आरोग्य

पाठदुखीने त्रस्त आहात?

Shambhuraj Pachindre

पाठदुखी होण्याची अनेक कारणे असतात जसे सी सेक्शन प्रसूती, अयोग्य पद्धतीने बसणे-उठणे, महिलांमध्ये बहुतेकदा उंच टाचांच्या चपला घातल्या, तर त्यांना कंबरदुखी सतावते. पाठदुखी आणि कंबरदुखी दोन्हीवर अ‍ॅलोपॅथीच्या मदतीने उपचार करता येतात; मात्र आयुर्वेदिक उपचारांमध्ये या दोन्ही दुखण्यांवर कायमस्वरूपी उपचार उपलब्ध आहेत.

काढ्याचा फायदा : कंबरदुखीमध्ये दशमुलादी काढा सकाळ, संध्याकाळ घ्यावा. कंबरदुखीचे महत्त्वाचे कारण बद्धकोष्ठता मानले गेले असेल, तर एरंडाच्या तेलाचे सेवन करावे. रात्री गहू भिजत घालून सकाळी ते खसखस, धणे यांच्यासह दुधात मिसळावे. आठवड्यातून दोन वेळा याचा वापर केल्याने कंबरदुखीत आराम मिळण्याबरोबरच शरीरातील ताकद वाढते.

मसाजचा फायदा : पाठदुखी थांबण्यासाठी महानारायण तेल, चंदनबल लाक्षादी तेल, तिळाचे तेल, मोहरीचे तेल अथवा खोबरेल तेलाने हलक्या हातांनी मालिश करावे. त्यामुळे मणक्यातील सांधा योग्य ठिकाणी बसतो आणि वेदनेपासून सुटका मिळते. पाठ दुखत असताना कंबरेतून वाकून कोणतीही गोष्ट उचलू नये. जेव्हा खुर्ची किंवा मांडी घालून बसता तेव्हा पुढच्या बाजूला झुकू नका. तासन् तास एका जागी बसावे लागणार असेल, तर अधूनमधून स्थिती बदला.

रोजचा व्यायाम : सर्वसाधारणपणे पाठदुखी हा वयाशी निगडीत असणारा त्रास आहे. वय वाढल्यानंतर इतर हाडांबरोबर पाठीचा कणाही कमजोर होतो. कॅल्शिअमची कमतरता मणक्यालाही जाणवते. 25 टक्के कॉम्प्युटर ऑपरेटर्सना सर्व्हायकल ब्रेकियल सिंड्रोमचा त्रास होतो. त्यात व्यक्तीचा हात, खांदे, पाठ आणि मान यांच्या पेशी कायम तणावात राहतात. या त्रासापासून वाचण्यासाठी नियमित व्यायामाची गरज आहे.

काळजी घ्या

  • कंबरदुखीमध्ये रुग्णाने कडक गादीवर झोपावे.
  • काम करताना शरीर नेहमीच सरळ ठेवावे.
  • जास्त जड सामान उचलू नये.
  • आहारातील कॅल्शिअम आणि जीवनसत्त्वाचे प्रमाण वाढवावे.
  • ताणतणाव कमी करून पोषक अन्न घ्यावे.

– डॉ. संतोष काळे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT