फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन Pudhari File Photo
अर्थभान

अर्थज्ञान : फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅनचे फायदे

पुढारी वृत्तसेवा
जगदीश काळे

आर्थिक गुंतवणुकीत फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन हा एक सुरक्षित आणि चांगला परतावा देणारा प्लॅन समजला जातो. बँकेत किंवा एखाद्या वित्तीय संस्थेत ज्याप्रमाणे मुदत ठेव असते त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडमध्ये फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन असतो. फरक एवढाच की शेअर बाजारातील स्थितीप्रमाणे युनिट आपल्याला मिळत असतात. बाजार पडलेला असेल, तर अधिक युनिट मिळतात आणि वरच्या पातळीवर सक्रिय असेल तर कमी युनिट मिळतात. अर्थात, कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करतोय, हे सुद्धा महत्त्वाचे ठरते. तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी पैसा ठेवल्यास कर सवलत देखील गुंंतवणूकदाराला मिळते.

सद्यस्थितीत मुदत ठेवीवरील व्याजदरात घसरण झालेली असताना म्युच्युअल फंडच्या फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅनमध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरत आहे. ज्यांना शेअर बाजारात गुंतवणूक करणे जोखमीचे वाटते किंवा दरमहा एसआयपी करणे शक्य नाही आणि परतावाही चांगला हवा असेल, तर अशा गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडच्या मॅच्युरिटी प्लॅनमध्ये गुंतवणुकीचा विचार करावयास हरकत नाही. अनेक म्युच्युअल फंड कंपन्यांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा देणार्‍या योजना आणल्या असून, गुंतवणूक सल्लागारांच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा विचार करावा.

मॅच्युरिटी प्लॅनचे फायदे

मॅच्युरिटी प्लॅनचा सर्वाधिक फायदा म्हणजे ही योजना एखाद्या मुदत ठेवीप्रमाणे लाभ देणारी असून, करसवलतही गुंतवणूकदारांना प्रदान करते. कधी कधी कमी कालावधीतही या योजना चांगला फायदा मिळवून देतात; तर कधी दीर्घकाळातही अपेक्षेपेक्षा अधिक लाभ देतात. पीपीएफ गुंतवणूक केल्यास किमान सात वर्षे वाट पाहावी लागते, तसेच पोस्टाच्या किंवा बँकांच्या करसवलत देणार्‍या मुदत ठेव योजनेतूनही किमान पाच वर्षे पैसे काढता येत नाहीत. अशा स्थितीत म्युच्युअल फंडमध्ये कालावधी हा किमान काही महिने ते तीन वर्षांचा असल्याने अधिक काळ पैसा गुंतवण्याची आवश्यकता भासत नाही तसेच कमी काळातही चांगला परतावा मिळण्याची शक्यता अधिक असते. सध्या बँकांचे आणि करसवलत देणार्‍या योजनांच्या व्याजदरात कपात होत असताना गुंतवणूकदार गांभीर्याने मॅच्युरिटी प्लॅनकडे पाहत आहे.

करसवलत

म्युच्युअल फंडच्या कोणत्या फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅनमध्ये गुंतवणूक करत आहात, त्यावर करसवलत अवलंबून आहे. लाभांश की ग्रोथ योजना यावर सवलत अवलंबून असते. डिव्हिडंड (लाभांश) योजनेत गुंतवणूकदारांना डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स (डीडीटी) लागू होतो. दुसरीकडे ग्रोथ पर्यायात योजनेतून मिळणारा परतावा हा कॅपिटल गेन म्हणून गृहीत धरला जातो. सामान्य मुदतठेवीच्या तुलनेत मॅच्युरिटी प्लॅनमध्ये अधिक परतावा मिळत असल्याने म्युच्युअल फंडच्या नियमानुसार कर भरावा लागतो. जर करसवलत देणार्‍या योजनेत गुंतवणूक केल्यास किमान तीन वर्षे आणि कमाल कालावधीला मर्यादा नसल्याने त्यानंतर काढून घेतलेली रक्कम ही करमुक्तअसते.

कालावधी

बँकेची सर्वसाधारण मुदत ठेव आणि मॅच्युरिटी फिक्स्ड प्लॅनचा कालावधी जवळपास सारखाच असतो. आपल्या सोयीनुसार कालावधी निवडू शकतो आणि त्यात गुंतवणूक करू शकतो. काही महिन्यांपासून ते अनेक वर्षांपर्यंत या योजनेत गुंतवणूक करता येते. गरजेनुसार गुंतवणूक योजना निवडून त्यात रक्कम गुंतवता येते. म्युच्युअल फंड मॅनेजरशी संपर्क साधून कोणत्या योजनेने अधिक परतावा दिला आहे, त्याची माहिती घेऊन म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीचा विचार करावा.

तरलता

बँकेच्या मुदत ठेवीप्रमाणेच म्युच्युअल फंडच्या मॅच्युरिटी प्लॅनची वैशिष्ट्ये असतात. त्यामुळे या योजनेत तरलता नसते. मुदत ठेवीवर कर्जही मिळते; मात्र म्युच्युअल फंडच्या फिक्स्ड योजनेवरील कर्जाबाबत प्रत्येक कंपन्यांचे धोरण वेगळे आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT