विवेक कुलकर्णी
शिस्तबद्ध गुंतवणूक आणि चक्रवाढ व्याजाच्या शक्तीवर विश्वास ठेवत आपण 15 वर्षांत 1 कोटीचा निधी सहज तयार करू शकता. या संकल्पनेचा मुख्य आधार हा चक्रवाढ व्याज असून, ते काळाच्या ओघात गुंतवणुकीला जबरदस्त वेगाने वाढवते. त्यामुळे कोट्यधीश होण्याचा मार्ग सुकर होतो.
‘15-15-30’ हा संपत्ती निर्माण करण्याचा एक सोपा आणि परिणामकारक फॉर्म्युला आहे. या नियमानुसार, एखाद्या गुंतवणूकदाराने दर महिन्याला 15,000 रुपयांची गुंतवणूक 15 वर्षांसाठी केली आणि त्यावर सरासरी 15% वार्षिक परतावा मिळवला, तर तो सुमारे 1 कोटीचा निधी तयार करू शकतो. या संकल्पनेचा मुख्य आधार म्हणजे चक्रवाढ व्याज. जे काळाच्या ओघात गुंतवणुकीला जबरदस्त वेगाने वाढवते.
जेव्हा एखादा गुंतवणूकदार म्युच्युअल फंड निवडतो, तेव्हा त्याचे एक उद्दिष्ट असते. म्हणजे विशिष्ट परतावा आणि भविष्यातील निधी. ‘15-15-30’ हा नियम कोट्यधीश होण्याचे स्वप्न पाहणार्यांसाठी एक सरळ आणि साधा मार्ग दर्शवतो.
चक्रवाढ व्याज म्हणजे फक्त मूळ रकमेवर नाही, तर त्यावर मिळालेल्या व्याजावरही व्याज मिळणे. सुरुवातीला रिटर्न कमी वाटतो, पण कालांतराने ते झपाट्याने वाढत जातात. जितका कालावधी लांब, तितका चक्रवाढ प्रभाव जास्त!
नियमित व शिस्तबद्ध गुंतवणुकीमुळे संपत्ती निर्माण होते.
सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठीही सुलभ आणि अंमलात आणण्याजोगी योजना.
आर्थिक उद्दिष्टांनुसार एसआयपी रक्कम आणि कालावधी समायोजित करता येतो.
जोखीम आणि विचार करावयाच्या बाबी
हा नियम उपयुक्त असला, तरी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात:
इक्विटी फंड म्हणजे शेअर बाजाराशी संबंधित गुंतवणूक, त्यामुळे चढ-उतार संभवतात.
दरवर्षी 15% परतावा मिळेलच याची हमी नसते.
योग्य फंडाची निवड, संयम आणि दीर्घकालीन द़ृष्टी ठेवणे अत्यावश्यक आहे.
कसा सुरू करावा हा प्रवास?
आपल्या आर्थिक उद्दिष्टांचा आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेचा आढावा घ्या.
यशस्वी ट्रॅक रेकॉर्ड असलेल्या इक्विटी म्युच्युअल फंडाची निवड करा.
दर महिन्याची 15,000 ची एसआयपी सुरू करा आणि ती स्वयंचलित पद्धतीने भरण्याची सोय ठेवा.
वेळोवेळी आपल्या गुंतवणुकीचा आढावा घ्या आणि ती आपल्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे का, ते तपासा.
‘15-15-30’ हा नियम सोपा असला, तरी त्यामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. शिस्तबद्ध गुंतवणूक आणि चक्रवाढ व्याजाच्या शक्तीवर विश्वास ठेवत आपण 15 वर्षांत 1 कोटीचा निधी सहज तयार करू शकता. आजच आर्थिक सल्लागाराशी सल्लामसलत करा आणि आपल्या आर्थिक स्वप्नांच्या दिशेने पहिले पाऊल उचला.
(टीप : गुंतवणूक करताना बाजारातील जोखीम लक्षात घेऊन विचारपूर्वक निर्णय घ्यावा. लेख केवळ माहिती स्वरुपाचा आहे.)
या नियमानुसार, दर महिन्याला 15,000 गुंतवले, तर वर्षाला 1.8 लाख इतकी गुंतवणूक होते. जर ही गुंतवणूक दरवर्षी 15% परतावा देणार्या फंडामध्ये केली, तर 15 वर्षांनंतर एकत्रित निधी सुमारे 1 कोटीच्या आसपास पोहोचतो. येथे ‘चक्रवाढ व्याज’ ही मुख्य भूमिका बजावते. गुंतवणूक केलेल्या रकमेवर मिळणारे व्याजही पुढे व्याज निर्माण करत राहते.