विमा पॉलिसी

Pudhari News

'एलआयसी' विरुद्ध मुंबईस्थित 'मनीलाईफ फाऊंडेशन' या स्वयंसेवी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. सुमारे पाच कोटी नागरिकांना वितरित केल्या गेलेल्या 'जीवन सरल' विमा पॉलिसीच्या परताव्यामध्ये आणि हमी दिलेल्या परताव्यामध्ये फरक असल्याचे स्वयंसेवी संस्थेचे म्हणणे. 15 जुलै रोजी प्रकरण सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात येणार. जीवन सरलविषयी तक्रारीनंतर मनीलाईफ फाऊंडेशनने याचिका दाखल केली.

गतसप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकाने अनुक्रमे 258.65 आणि 777.16 अंकांची घसरण दर्शवून 11552.5 व 38736.23 अंकांच्या पातळीवर बंदभाव दिला. निफ्टी व सेन्सेक्स निर्देशाकांमध्ये अनुक्रमे 2.19 टक्के आणि 1.97 टक्क्यांची घट झाली.

जून महिन्यात देशातील किरकोळ महागाई दर (कन्स्युमर प्राईस इंडेक्स) 3.18 टक्के इतका राहिला. मे महिन्यात हा किरकोळ महागाई दर 3.05 टक्के इतका होता. डाळीच्या किमतींनी मागील 33 महिन्यांचा उच्चांक गाठल्याने अन्नधान्य किमतींमध्ये वाढ झाली. भारताचा औद्योगिक उत्पादनवृद्धी दर (आयआयपी) मे महिन्यात 3.18 टक्के राहिला. मागील वर्षीच्या मे महिन्यात हा दर 3.8 टक्के इतका होता.

देशातील सर्वात मोठी बलाढ्य कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा नफा 21.3 टक्के वधारून 8131 कोटी (सुमारे 1.16 अब्ज डॉलर्स) पर्यंत पोहोचला. त्याचप्रमाणे कंपनीच्या महसुलात मागील वर्षीच्या तुलनेत 11.4 टक्क्यांची वाढ होऊन महसूल 38172 कोटींवर पोहचला. टी.सी. एस. कंपनीची एक महत्त्वाची ग्राहक कंपनी 'डॉईश बँक' तंत्रज्ञान आधुनिकीकरणासाठी 13 अब्ज डॉलर्स खर्च करण्याचे जाहीर झाल्यावर याचा मोठा फायदा तंत्रज्ञान सेवा पुरवणार्‍या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत आयटी क्षेत्रातील दुसर्‍या क्रमांकाची बलाढ्य कंपनी इन्फोसिस नफा 5.3 टक्के वधारून 3802 कोटींवर पोहोचला. त्याचप्रमाणे महसुलात मागील वर्षीच्या तुलनेत 12.4 टक्क्यांची वाढ होऊन 21,803 कोटींवर पोहोचला. कंपनीने या तिमाही सर्वात मोठे 2.7 अब्ज डॉलर्सचे कंत्राट मिळवले. कंपनीने यापुढे 8.5 टक्के ते 10 टक्के महसूलवाढीचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.

देशातील खासगी क्षेत्रातील एक प्रमुख बँक इंडसिंड बँकेचा चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचा निव्वळ नफा मागील वर्षीच्या तुलनेत 38 टक्क्यांनी वधारून 14.33 कोटींवर पोहोचला. त्याचप्रमाणे बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न (नेट इंटरेस्ट इन्कम) मागील वर्षी असणार्‍या 2232 कोटींवरून 34 टक्क्यांनी वाढून 2844 कोटींवर पोहोचले. बँकेचे एकूण अनुत्पादित कर्जाचे प्रमाण 2.15 टक्क्यांवर असून निव्वळ अनुत्पादित कर्जाचे प्रमाण 2.15 टक्क्यांवर असून निव्वळ अनुत्पादित कर्जाचे प्रमाण 1.23 टक्क्यांवर पोहोचले. बँकेचा महसूल 8625 कोटींवर पोहोचला.

वाहन कर्ज पुरवठा क्षेत्रात कार्यरत असणार्‍या श्रीराम ट्रान्स्पोर्ट फायनान्स कंपनीने परदेशी रोख्यांच्या चलनस्वरूपात 250 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 1750 कोटी) उभे केले. रोख्यांचा व्याजदर 5.37 टक्के निश्चित करण्यात आला.

रिझर्व्ह बँकेने रेपो रेट दरांमध्ये कपात केल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या कर्जदारात 0.05 टक्क्यांची कपात केली. नुकतीच बँकेने आपल्या गृहकर्ज व्याजदरात 0.20 टक्क्यांची कपात केली होती. 

अनिल अंबानी यांचा 'अनिल धिरुभाई अंबानी गु्रप' आपल्या व्यवसायावरचा कर्जदार कमी करण्यासाठी विविध क्षेत्रांतील आपले व्यवसाय विकून 21700 कोटी उभे करणार. मागील 14 महिन्यांमध्ये एडीएजी समूहाने 35000 कोटींचे व्यवहार विकून टाकले. समूहावर 93900 कोटींचा कर्जभार आहे.

समभाग पूर्ण खरेदीवर 20 टक्क्यांवर कर लादल्याने बहुतांश कंपन्यांनी पुनर्खरेदीचा प्रस्ताव बासनात गुंडाळला. केपीआर मिलने आपले समभाग पुनर्खरेदीचा निर्णय देखील मागे घेतला. आकारल्या जाणार्‍या या 20 टक्क्यांच्या करावर सरकारी पातळीवर पुनर्विचार करण्यात येत असल्याचे केंद्रीय अर्थसचिव सुभाषचंद्र गर्ग यांचे प्रतिपादन. भारताच्या परकीय गंगाजळीत वाढ. गंगाजळी आजपर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर 429.91 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT