सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने 70 लाख गुंतवणूकदारांवर केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, इक्विटी विभागात इंट्राडे ट्रेडिंग करणार्या 71 टक्के गुंतवणूकदारांनी त्यांचे पैसे गमावले आहेत. त्यांचा सरासरी तोटा 5,371 रुपये होता.
शेअरच्या किमतींमध्ये दिवसभरात चढ-उतार होत असतात. स्टॉक कोणत्या दिशेने जाईल याच्या अंदाजावर आधारित बहुतेक गुंतवणूकदार इंट्राडे प्लेस बेटस् ट्रेडिंग करतात. यामध्ये काहीवेळा फायदा होऊ शकतो. परंतु, दररोजच्या आधारावर स्टॉकमधील चढ-उताराचा अचूकपणे अंदाज बांधणे कठीण असते. तेजीच्या बाजारामध्ये जेव्हा बहुतेक शेअर्स दीर्घकाळ वाढत राहतात, तेव्हा ट्रेडर्स नफा मिळवू शकतात; पण अशावेळी ही मंडळी या यशाचे श्रेय बाजाराच्या ट्रेंडला न देता त्यांच्या स्वतःच्या कौशल्याला देतात. पण, दुसर्या दिवशी जेव्हा बाजार घसरतो, तेव्हा बहुतेक गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होते आणि हे कौशल्य कुचकामी ठरल्याचे लक्षात येते.
इंट्राडे ट्रेडिंग करणार्यांना नेहमी असे वाटते की, त्यांना पैसे कमावण्याची 50-50 संधी आहे. वास्तविक, तज्ज्ञांच्या मते, सर्व गुंतवणूकदारांना समान ज्ञान, अनुभव आणि समान गुंतवणूक साधने असतील, तरच हे खरे होऊ शकते; पण अशी स्थिती कधीच नसते. किरकोळ गुंतवणूकदार हे सर्वात कमकुवत असतात. मात्र, तरीही ते अनुभवी गुंतवणूकदारांशी स्पर्धा करत राहतात, ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसे असतात, ज्यांच्याकडे अधिक माहिती आणि डेटा तसेच वेगवान संगणक असतात. यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांचे मोठ्या प्रमाणात पैसे कमावण्याचे स्वप्न नित्यनेमाने भंग पावते.
दुसरी गोष्ट म्हणजे, इंट्राडे ट्रेडिंग हे काहीसे जुगारासारखे आहे. त्याची सवयच नव्हे, तर व्यसन जडू शकते. त्यामुळेच कितीही नुकसान झाले तरी एक दिवस परिस्थिती बदलेल, अशी आशा बाळगून ही मंडळी ट्रेडिंग करत राहतात. शिवाय, यात फक्त काही हजार रुपये गुंतवले जात असल्याने त्याची फारशी भीती राहात नाही. परंतु, अखेरीस ही छोटी रक्कम हळूहळू मोठी होत जाते, तेव्हा त्यांना गंभीर आर्थिक नुकसान सहन करावे लागते. या नुकसानीचे एक प्रमुख कारण म्हणजे स्टॉपलॉसचा वापर न करता आपला ट्रेड फायद्यातच जाईल, या आशेवर बसतात आणि मोठे नुकसान पदरी पाडून घेत बाहेर पडतात. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये स्टॉकच्या वाढीचा आणि घसरणीचा अंदाज लावण्यात चार्ट 100 टक्के मदत कधीच करत नाहीत, हे सत्य स्वीकारायला हवे.
अभ्यासकांच्या मते, जे पूर्णवेळ काम करतात किंवा इतर कोणतेही काम करतात त्यांनी इंट्राडे ट्रेडिंग टाळावे. कारण ते त्यांचे पूर्ण लक्ष याकडे देऊ शकत नाहीत. गाडी चालवताना ज्याप्रमाणे लक्ष हटल्यास अपघात होतो, तशाच प्रकारे यामध्येही नीट लक्ष न दिल्यास आर्थिक अपघात होऊन मोठी दुखापत होऊ शकते. सबब रोज इंट्राडे करायचेच असेल, तर छोट्या रकमेपासून सुरुवात करा आणि तुमच्या ट्रेडिंगचा मागोवा ठेवा. यामध्ये वित्तीय शिस्त महत्त्वाची आहे. ती जमत नसल्यास त्याऐवजी पोझिशनल ट्रेडिंग करा. इंट्राडे ट्रेडिंग एखाद्याच्या निव्वळ गुंतवणुकीच्या 5 टक्क्यांपर्यंत मर्यादित असावे आणि जर ती रक्कम बुडाली, तर ट्रेडिंग थांबवावे.