पुढारी ऑनलाईन डेस्क : अदानी समुहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यासह सात अधिकाऱ्यांवर सिक्युरिटीज फसवणूक, वायर फ्रॉड आणि फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस ॲक्ट (FCPA) चे उल्लंघन केल्याप्रकरणी अमेरिकेत आरोप ठेवण्यात आले आहेत. याबाबतचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. त्यांच्यावर अमेरिकेत त्यांच्या कंपनीला कंत्राट मिळण्यासाठी २६५ दशलक्ष डॉलर्सची लाच दिल्याचा आणि हे प्रकरण लपवल्याचा आरोप आहे. दरम्यान, या प्रकरणी गौतम अदानी आणि त्यांच्या पुतण्यावर अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.
दरम्यान, या वृत्तानंतर आज गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात अदानी समुहातील कंपन्यांचे शेअर्स (Adani Group shares) २० टक्क्यांपर्यंत घसरले. अदानी एनर्जी सोल्यूशन्स शेअर्सला सर्वाधिक फटका बसला. हा शेअर्स २० टक्के घसरला. अदानी ग्रीन शेअर्स सुमारे १८ टक्के घसरला. अदानी टोटल गॅस आणि अदानी पॉवर १३ ते १४ टक्क्यांनी घसरले. अदानी एंटरप्रायजेस, अंबुजा सिमेंट्स, एसीसी, अदावी पोर्ट्स या शेअर्सना १० टक्क्यांचे लोअर सर्किट लागले.
न्यूयॉर्कमधील ब्रुकलिन फेडरल कोर्टात त्यांच्यावरील आरोप निश्चित करण्यात आले. सौरऊर्जा कंत्राट मिळवण्यासाठी लाच देणे आणि सुमारे ३ अब्ज डॉलर्स उभारण्यासाठी आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचा अदानींवर आरोप आहे.
अदानी यांनी बुधवारी ग्रीन एनर्जीमध्ये गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. अदानी यांनी अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतील विजयाबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन करताना ही घोषणा केली होती. “अदानी यांनी गुंतवणुकीची घोषणा करताना ट्रम्प यांचे अभिनंदनही केले.” असे रॉयटर्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
सरकारी वकिलांनी सांगितले की, अदानी आणि त्याचा पुतण्या सागर अदानी यांच्यासह सात जणांनी २० वर्षांत २ अब्ज डॉलर नफा मिळवून देणारे आणि भारतातील सर्वात मोठे सौर ऊर्जा प्रकल्प प्रकल्प उभारण्यासाठी भारतीय सरकारी अधिकाऱ्यांना सुमारे २६५ दशलक्ष डॉलर्स लाच देण्याचे मान्य केले.
अदानी आणि अदानी ग्रीन एनर्जीचे आणखी एक कार्यकारी माजी सीईओ विनीत जैन यांनी बँक आणि गुंतवणूकदारांपासून त्यांचा भ्रष्टाचार लपवून ठेवण्यापासून ३ अब्ज डॉलरपेक्षा पेक्षा अधिक रक्कम कर्जे आणि रोख्यातून उभी केली, असेही सरकारी वकिलांनी म्हटले आहे.