अर्थभान

अर्थवार्ता

Arun Patil

गतसप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स निर्देशांकांमध्ये अनुक्रमे एकूण 111.40 अंक व 298.22 अंकांची घसरण होऊन दोन्ही निर्देशांक 18203.4 अंक तसेच 61729.68 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये 0.61 टक्के, तर सेन्सेक्समध्ये 0.48 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेच्या कर्ज उभारणी क्षमतेबद्दलचा मुद्दा गाजत आहे. सध्या अमेरिकेमध्ये बाजारातून कर्जे उचलण्याची सरकारची मर्यादा 31.4 लाख कोटी डॉलर्स इतकी निश्चित करण्यात आली आहे. परंतु अमेरिकेच्या सरकारी कोषागार विभागानेही मर्यादा न वाढवल्यास 1 जूनपासून सरकारची देणी थकीत होण्याची शक्यता वर्तवली आहे. असे झाल्यास अमेरिकेचे सरकार 1 जूनपासून उचललेल्या कर्जावरचा परतावा देण्यास असमर्थ ठरेल (डेट डिफॉल्ट). यासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची तेथील विरोधी पक्षासोबत बोलणी चालू असून, लवकरच यावर तोडगा काढला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रिझर्व्ह बँकेने 2 हजारांच्या नोटा बाजारातून मागे घेण्याचे निश्चित केले. 2 हजारांच्या बदल्यात नागरिकांना 23 मे ते 30 सप्टेंबर कालावधीत नोटा बदलून मिळतील. एकावेळी एका बँकेतून 20 हजारांपर्यंत रकमेच्या 2 हजारांच्या नोटा बदलता येतील.

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचे मार्च 2023 तिमाहीचे निकाल जाहीर. मागील वर्षीच्या तुलनेत या तिमाहीत निव्वळ नफा तब्बल 16695 कोटींवर पोहोचला. नफ्यात 83 टक्क्यांची वाढ झाली. निव्वळ व्याज उत्पन्नात (एनआयआय) 29 टक्क्यांची वाढ होऊन हे उत्पन्न 31198 कोटींवरून 40393 कोटींवर पोहोचले. एकूण अनुत्पादित कर्जाचे प्रमाण 3.97 टक्क्यांवरून 2.78 टक्के तसेच निव्वळ अनुत्पादित कर्जाचे प्रमाण 1.02 टक्क्यांवरून 0.67 टक्के झाले. अनुत्पादित कर्जे तसेच इतर कारणांसाठी कराव्या लागणार्‍या तरतुदीमध्ये (प्रोव्हिजन्स) घट होऊन तरतुदी 10603 कोटींवरून 7927 कोटी झाल्या.

31 मार्च 2023 अखेर संपलेल्या वर्षासाठी रिझर्व्ह बँकेने 87416 कोटींचा अधिकचा निधी (सरप्लस) केंद्र सरकारला जमा करण्याचा निर्णय जाहीर केला. मागील वर्षी रिझर्व्ह बँकेने 30307 कोटींचा निधी केंद्र सरकारला दिला होता. आर्थिक वर्ष 2023-2024 मध्ये केंद्र सरकारने एकूण 91 हजार कोटींचा लाभांश मिळण्याचा अंदाज बांधला आहे. यापैकी 48 हजार कोटी रिझर्व्ह बँक तसेच इतर सरकारी बँका आणि 43 हजार कोटी इतर सरकारी कंपन्यांकडून येणे अपेक्षित आहे.

देशातील महत्त्वाची एफएमसीजी क्षेत्रातील कंपनी आयटीसीचा नफा मागील वर्षाच्या तुलनेत 23.4 टक्क्यांनी वधारून 5175 कोटी झाला. मार्च 2023 अखेर संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या महसुलात 7.3 टक्क्यांची वाढ होऊन महसूल 19058 कोटींवर पोहोचला. कंपनीच्या संचालक मंडळाने प्रतिसमभाग 95 टक्क्याचा लाभांशा जाहीर केला.

एप्रिल 2023 महिन्यात भारतातमील घाऊक महागाईदर (डब्ल्यूपीआय इनफ्लेक्शन) आश्चर्यकारकरित्या उणे 0.92 टक्के (92 टक्के)पर्यंत खाली आला. जुलै 2020 नंतरचा तब्बल 34 महिन्यांचा हा नीचांकी आकडा आहे. नुकतेच किरकोळ महागाई दराचे आकडेदेखील जाहीर झाले. किरकोळ महागाई दर (सीपीआय इन्फ्लेक्शन) मागील 18 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर म्हणजे 4.7 टक्क्यांपर्यंत खाली आला.

