पुढारी ऑनलाईन डेस्क : एलोन मस्क यांच्या स्पेसएक्ससोबत करार करण्यात आला आहे. या करारांतर्गत कंपनी स्पेसएक्सच्या सॅटेलाइट इंटरनेट डिव्हिजन स्टारलिंकद्वारे भारतातील ग्राहकांना हाय-स्पीड इंटरनेट सेवा प्रदान करेल, अशी घोषणा टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलने केली आहे. या घोषणेनंतर भारती एअरटेल कंपनीचे शेअर्स ३% पर्यंत वाढले. ( Airtel signs deal with Elon Musk)
टेलिकॉम क्षेत्रातील दिग्गज भारती एअरटेलने भारतात स्टारलिंकच्या उपग्रह इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी स्पेसएक्ससोबत करार केला आहे, असे एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे. तथापि, हा करार स्पेसएक्सने देशात स्टारलिंक सेवा विकण्यासाठी नियामक मंजुरी मिळविण्याच्या अधीन आहे. या भागीदारीद्वारे, एअरटेल आणि स्पेसएक्स संपूर्ण भारतात इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा विस्तार आणि सहकार्य करण्याचे मार्ग शोधतील. कराराचा एक भाग म्हणून, एअरटेल त्यांच्या रिटेल स्टोअरमध्ये स्टारलिंक उपकरणे देऊ शकते आणि व्यवसायांना स्टारलिंकचे हाय-स्पीड सॅटेलाइट इंटरनेट प्रदान करू शकते.
कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, कनेक्टिव्हिटी वाढवण्याव्यतिरिक्त या करारामुळे कंपनी स्टारलिंकच्या उपग्रह तंत्रज्ञानामुळे एअरटेलचे विद्यमान नेटवर्कमध्ये कशी वाढ होईल, याचा पाठपुरावा करेल. एअरटेलने आधीच सॅटेलाइट ब्रॉडबँडसाठी युटेलसॅट वनवेबसोबत भागीदारी केली आहे. स्टारलिंकचा त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये समावेश केल्याने त्यांचे कव्हरेज कमी किंवा इंटरनेट अॅक्सेस नसलेल्या भागात वाढेल. दुर्गम भागातील व्यवसाय आणि समुदायांना हाय-स्पीड ब्रॉडबँडच्या अधिक प्रवेशाचा फायदा होईल, ज्यामुळे वाढ आणि विकासासाठी नवीन संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही कंपनीने व्यक्त केला आहे.