आरोग्य

समस्या उन्माद विकाराची

Arun Patil

गुरुकुल पारंपरिक उपचार : आयुर्वेदीय थोर संहिताकारांनी उन्माद आणि अपस्मार-वेडेपणा आणि फिट येणे असा काही वेळेस एकत्रित विचार केलेला आढळतो. तथाकथित उन्माद विकार आणि अपस्मारात मेंदू झोपविणे या उपचार दिशेपेक्षा इतर साम्य काहीही नसते.

दिवसेंदिवस उन्माद विकाराने ग्रस्त खूप लहान वयातील मुलांपासून ते ऐंशी-नव्वदीपर्यंतची थोर-थोर मंडळी मोठ्या संख्येने संबंधित डॉक्टर, वैद्यांकडे येत असतात, आणली जातात.

संबंधित रुग्णमित्र हे नेहमीच मोठ्याने बोलणे, आरडाओरडा, त्रागा करणे, आदळआपट करणे, तोडमोड करणे, घरातील आणि बाहेरच्यांना लहान-मोठे विसरून खूप दमबाजी करणे इत्यादी कमी-अधिक कृतींनी कुटुंबातील इतर व्यक्‍तींचे स्वास्थ्य नेहमीकरिता बिघडवत असतात. संबंधित व्यक्‍तीच्या मेंदूमध्ये खूप प्रकारचे गडबड गोंधळीचे, आक्रमकतेचे विचार येतात. त्याचा ताबा का, केव्हा कसा घेतात, याचे उत्तर अजूनही जगातील वैद्यकीय संशोधक आणि मानवशास्त्रतज्ज्ञांना सापडले नाही.

दोन-पाच वर्षांच्या मुलांपासून ते तरुण आणि वृद्ध माणसे महिला जेव्हा निरपराधी लोकांना वेडेवाकडे बोलतात, शिव्या देतात, हाणामारी करतात, प्रसंगी खूनही करतात आणि हे सर्व उघडघड चालते तेव्हा संबंधित कुटुंंबीय, शेजारीपाजारी, शासन सगळ्यांचीच पाचावर धारण बसलेली असते. गोडगोड बोलणे, त्या रुग्णाच्या आवडत्या व्यक्‍तींकडून समजावणे, त्याचे लहान-मोठे लाड करणे इ. उपायांनी उन्मादाला सरावलेले हे रुग्ण खूप-खूप वेळा दाद देत नाही.

त्यांच्याकरिता प्रारंभिक अवस्थेत डोक्यावर खोबरेल, एरंड तेल, नारिकेल तेल किंवा जपाकुसुम तेल थापणे, नाकात चांगले तूप किंवा अणू तेल टाकणे; तळहात, तळपाय, कानशिले, कपाळ यांना हलक्या हाताने शतधौतघृत जिरवणे यांचा उपयोग होतो. पोटात घेण्याकरिता प्रवाळ, कामदुधा, ब्राह्यवटी, चंदनादिवटी, लघुसूतशेखर अशांची कमी-अधिक निवड सकाळ, सायंकाळकरिता करावी. जेवणानंतर सारस्वतारिष्ट द्यावे. सकाळ, सायंकाळच्या गोळ्यांबरोबर पंचगव्यघृत आणि रात्री निद्राकार वटी 6 गोळ्या आठवणीने द्याव्या.

विशेष दक्षता आणि विहार : संबंधित व्यक्‍तीची पार्श्‍वभूमी लक्षात घेऊन त्याच्या रागाला निमित्त मिळेल असे भाषण, कृती टाळावी. अशा व्यक्‍तीला शक्यतो त्याच्या आवडत्या व्यक्‍तींच्या सहवासात ठेवावे. त्यांच्या बबलिंग एनर्जीला काम मिळेल, असे विविध छंद किंवा कामात गुंतवावे. मर्जी सांभाळावी.

पथ्य : मधूर रसाचे माफक पदार्थ, गायीचे दूध, लोणी, तूप, याबरोबरच ज्वारीची भाकरी, मुलाचे वरण; दुधी भोपळा, पडवळ, दोडका, घोसाळे, कोथिंबीर, चाकवत अशा सौम्य भाज्यांचा वापर करावा. खूप धष्टपुष्टता वाढेल, असा आहार टाळावा. धने ठेचून त्याचे पाणी, काळ्या मनुका, राजगिरा लाह्या यावर भर द्यावा.

कुपथ्य : तिखट, आंबट, खारट, चमचमीत, मसालेदार जेवणावर जेवण, मांसाहार, बेकरी पदार्थ, रात्री उशिरा किंवा राक्षसकाली जेवण, मद्यपाने टाळावे.

योग आणि व्यायाम : शवासन, दीर्घ श्‍वसन, प्राणायाम, भस्त्रिका, अन्‍न पचनापुरता माफक व्यायाम.

रुग्णालयीन उपचार : शिरोधारा, शिरोपिचू, शिरोबस्ती, मात्रा आणि निरूहबस्ती.

अन्यषष्ठी उपक्रम (पंचकर्मादी) : शतधौतघृत, लोणी, तूप, खोबरेल किंवा एरंड तेल, जपाकुसुमादी तेल यांनी तळहात, तळपाय, कानशिले, कपाळ यांची 'सेवा' करावी.

चिकित्साकाल : किमान तीन महिने ते एक वर्ष.

निसर्गोपचार : शांत आणि थंड वातावरणात आवडत्या व्यक्‍तींबरोबर राहणे, फिरणे, लहान बालकांबरोबर खेळणे.

अपुनर्भव चिकित्सा : पंचगव्यघृत, शतावरीघृत, अणुतेल किंवा शतधौतघृताचे नस्य; शतधौतघृताने पादपूरण, तळहात, तळपाय, कानशिले, कापळ यांना हलक्या हाताने जिरवणे, सायंकाळी लवकर जेवणे; कमी जवणे. जेवणानंतर आठवणीने किमान वीस मिनिटे फिरून येणे. गोदुग्धावर राहणे.

संकिर्ण : स्त्रियांचा उन्माद विकार हा वेगळ्याच तर्‍हेने हाताळावा लागतो. काही स्त्रियांना त्यांच्या सोळा ते पंचेचाळीस या काळात उन्माद विकाराने पछाडले, तर त्यांच्या विटाळसंबंधित तक्रारींची तात्पुरती आणि दीर्घकालीन उपाययोजना करावी लागते. अशा स्त्रियांना खूप विटाळ होऊ नये म्हणून आर्तशमन उपचार करावे लागतात. त्याकरिता प्रवाळ, कामदुधा, चंदनादिवटी, उपळसरी, शतावरीघृत, शतावरी लापशी, शतावरीकल्प, मौक्‍तिकभस्म अशांची मदत होते.

वैद्य विनायक खडीवाले

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT