IT Job Cuts FY26: भारतातील आयटी क्षेत्र एकेकाळी मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या निर्माण करणारे क्षेत्र म्हणून ओळखले जात होते. मात्र आता या क्षेत्रात मोठा बदल दिसू लागला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI च्या वाढत्या प्रभावामुळे देशातील मोठ्या आयटी कंपन्या आपली कार्यपद्धती बदलत आहेत आणि त्याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांवर होताना दिसत आहे. आर्थिक वर्ष 2026 मध्ये देशातील आघाडीच्या आयटी कंपन्यांच्या कर्मचारी संख्येत मोठी घट झाली आहे.
Tata Consultancy Services, Infosys, HCLTech, Wipro आणि Tech Mahindra या देशातील प्रमुख आयटी कंपन्यांमध्ये मिळून तब्बल 7,389 कर्मचाऱ्यांची घट झाली आहे. विशेष म्हणजे मागील आर्थिक वर्षात या कंपन्यांनी कर्मचारी संख्या वाढवली होती. त्यामुळे यंदाची घसरण अधिक गंभीर मानली जात आहे.
या सगळ्यात सर्वात मोठा धक्का Tata Consultancy Services ने दिला आहे. देशातील सर्वात मोठ्या खासगी क्षेत्रातील नियोक्त्या असलेल्या या कंपनीने तब्बल 12 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय कॉर्पोरेट क्षेत्रातील ही अलीकडच्या काळातील सर्वात मोठ्या नोकरकपातींपैकी एक मानली जात आहे.
AI तंत्रज्ञानामुळे कंपन्यांच्या कामाची पद्धत वेगाने बदलत आहे. अनेक कामे आता ऑटोमेशन आणि AI च्या मदतीने केली जात असल्याने पारंपरिक कामांची गरज कमी होत आहे. त्यामुळे कंपन्या आता मोठ्या प्रमाणावर भरती करण्याऐवजी निवडक कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांवर भर देत आहेत.
Infosys मध्ये आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत 8,440 कर्मचाऱ्यांची घट झाली. दुसरीकडे Tech Mahindra मध्ये जवळपास 1,993 कर्मचारी कमी झाले. मात्र HCLTech आणि Wipro यांनी काही प्रमाणात कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली आहे.
NASSCOM च्या अहवालानुसार, भारताच्या टेक्नॉलॉजी क्षेत्राने आर्थिक वर्ष 2026 मध्ये केवळ 2 हजार नवीन नोकऱ्या निर्माण केल्या. हा आकडा पाहता आयटी क्षेत्रातील भरती जवळपास ठप्प झाल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान, कंपन्यांनी भविष्यातील भरतीबाबत सावध भूमिका घेतली आहे. Tata Consultancy Services ने पुढील आर्थिक वर्षात 25 हजार नवीन कर्मचाऱ्यांना संधी देण्याचे संकेत दिले आहेत. हा आकडा मागील वर्षांच्या तुलनेत खूपच कमी आहे. Infosys सुमारे 20 हजार नवीन भरती करण्याच्या तयारीत आहे, तर इतर कंपन्या मागणीनुसार निर्णय घेणार असल्याचे सांगत आहेत.
कंपन्यांचे म्हणणे आहे की आता त्यांचा भर AI, क्लाऊड कम्प्युटिंग, सायबर सिक्युरिटी, डेटा सायन्स आणि डिजिटल इंजिनिअरिंग यांसारख्या विशेष कौशल्यांवर आहे. त्यामुळे पारंपरिक आयटी नोकऱ्यांपेक्षा अत्याधुनिक कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांची मागणी वाढत आहे.
या बदलामुळे आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. AI मुळे रोजगार कमी होतील का, हा प्रश्न आता अधिक तीव्रतेने पुढे येऊ लागला आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते, तंत्रज्ञान बदलत असताना कर्मचाऱ्यांनीही नवीन कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे, अन्यथा भविष्यातील स्पर्धेत टिकणे कठीण होऊ शकते.