देशातील दुसर्‍या क्रमांकाची सरकारी बँक बँक ऑफ बडोदाचा व 31 मार्च 2023 तिमाहीचा नफा मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल 168 टक्क्यांनी वधारून 4775 कोटींवर पोहोचला. निव्वळ व्याज उत्पन्नदेखील 33.8 टक्क्यांची भरघोस वाढ होऊन निव्वळ व्याज उत्पन्न (एनआयआय) 11525 कोटींवर पोहोचले. एकूण अनुत्पादित कर्जाचे प्रमाण (ग्रॉस एनपीए) 6.61 टक्क्यांवरून 3.79 टक्क्यांपर्यंत खाली आले.

लवकरच आंतरराष्ट्रीय कंपनी 'टेस्ला' भारतात गाड्या बनवण्यासाठी कारखाना स्थापण्याची शक्यता. केंद्र सरकारने इलेक्ट्रिक गाड्यानिर्मिती संबंधित 'उत्पादन आधारित प्रोत्साहन योजने'त (पीएलआय स्कीम) काही बदल करून नव्याने अस्तित्वात आणली. यापूर्वी टेस्ला सध्या अस्तित्वात असलेली 100 टक्क्यांचा आयात कर 40 टक्क्यांवर आणून, बाहेर बनवलेली गाडी भारतात आणून विकण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणत होती. परंतु केंद्र सरकार भारतातच गाड्यांची निर्मिती करून स्थानिक रोजगार निर्माण करण्यावर ठाम होते. अखेर या योजनेद्वारे 'टेस्ला' कंपनीचा भारतात वाहन उत्पादनाचा मार्ग मोकळा झाला.

मार्च 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत देशातील महत्त्वाची दूरसंचार कंपनी 'भारती एअरटेल'चा निव्वळ नफा मागील वर्षीच्या तुलनेत 89 टक्के वधारून 3006 कोटींवर पोहोचला. एकूण महसुलात मागील तिमाहीच्या तुलनेत 1 टक्का वाढ होऊन महसूल 36000 कोटींवर गेला. प्रतिग्राहक सरासरी महसूल (एव्हरेज रेव्हेन्यू परयुजर) 193 रुपये असून, प्रतिस्पर्धी कंपनी जिओचा महसूल 178.8 रुपये इतका आहे.

'बर्गरकिंग' कंपनीमधील प्रमुख गुंतवणूकदार एव्हरस्टोन कॅपीटलमधील 41 टक्के हिस्सा विक्रीसाठी प्रयत्नशील. एडव्हेंट आणि जनरल अ‍ॅटलांटिक गुंतवणूकदार कंपनी हिस्सा खरेदीसाठी उत्सुक. एव्हरस्टोनचा 41 टक्के हिस्सा सध्याच्या बाजारभावाप्रमाणे 2500 कोटींच्या जवळपास आहे.

सरकारी बँक पीएनबीचा मार्च 2023 तिमाहीचा निव्वळ नफा 474.8 टक्क्यांनी वधारून 201.57 कोटींवरून थेट 1159 कोटींवर पोहोचला. निव्वळ व्याज उत्पन्नात मागील वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत 30.05 टक्क्यांची वाढ होऊन उत्पन्न 9499 कोटींवर पोहोचले. निव्वळ अनुत्पादित कर्जाचे प्रमाण (नेट एनपीए) 4.8 टक्क्यांवरून 2.72 टक्के झाले तसेच तरतुदींमध्ये (प्रोव्हिजन्स) 21 टक्के घट होऊन तरतुदी 3830.58 कोटी झाल्या.

12 मे अखेर संपलेल्या सप्ताहात भारताची विदेश चलन गंगाजळी 3.55 अब्ज डॉलर्स वधारून 599.53 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव (ब्रेंटक्रुड) 75 डॉलर्सपर्यंत प्रती बॅरल स्थिरावल्याने देशांतर्गत तेल उत्पादनावर आकारला जाणारा 4100 रुपये प्रती टनांचा विंडफॉल टॅक्स केंद्र सरकारने मागे घेतला. याचा फायदा देशांतर्गत तेल उत्खनन कंपन्यांना होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT