आरोग्य

स्तनपान आणि बाळाचे आरोग्य

Arun Patil

स्तनपान जनजागृती करणे आणि नवजात बालकाचे आरोग्य सुधारावे या हेतूने १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट हा जागतिक ब्रेस्टफिडिंग (स्तनपान) आठवडा म्हणून साजरा केला जातो. बाळंतपणानंतर एका तासाच्या आत बाळाला स्तनपान करावे.

पहिल्या सहा महिन्यांपर्यंत बाळाला अमृतासमान स्तन्य दुधाव्यतिरिक्त दुसरे कोणतेही अन्न वा पाणी देऊ नये. बाळाची भूक भागेल इतकं दूध मातांना निसर्गतः निर्माण करता येते.

स्तनपानाचे फायदे-

बाळासाठी फायदे-

* नैसर्गिक बाळंतपणानंतर अर्ध्या ते एक तासाच्या आत आणि सीझर झाल्यानंतर ४ तासांनी बाळाला अंगावर पाजावे.
* मातेच्या दुधात बाळाच्या वाढीसाठी, विकासासाठी आवश्यक सगळे घटक असतात.
* बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. म्हणून इन्फेक्शन, जुलाब, सर्दी, अ‍ॅलर्जी अशा रोगांपासून लढण्याची ताकद  निर्माण हाेते.
* बाळाच्या शारीरिक विकासासोबत मानसिक विकास होतो.
* बाळंतपणानंतर पाहिले दोन ते चार दिवस पिवळसर रंगाचे दूध स्तनांमधून स्रवते. त्यास पीयूष (कोलोस्ट्रम) म्हणतात. बाळासाठी हे पीयूष अत्यंत लाभदायक असते. त्यात अँटिबॉडी, प्रोटिन्स, व्हिटॅमिन ए, घ, ऊ शिवाय मिनरल्स असे शरीराच्या वाढीसाठी आवश्यक घटक बाळाला मिळतात.
* आईचे दूध पचनास हलके असते.

आईसाठी फायदे –

* स्तनपानामुळे आईच्या शरीरातील ऑक्सिटोन्सिन या हार्मोनचा स्त्राव वाढतो. त्यामुळे बाळंतपणानंतर गर्भाशय आणि मातेचे शरीर पूर्वस्थितीत आणण्यास मदत होते.
* अतिरिक्त चरबी कमी होऊन वजन कमी होते.
* बाळंतपणानंतर रक्तस्त्राव कमी होतो.
* स्तन, गर्भाशय, अंडाशय या अवयवांचे कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते.
स्तनपानाची पद्धत –
* आईने योग्य स्थितीत बसून बाळाला पाजावे.
* दूध पाजण्याआधी स्तनांना सुती कापडाने व्यवस्थित स्वच्छ करून घ्यावे.
* बाळाचे तोंड पूर्ण उघडलेले असावे.
* मातेच्या स्तनाचा काळा भाग बाळाच्या तोंडात असावा आणि बाळाची हनुवटी मातेच्या स्तनाला चिकटलेली असावी.
* बाळाला दोन्ही बाजूंच्या स्तनाला पाजावे.
* सुरुवातीला स्तनांतून पाण्यासारखे दूध म्हणजे फोअर मिल्क येते. यामुळे बाळाची तहान भागते. नंतर घट्ट दूध येते. त्याने बाळाची भूक भागते. म्हणून एका बाजूच्या स्तनाला किमान दहा ते पंधरा मिनिटे पाजावे.
* दर दोन तासांनी बाळाला पाजावे.
* स्तनपान झाल्यावर आईने बाळाला खांद्यावर उभे धरून पाठीवर अलगद हात फिरवावा किंवा थोपटावे. जेणेकरून बाळ ढेकर देते आणि पोटातील हवा बाहेर निघून जाते.

आईने दूध वाढविण्यासाठी करावयाचा आहार –

* आईने संतुलित आहार घेणे गरजेचे आहे.
* आहारात दूध, दुधाचे पदार्थ, तूप यांचा समावेश करावा.
* शतावरी, बदाम, डिंकाचे लाडू, पनीर, नाचणी यांचा आहारात समावेश असावा. या पदार्थांमुळे मातेमधील प्रोलॅक्टिन हार्मोन्सची निर्मिती अधिक होऊन मातेला दूध वाढते.
* अंडी, मासे, पालेभाज्या, फळे घ्यावीत.
* पाणी भरपूर प्यावे.
* शारीरिक वा मानसिक ताणतणावापासून दूर राहावे. चिडचिड, राग, संताप, अतिश्रम, उपवास करू नये.
* स्तनपान करणार्‍या मातेला कॅल्शियम, लोह, कॅलरीज यांची जास्त प्रमाणात गरज असते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन्सच्या गोळ्या घ्याव्यात.

स्तनपान हे आई आणि बाळ दोघांसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे स्तनपानाविषयी असणारे गैरसमज दूर करून प्रत्येक मातेने स्तनपान करायला हवे.

डॉ. अश्विनी राऊत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT